विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अटक गांव - हें गांव, पंजाब प्रांतांत, अटक जिल्ह्यांतील अटक तालुक्याचें मुख्य ठिकाण होतें. हें नॉर्थ वेस्टर्न रेलवेचें स्टेशन असून, कलकत्त्याहून १५०५ मैल, मुंबईहून १५४१ मैल व कराचीहून ८८२ मैल दूर आहे. लो. सं. ( १९०१ ) २८२२. काबूल व सिंधू यांच्या संगमाच्या थोडा खालच्या बाजूस सिंधूनदीच्या कांठीं अटकचा किल्ला आहे. तेथें शिबंदी तोफखाना व पायदळ ठेविलेलें आहे. किल्याच्या समोरच कमालिया व जलालिया नांवाच्या काळ्या दगडांच्या कड्यांमध्यें सिंधू नदीच्या पात्रांत भोंवरे आहेत. या कड्यांवरून अकबराच्या कारकीर्दीत दोन रोशानिया पाखंड्यांनां ढकलून देण्यांत आलें होतें.
नदीच्या वरच्या बाजूस, अटकपासून १६ मैलांवर, ओहिंद येथें, होड्यांचा पूल करून अलेक्झांडर नदीपार आला असें म्हणतात. अकबरानें, आपला भाऊ हकीम मिरझा, याच्या स्वार्यांपासून बचाव करण्याकरितां १५८१ त हा किल्ला पुन्हा बांधिला; व त्याचें नांव अटक-बनारस असें ठेविलें. दुसरी अशीहि दंतकथा आहे कीं, येथील नदी उतरून जाण्यास कठीण आहे म्हणजे, अटक करते म्हणून अकबरानें या किल्याचें नांव '' अटक '' असें ठेविलें; व नदी उतरून गेल्यावर पश्चिम किनार्यावर त्यानें खैराबाद म्हणजे '' सुरक्षितपणाचें माहेर घर '' स्थापन केलें. रघुनाथरावानें स्वारी करून अटकपर्यंत मराठ्यांची सत्ता वाढविली होती. १८१२ तरणजितसिंगानें या किल्ल्यावर हल्ला केला होता. पहिल्या शीख युद्धांत इंग्रजांनीं हा किल्ला घेतला होता. परंतु दुसर्या युद्धांत तो त्यांना कायम ठेवितां आला नाहीं. तें युद्ध संपल्यावर नंतर शीख लोकांकडून तो किल्ला फिरून इंग्रजांच्या ताब्यांत आला. १८७३ त सिंधुनदीवर असलेला रेलवेपूल व दुसरा रस्ता तयार झाला.
अटक येथें बेगमकी सराइ या नांवाची एक धर्मशाळा होती तिची दुरुस्ती पंजाब सरकारनें ३००० रुपये खर्चून नुकतीच केली आहे. ( इं. गॅ. ६ )