विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अत्तार फरिदुद्दिन – हा इराणी कवि व गूढतत्ववादी निशापूर येथे १११९ त जन्मला. व तो १२२९ त मारला गेला. परंतु त्याच्या जन्ममृत्यूच्या तारखांविषयीं मतभेद आहे. त्याचें खरें नांव अबू तालिब ( किंवा अबू हमिद ) महमद बिन इब्राहिम हें असून फरिदुद्दिन (धर्मांतील मोतीं ) हा त्याचा नुसता किताब होता. तो आपल्या बापाचाच गंध्याचा धंदा करी. गूढ व अज्ञेय अशा आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल खालीं दिल्याप्रमाणें अत्यंत चमत्कारिक तर्हेनें त्याचे मनांत जागृति उत्पन्न झाली. एके दिवशीं एक फकीर त्याच्या दुकानापुढें येऊन त्याला म्हणाला कीं, “हा सर्व माल येथेंच सोडून तुला मृत्यूला कवटाळावें लागेल, याबद्दल मला खेद होतो.” हें ऐकल्याबरोबर त्याने आपले दुकान वगैरे सोडून देऊन सर्व चित्त पार-मार्थिक गोष्टींकडे लाविलें. त्यानें मक्का, ईजिप्त, दमास्कस व हिंदुस्थान वगैरे ठिकाणीं प्रवास गेला. त्याचें बरेंचसें राहणें शाद्यख मुक्कामीं झालें.
त्याच्या मृत्यूचीहि हकीकत मोठी चमत्कारिक आहे. जेंगिझखानाच्या एका सैनिकानें त्याला कैद करून गुलाम केलें. त्याची चांगली किंमत येत असतां त्यानें आपल्या धन्याला आणखी जबर किंमत येईल तोंपर्यंत वाट पाहण्यास सांगितलें. पुढें पहिल्या सवद्याप्रमाणें किफायतशीर सवदा करतां न आल्यामुळें त्यानें रागावून फरिदुद्दीनला ठार केलें. पुढें याच्यावर एक भव्य थडगें बांधण्यांत आलें; ह्या जागेला धार्मिक महत्व प्राप्त झालें. त्यानें १,२०,००० द्विपाद कविता लिहिल्या. शेवटीं त्यानें इतकें खडतर तपाचरण केलें कीं, तो पुढें काव्यहि लिहीनासा झाला. त्याचें अत्यंत प्रसिद्द काव्य म्हटलें म्हणजे `मंतिक आतर’हें होय. ब्रह्मपदी लीन होण्याबद्दल जिवाची काय धडपड असते व शेवटीं त्याला काय प्राप्त होतें हें त्यांत चांगलें दाखविलें आहे.