विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अठरा पुराणें :- मद्वयं भद्वयं चैव व्रत्रयं वचतुष्टमय् । अनापल्लिंगकूस्कानि पुराणानि पृथक् पृथक् ॥ आलिंपाग्नि पुराणानि कूस्कं गारुडमेव च ॥ अठरा पुराणांचीं नांवें अशीं :- १ ब्राह्म ( श्लोकसंख्या १० हजार ), २ पाद्य ( ५५ हजार ), ३ वैष्णव ( २३ हजार), ४ शैव किंवा वायु ( २४ हजार ), ५ भागवत ( १८ हजार ), ६ भविष्य (१४५००), ७ नारद ( २५ हजार ), ८ मार्कंडेय ( ९ हजार ), ९ अग्नि
(१५४००), १० ब्रह्मवैवर्त ( १८ हजार ), ११ लिंग (११ हजार ), १२ वराह ( २४ हजार), १३ स्कंद ( ८११००), १४ वामन (१० हजार), १५ कूर्म (१७ हजार), १६ मत्स्य ( १४ हजार), १७ गरुड (१९ हजार), व १८ ब्रह्मांड ( १२ हजार ), पुराणांतील श्लोकसंख्येविषयीं एकमत नाहीं. पुराणांवर विशेष माहिती '' पुराणें '' या लेखांत सांपडेल.

उ प पु रा णें :- उपपुराणें पुष्कळ आहेत. त्यांपैकीं कांहीं जुनीं व कांहीं अलीकडचीं आहेत. देवी भागवत ( काल सुमारें इ. स. ११०० ) यांत खालील यादी दिली आहे. -१. सनत्कुमार, २. नृसिंह ३. नंदी, ४. दुर्वास, ५. नारद ( उप ) ६. कपिल, ७. मानव, ८. उशनस, ९. वारुण, १०. काली, ११. वासिष्ठलिंग, १२. माहेश्वर, १३. सांब, १४. सौर, १५. पाराशर, १६. शिव ( धर्म ), १७. मारिच, १८. भागवत ( भार्गव ), कांहीं ग्रंथांतून ब्रह्मांडोपपुराण हें १९ वें उपपुराण धरतात.