विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अकिलीस - पौराणिक काळीं ग्रीक लोकांत हा एक मोठा प्रसिद्ध वीर होऊन गेला. होमरच्या इलियड महाकाव्यांत तर याला फार श्रेष्ठ स्थान मिळालें आहे. हा तत्कालीन सर्व ग्रीकांत शूर होता. त्याच्या बापाचें नांव मेलियस व आईचें नांव थीटिस. त्याचा आजा एकस (Aeacus) असून तो खुद्द झूस (Zeus) चा पुत्र होय. अकिलीसच्या बालपणासंबंधानें होमर व तदुत्तर लेखक यांनी निरनिराळ्या हकीकती दिल्या आहेत. बालवयांत त्याला त्याच्या आईनें फ्थिआ (Phthia) येथें वाढविलें व त्या युद्धकलावक्तृत्व तसेंच संगीव व वैद्यक यांचें शिक्षण दिलें असें होमरनें वर्णिले आहे. अकिलीस बद्दलच्या होमरोत्तरकालीन एका कथेंत असें सांगितलें आहे कीं, त्याची आहे त्याला अमरत्व प्राप्त व्हावें म्हणून त्याच्या अंगाला रोज दिवसा अमृत ( अँब्राझिया ) लावीत असे व रात्रीं पेटलेल्या कोळशाखालीं ठेवीत असे. हें एके दिवशीं पेलियसला दिसतांच त्यानें मुलाला आगी खालून काढून घेतलें. तेव्हां थिटिस रागावून घरांतून निघून गेली. दुसर्या एका गोष्टींत असें आहे कीं, त्याला मातेनें बालपणीं पादतलानें धरुन स्तिक्षनदीच्या जलांत बुडविलें; तेव्हा पादतलाशिवाय त्याचें सर्व शरीर अभेद्य झालें. पुढें त्याचें शरीरसामार्थ्य उत्तम व्हावें म्हणून त्याला सिंहाची आंतडीं आणि अस्वल व रानडुक्करें यांचें मांस खावू घालण्यांत येत असे. तुझा मुलगा दीर्घायु व्हावा अशी इच्छा असेल तर तो घरीं बसून आपला जन्म प्रसिद्धीस न येतां घालवील, पण तोच जर अल्पायु चालत असेल तर तो ट्रॉयचे समरभूमीवर मोठी कीर्ति संपादन करील, असे वैकल्पिक वर त्याच्या मातेला प्राप्त झाले होते. तिनें अर्थात् शेवटला पत्करिला होता. पण पुढें जेव्हां ट्रॉय शहराला वेढा पडला तेव्हां त्याचें मरण ट्रॉयचे समरभूमीवर आहे हें जाणून त्याच्या मातेनें त्याला लैकोमेडीस राजाच्या दरबारीं स्त्रीवेषानें पाठवून दिलें. राजकन्येशीं त्याची मैत्री झाली. एकीपासून त्याला नीआटोलमस नांवाचा पुत्रहि झाला. अकिलीसाशिवाय ट्रॉय घेणें शक्य नाहीं हें जाणून त्याच्या शोधार्थ ओडेसीस (युलिसीस) सौदागराच्या वेषानें तेथें गेला व त्याच्यापुढें रत्नें व शस्त्रें मांडून बसला. त्यानें शस्त्रें उचलताच तो पुरुष आहे हें निदर्शनास आलें. मग अकिलीस रणांत गेला. तेथें त्यानें मोठाले पराक्रम करुन शत्रूचीं बारा शहरें घेतली. पण पुढें एके प्रसंगीं अगमेम्नन यानें त्याची दासी ब्रायसीस हिला जबरदस्तीनें त्याच्याजवळून काढून आणून आपल्याकडे ठेविली. यामुळें रागावून युद्धांतून त्यानें आपलें अंग काढून घेतले. त्यानें युद्धांत परत सामील व्हावें म्हणून पुष्कळ प्रयत्न करण्यांत आला पण यश आलें नाहीं. पण पुढें एकदां त्याचा प्रिय मित्र पॅटेक्लस समरभूमीवर मारला गेला. ती वार्ता कळतांच सूड उगविण्याकरितां अकिलीस पुन्हा रणांगणावर गेला व त्यानें शत्रूपक्षाचा पुढारी हेक्टर याचा वध केला. हेक्टराचा अंत्यविधि वर्णिल्यावर तेथेंच इलियड काव्य समाप्त होतें. अकिलीसच्या मृत्यूसंबंधी हकिगत या काव्यांत नाहीं. परंतु दुसर्या एका ठिकाणी अशी हकिगत आहे कीं, मिनर्वेच्या देवळांत प्रायमची कन्या पोलीझेना हिला मागणी घालीत असतां पारिसानें पादतलावर बाण मारुन त्याचा वध केला. त्याच्या मृत्यूसंबंधानें याशिवाय दुसर्याहि कित्येक कथा आहेत. मरणोत्तर देवाप्रमाणें त्याची पूजाअर्चा पुष्कळ ठिकाणीं विशेषतः ल्यूक, स्पार्टामधील एलिस, व हेलेस्पांटवरील सिगी येथे करण्यांत येत असे. अकिलीस हा शौर्याचा नमुनेदार वीर असून अत्यंत कोपिष्ट पण कांहींसा उदासीन वृत्तीचा व क्वचित् प्रसंगीं वीराला उचित अशा हृदयाच्या कोमलतेनें शोभत आहे असें होमरनें दाखविलें आहे.