विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अग्निकुलें :- यांत चौहान, चालुक्य, परमार आणि पडिहार या चार रजपूत कुलांचा समावेश होतो.  रा. चिंतामणराव वैद्य यांनी भा.इ.सं. मंडळाच्या नवम संमेलनांत वाचलेल्या ''अग्निकुलकल्पनेची निर्मूलता'' या निबंधांत, ही चार रजपुत कुलें आपणांस अग्निकुलें मानतात तें चुकीचें आहे असें मांडलें आहे. इ.स. १००० च्या सुमारास हीं आपणांस सूर्यच्रद्रवंशी समजत.  चंदभाटानें पृथ्वीराजरासांत वसिष्ठॠषींनीं राक्षससंहारार्थ चार रजपूत अग्निकुंडांतून उत्पन्न केले असें जें अलंकारिक वर्णन लिहून ठेविलें त्यामुळें या कल्पनेला ऐतिहासिक स्वरुप येऊन, सूर्यचंद्रवंशीय कुलें आपल्याला बहुमानानें अग्निवंशज समजूं लागलीं.  पुढील भाटांनांहि अग्नीशीं संबंध जोडणार्‍या त्यांच्या वंशावळी तयार केल्या.  पण याचा दुष्परिणाम असा झाला कीं पाश्चात्य संशोधक या कुलांना, हूणादि अनार्य जातीचे व वसिष्ठांनीं अग्निसंस्कार करुन क्षत्रिय बनविलेले लोक असें मानूं लागले व त्यामुळें यांची सूर्यचंद्रापासून चालत आलेली शुद्ध परंपरा बुडूं लागली. तेव्हां अग्निकुलांत जन्मलेले असें खोटें म्हणवून घेण्यांत या रजपुतांनां कांहींच फायदा नाहीं.  अग्निकुलाची कल्पनाच अगोदर मिथ्या आहे व म्हणून कोणते राजे अग्निकुलांतले हें संशोधण्याचेंच कारण नाहीं.  वगैरे. रा. वैद्य यांचा अग्निकुलाच्या कल्पनेचा चंदभाटापूर्वी अभाव होता असा निर्णय आहे तोच आम्हांस मान्य करतां येत नाहीं.

चंदभाटापूर्वी स्वतःस अग्निकुलोत्पन्न मानणारे असे परमार राजे होते व इ.स. च्या ११ व्या शतकापूर्वी तेहि आपणांस अग्निकुलोत्पन्न म्हणत असल्याचें आढळत नाहीं.  तथापि अग्निकुलाची कल्पना याहून बरीच जुनी असली पाहिजे अशी शंका घेण्यास जागा आहे.  होर्नले यानें प्राचीन तामीळ वाङ्‌मयावरुन असें दाखविलें आहे कीं त्या भागांत एक राजवंश यज्ञाच्या अग्नींतून उत्पन्न झाला असल्याची समजूत रुढ होती.  यासंबंधाचा पुरावा पुढे दिल्याप्रमाणें आहे.

तामिळदेशांत, विद्येचे शेवटचे सात आश्रयदाते म्हणून प्रसिद्ध असलेले कांहीं राजे होते.  यांपैकीं मुख्य परम्बुनाडूचा पारि राजा हा होता.  या पारि राजाचा चेर, चोल व पांड्यराजांनीं पाडाव केल्यामुळें त्याच्या मुलींचीं लग्नें करण्याचें काम त्याच्या मित्र कपिलर नामक ब्राह्मणकवीवर येऊन पडलें.  तेव्हां तो त्या मुलींना ज्या दोघां राजांकडे घेऊन गेला त्यांपैकी एकास त्यानें अग्निकुलोत्पन्न असें संबोधिलें होतें.  हा राजा म्हैसूरच्या दक्षिणेस असलेल्या पश्चिम घांटांतील एका लहानशा डोंगराळ अरयम नांवाच्या संस्थानचा अधिपति होता.  याचें नांव पुलिकडी माल इरुन्गोव्हेल असें होतें.

''तिरुविलैयाडल पुराणं '' प्रमाणे कपिलर कवि तिरुवादवूर येथें जन्मला असून त्यानें तामिल भाषेंत बरेच ग्रंथ लिहिले होते.  कपिलर परणरचा समकालीन होता.  या पुराणांत विद्येचे दाते म्हणून तीन राजे होते त्यांचीं नांवें दिलीं नाहींत; परंतु सात आश्रयदात्यांची नांवे येणेप्रमाणें दिलीं आहेत ः- पळनिसजवळ पेहन; उत्तरेस पश्चिम घांटावर पारि; दक्षिण अर्काटमध्यें तिरुक्कोबवूरजवळ कारि, तिनेवेल्लीच्या पश्चिमेस पडिथिल टेकडीजवळ आइ; धर्मपुरी अथवा म्हैसूरमधील तगडूर येथील अदिदमन; मलनाडूचा नल्लि; सालेममधील कोल्लि; मलैजवळचा ओरि; उरैयूरचा चोल व वंजीचा चेर.

कपिलर गजबाहुराजाच्या वेळीं होता.  यावरुन, कपिलरचा काळ इ.स. चें दुसरें शतक असावें असे डॉ. होर्नलेनें अनुमान काढून इतक्या पुरातन काळींसुद्धां ॠषीच्या यज्ञकुंडांतील अग्नीपासून उत्पन्न झालेल्या राजवंशाची कल्पना रुढ होती असें दाखविलें आहे. (इं. अँ. पु. ३४).