विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अगस्ता - या झाडास संस्कृतांत अगस्त्य व मराठींत हदगा हीं नांवें आहेत.  हें झाड बरेंच मोठें होतें.  हें बागेंत लावतात.  यांत पांढरा व तांबडा अशा फुलांच्या रंगावरुन दोन जाती आहेत.  याची पानें आंवळीच्या पानासारखीं असतात.  यास फुलें व शेंगा येतात.  त्यांचा भाजी करण्याकडे उपयोग करतात.  हें झाड ७/८ वर्षांवर टिकत नाहीं.  ह्या झाडाचा पाला फुलें व शेंगा यांचा औषधी कामाकडेही उपयोग होतो व भाजीही करितात.  सर्दी, मस्तकशूळ व चातुर्थिक ज्वरावर अगस्त्याच्या पानाचा रस नाकांत पिळीत असत.  अर्धशिशीवरही उपयोग करीत.  ज्या बाजूचें कपाळ दुखत असेल त्याच्या विषमबाजूच्या नाकपुडींत अगस्त्यांच्या पानांचा अगर फुलांचा रस पिळीत.  अपस्मारावर अगस्त्याचे पानांचा रस गोमूत्र व मिरपूड घालून देत.  अगस्ता रुक्ष, शीतल, मधुर, वातल, व त्रिदोषनाशक असें समजलें जातें.  याचीं झाडें पावसाळ्याचे आरंभास बीं पेरुन ती मुद्दाम करितांच लावित नाहींत; परंतु तीं लवकर वाढतात म्हणून पानमळ्यांत छायेकरितां लावितात;  क्वचित बागेंत फुलाचे शोभेकरितां लावितात.  लांकूड ठिसूळ असतें. ( संदर्भ  ग्रंथ – पदे वनस्पति गुणादर्श ).