विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अगरु (ऊद) :- ह्याला आंग्ल भाषेंत ईगलवुड, व कालंबक, व एतद्देशीय भाषेंत आगर, उगर, उगल, ऊद, सासी, आक्याऊ, कायु, गारु इत्यादि नांवें आहेत. इकडील सगळीं नांवें अगरु या संस्कृत शब्दापासून पडलेलीं आहेत. अॅग्लोवुड किंवा ईगलवुड हें नांव पाली भाषेंतील लाघु किंवा लोहा या शब्दावरुन पडलें असावें असा तर्क आहे.
व स्तु क्षे त्र :- भूतान, हिमालय, आसाम खाशीच्या टेंकड्या, पूर्वबंगाल मार्ताबानमधील टेंकड्या यामध्यें हीं झाडे होतात. व तीं सर्व ॠतूंत हिरवीं राहतात. या झाडाची उंची ६० ते १०० फुटांपर्यंत असून यांचा घेर ५ ते ८ फुटापर्यंत असतो. या झाडापासून ''अगरु '' हें द्रव्य निघतें. झाडें २० वर्षांची झाल्यावर तीं अगरु गोळा करण्यास योग्य होतात. परंतु ५०-६० वर्षांची होईतों तीं पक्व होत नाहींत असें कांहीं लोकांचे मत आहे. या झाडाचें साधें लांकूड, फार किमतीचें नसतें. कारण तें रंगानें फिकें, वजनांत हलकें व गंधहीन असतें. परंतु विशिष्ट परिस्थितींत या झाडाच्या कांहीं भागांस अगरु (ऊद) नांवाचें द्रव्य भरपूर येतें व त्यामुळें लांकडाचें विशिष्टगुरुत्व वाढतें, व झाडाची किंमतही वाढते. अगरु द्रव्याची किंमत त्यांमध्यें असलेल्या राळेच्या प्रमाणावर अवलंबून असते. पूर्ण वाढ झालेल्या झाडांत ६ ते ८ पौंडपर्यंत ऊद आढळतो. झाड विशेष चांगले असल्यास त्यांतील अगरुची किंमत ३०० रु. पर्यंतहि येते. अगरु असलेले झाडाचे भाग अतिशय वेडेवांकडे असतात. या झाडाचें हलके लाकूड (अगरु नसलेलें ) दर शेरास १-३ रुपये दरानें विकतें. अगरु असलेलें लांकुड काळसर असून त्याचा भाव १६ ते २० रु. शेर असतो. ह्या झाडापासून ''चूवा'' नांवाचें सुगंधी द्रव्य काढण्याची कृति ऐने अकबरीमध्यें दिलेली आहे.
पूर्वीपासून सर्व प्राच्यदेशांत अगरु द्रव्याचा त्याच्या सुवासाकरितां उपयोग करीत असत. यांमध्यें औषधी गुणधर्महि आहेत असा समज आहे. पांचव्या शतकांतील वैद्यक ग्रंथांत या द्रव्याचा उल्लेख आहे. हल्लीं चीनदेशांत या द्रव्याचा उपयोग फार करितात. उदबत्या करितांना याचा उपयोग फार होतो. एषसलहटमध्यें यापासून 'अगर-अत्तर' काढितात. हें अत्तर गुलाबच्या अत्तराइतकेंच चांगलें असून त्याची किंमतहि त्याबरोबर असते. मार्कोपोलो, गार्सिया डी ओर्टा, वारथेमा, बारबोसा, लिन्स्कोटेन, हर्बर्ट इत्यादि पाश्चात्य प्रवाश्यांनीं अगरु (Eagle, or colambac-wood) झाडाचा उल्लेख केलेला आहे. बँकॉक मधून मुंबईस उत्तम अगरु येतो असें प्रेबल लिहितो. त्यानें गागली व मवर्दी अशा दोन अगरूंचा उल्लेख केला आहे. ऐने अकबरीमध्येंहि याचे पुष्कळ प्रकार दिलेले आहेत. प्राचीन आर्यंन् लोक ज्याप्रमाणें बर्च झाडाच्या सालीचा कागदासारखा उपयोग करीत त्याप्रमाणें आसामी रहिवासी अगरु झाडाच्या सालीचा लेखनसाहित्य म्हणून उपयोग करीत असत. अगरु झाडाच्या सालीपासून वाकहि करतात परंतु तो मजबूत नसतो. स्त्रियांनी न्हाल्यानंतर त्यांचा केसांनां उदाचा धूप देण्याची चाल अजून कांहीं ठिकाणी दृष्टीस पडतें. त्या चालीचा उल्लेख बिल्हणानें आपल्या विक्रमांकदेवचरिताच्या प्रास्ताविक भागांत ''कुर्यादनाद्रेषु किमंगनानाम् केशेषु कृष्णागरुधूपवासः'' अशा श्लोकार्धानें केला आहे. जुन्या गांवठी वैद्यकांत ऊद हा बराच औषधी उपयोगाचा जिन्नस म्हणून समजला जातो. आमांशाच्या औषधांत उदाची योजना करतात. खोकल्याच्या वगैरे विकारांत उत्तेजक औषध देण्यास ऊद फार चांगला उपयोगी पडतो अशीहि कांहींची समजूत आहे. या झाडाची साल कडू असते ती अग्निमांद्यावर देतात. ( वॅट. )