विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अठरा कारखाने :- राज्यांतील अठरा मोठीं खातीं. यांच्या वर्गीकरणाचे तीन प्रकार आहेत, ते असे ( मोलस्वर्थ व क्यांडी यांच्या कोशाप्रमाणें. ) : ( १ ) उष्टर; खबुतर; जनान; जवाहीर; जामदार; जिकीर; तालीम; तोफ; थट्टी; दप्तर; दारू; दिवान; नगार; पील; फरास; वंदी; मोदी; शिकार-असे अठरा खाने. ( २ ) तोप-पील; उष्टर; फरास; शिकार; रथ; जामदार; जवाहीर; जिराईत; नगार; दारू; वैद्य; लकड; इमारती; मुदबख; कुणबिणी; खाजगत; थट्टी येणेंप्रमाणे- ( ३ ) खजिना दफ्तर; जामदार; पील; जिराईत; अंबर; फरास; मुदबख; नगार; सरबत; आवदार; शिकार; तालीम; दारू, उष्टर; बकरे; तोप; तराफ.
यांतील कांहीं शब्द सहज समजण्याजोगे नसल्यानें त्यांचे अर्थ देत आहों; उष्टर्=उंट. पील=हत्ती. मुदबख=पाक. सरबत= रस, अर्क, औषध. जिराईत=धान्यकोठार. थट्टी=गुरें, गोठा. फरास=बिछायती, तंबू वगैरे कापड. मोदी=युध्दसामग्री. अबदार=पिण्याचें पाणी ज्याच्या ताब्यांत आहे असा अधिकारी. अंबर=धान्य; शराफ=तांबूल.
शिवाजी महाराजांनीं राज्याभिषेकानंतर खाजगी व्यवस्थेसाठीं अठरा शाळा स्थापिल्या त्यांविषयीं कृष्णाजीपंत केळुसकर आपल्या चरित्रांत माहिती येणेंप्रमाणें देतात; गजशाला (पीलखाना ), मल्लशाला (तालीमखाना), धान्यसंग्रह (अंबारखाना), भेरिदुंदुभि (नगारखाना), यंत्रशाला (तोफखाना), वैद्यशाला ( शरबातखाना ), पानीयशाला (आबदारखाना), उष्ट्रशाला ( शुतरखाना ), शिबिरशाला (फरासखाना), खटक शाला (शिकारखाना), रत्नशाला ( जवाहीरखाना ), पाकशाला (मुदपाकखाना), शस्त्रशाला (शिलेखाना), तांबूल सशाला ( शराफखाना ), रथशाला ( गाडीखाना ), लेखनशाला (दफतरखाना), नाटकशाला ( नटखाना ) आणि जिनसखाना.
हे कारखाने वारंवार स्वरूपांत बदलत असत असें दिसतें. राज्यसूत्रें पेशव्यांच्या हातीं आल्यावर त्यांसहि १८ कारखाने ठेवणें भाग पडलें.
पेशवे सरकारचे अठरा कारखाने व त्यांतील अधिकारी :
१ तोफखाना -सखारामपंत पानशे, २ गणपतराव विश्वनाथ पानशे, ३ माधवराव कृष्ण पानशे, ४ जयवंतराव पानशे. दारूगोळा, खलासी वगैरे कामगार, रखवालीचे गाडदी, गाडयांचे बैलसुद्धां कारखाना तयार होता.
२ पीलखाना- ह्यांत हत्ती शंभर होते. सरदार-१ भगवंत परशजी व २ अल्लीमहात. कारकून रामचंद्रपंत गाडगीळ.
३ उष्टरखाना-गणपतराव मोरेश्वर. ह्यांत उंट अजमासें १००० एक हजार.
४ शिलेखाना-सदाशिवपंत वाकणकर.
५ फरासखाना-राघोपंत आंबीवर यांजकडे. खरडयाच्या स्वारींतील डेरे राहुटया वगैरे दलबादल डेर्यांसुध्दां.
६ कोठी | - हे सर्व कारखाने नारो शिवराम खाजगीवाले यांजकडे होते. खाजगीवाले यांचे हाताखालीं कारभारी गणेशपंत मटंगे. पुणें पेटा ह्या कारखान्यांत धरलेला आहे. तो ह्या कारखान्याच्या खर्चाकडे होता किंवा कसें तें समजत नाहीं. |
७ लकडखाना | |
८ इमारत | |
९ बागा | |
१० कुरणें | |
११ वहीतकोठी | |
१२ रथखाना |
१३ पुणें पेटा
१४ थट्टी - नारायण रामचंद्र पुणें सुभा यांजकडे.
१५ पोतें व जामदाखाना - शामराव कृष्ण पोतनीस.
१६ जिन्नसखाना व वैद्यशाळा-शामराव बाबूराव करमरकर यांजकडे.
१७ पुस्तकशाळा-गोविंदपंत आपटे.
१८ खासगी-नारो शिवराम खासगीवाले. ( इतिहाससंग्रह पुस्तक १ लें. अंक १२ वा जुलै १९०९. )