विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनवरुद्दीन - कर्नाटकचा नबाब. यानें मूळ शिपाईगिरीवर आपलें नशीब काढलें. याला प्रथम निजामउलमुल्कानें कर्नाटकच्या बालराजाचा कारभारी नेमिलें. त्या बालराजाचा पुढें खून झाला व त्या भयंकर कृत्याकडे दुर्लक्ष करून अनवरुद्दीनानें विश्वासघातानें स्वत:च कर्नाटकची गादी बळकाविली. प्रथम तो दिल्लीच्या बादशाहाच्या पदरीं नोकरीस
लागला व लवकरच पुढें कोरा जहानाबादचा सुभेदार नेमलागेला. परंतु त्याच्या अव्यस्थित कारभारामुळें किंवा गैर आचरणामुळें त्याला प्रांताचा वसूल करून बादशाहाच्या खजिन्यांत भरतां येईना म्हणून तो ती नोकरी सोडून अहमदाबादेला गेला. त्या ठिकाणीं निजामउल्मुल्काचा बाप गाझीउद्दीनखान यानें सुरत शहरांत त्याला एका मोठया प्राप्तीच्या व जबाबदारीच्या जागेवर नेमलें. गाझीउद्दीनाच्या मरणानंतर त्याचा मुलगा दक्षिणेकडील प्रांताचा सुभेदार बनला तेव्हां त्यानें अनवरुद्दिनाला कर्नाटक आणि राजमहेंद्री या प्रांतांवर देखरेखीस ठेविलें. या प्रदेशांचा कारभार त्यानें १७२५ ते १७४१ पर्यंत केला व त्याचाच पुढें तो नबाब बनला. पुढें निजामउल्मुल्काचा नातु मुजफरजंग याच्या बरोबर झालेल्या लढाईंत तो मारला गेला (१७४९). त्या वेळीं त्याचें वय १०७ वर्षांचें होतें असें म्हणतात. त्याचा थोरला मुलगा कैद झाला आणि दुसरा मुलगा महंमद अली त्रिचनापल्लीला पळून गेला. या नबाबाच्या स्तुतिपर अनवरनामा नांवाचें वीररसप्रधान काव्य अबदी नांवाच्या कवीनें केलेलें आहे. त्यांत मेजर लॉरेन्स याचे पराक्रम आणि इंग्लिश व फ्रेंच यांच्या हिंदुस्थानांतील लढाया यांचें बरेंच यथातथ्य वर्णन केलेलें आहे. अनवरुद्दीनखानाचा मुलगा महंमदअली याला हैदराबादचा नबाब नासिरजंग यानें कर्नाटकच्या सुभेदारीवर कायम केलें.
[ बील, ओरिएंटल बायोग्राफिकल डिक्शनरी. इतिहाससंग्रह. पु. ३. पृ. ६७ ]