विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अडस :- गांव, तालुका नागपुर, जिल्हा नागपुर. लोकसंख्या सुमारें ३००. नागपुरच्या वायव्येस १७ मैलांवर नागपुर तहशिलींत हें लहानसें खेडेगांव असून यांत ५ जुनीं देवळें आहेत. गणपतीच्या देवळांत मूर्ति एकाच दगडाची केलेली असून देवाभोंवती प्रदक्षिणा घालतां येतील अशा रीतीनें बसविलीं आहे. गांवाजवळच्या टेंकडीवर तीन लिंगांचें महादेवाचें देवालय असून लिंगे जमिनींतून आपोआप वर आलीं आहेत असा समज आहे. येथें भोंसल्यांनीं बांधलेले दोन तलाव आहेत. बांधकाम दगडी आहे. नोवेंबर व जानेवारी महिन्यांत लहान लहान जत्रा भरतात. या देवळाचे पूजारी गोसावी असून,
देवळाकरतां दिलेल्या जमिनीची व्यवस्था एकजण पाहतो. गांवांतील रहिवासी बहुतेक ब्राह्मण आहेत. ( नागपूर डि. गॅ. )