विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनंतसुत ( विठ्ठल )- हा कवि सुमारें ७० वर्षापूर्वी बडोदें येथें होऊन गेला. त्याचे वडील अनंत हांगा नदीच्या कांठीं पिंपळगांव येथें रहात; त्यांच्याकडे पिंपळगांव व इतर तीन गांवें यांचें जोशीपण व कुळकर्णीपण असे. विठ्ठलाच्या आईचें नांव राधाबाई. त्या वारल्यानंतर अनंतांनीं संन्यासदीक्षा घेतली. विठ्ठलानें वडीलांनाच गुरु केलें होतें.अनंतसुताचा ''दत्तप्रबोध'' हा एकच ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्याचे पहिले ३७ अध्याय शिवपुराण, नारदपुराण, व पद्यपुराण यांच्या आधारें लिहिले असून, त्यांत दत्तात्रेयाच्या पौराणिक कथा वर्णिल्या आहेत; पुढील २४ अध्यायांत दत्तसंप्रदायांतील संतांच्या कथा आहेत. कवीनें आपल्या तीर्थरूपांची भगवद्भक्ति व त्यांना झालेला साक्षात्कार या ग्रंथांत चांगला वर्णिला आहे; त्याचप्रमाणें आपली दत्तभक्तांची गुरुपरंपरा दिली आहे. यांत एके ठिकाणीं दत्तसंप्रदायाचें स्वरूप जें सांगितलें आहे तें विशेष वाटल्यावरून पुढें देत आहों:-
निंबराजासि रुक्मिणीरमण । सुप्रसन्नें लेववी भूषण ।
दिधलें स्ववस्त्र पीतवसन । करावें रक्षण अद्यापि ॥
तैंपासोनी सर्वांसी । पिंवळाबाणा सांप्रदायासी ।
पिंवळया पताका निश्चयेंसी । शोभा श्रीहरीची मानली ॥
सोंवळें करविलें परिधान । तैसेंचि करविलें कीर्तन ।
तोचि क्रम सर्वांलागोन । करिती आचरण त्या रीतीं ॥
उभे राहावें कीर्तनीं उघडें । पागुटें नसावें आंगडें ।
कांस घालोनि वाडें कोडें । गावे पवाडे श्रीहरीचे ॥
ती आज्ञा शिरीं वाहोन । सांप्रदायी करिती कीर्तन ।
सप्त पिडी वरदान । निंबराजा पावन जाहलेंसे ॥
हा पीतवस्त्र परिधान करणारा व उघडयानें कीर्तन करणारा निंबराज संप्रदाय हल्लीं अस्तित्वांत आहे. ( महाराष्ट्रकविचरित्र )
२ - संतकविकाव्यसूचीकार एका अनंतसुत विठ्ठलाची माहिती देतात तो व वरील एक नसावेत. याचे ग्रंथ-वस्त्रहरण ( १५९४ ), गजगौरीव्रत, सुधन्वाख्यान (?) ताटकावध, गरुडहनुमानभेट.