विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजमोदल - (थायमोल) हा ओंव्यापासून काढतात. बाह्योपचारांत याचा उपयोग परोपजीवी कीटकांचा नाश करण्याकरितां तसेंच इसब आणि 'प्सोरीआसिस' यांच्या कांहीं विवक्षित स्थितींत होतो. याचा अल्कहल द्रव गजकर्ण, दद्रु यावर लावतात. क्षतांत, सन्निपातज्वरांत याचा अंत्रकोथघ्न या दृष्टीनें उपयोग करतात. परंतु त्याचा मुख्य उपयोग ( Ankylostome duodenale ) अँकिलोस्तोम ड्युओडिनेलचा नाश करण्याकरितां कृमिघ्न म्हणून होतो. अजमोदलच्या योगानें मूत्रास हिरवा रंग येतो. अजमोदल अदिद हें औषध अमेरिकेमध्यें सरकारी दवाखान्यांतून वापरतात. तें अजमोदल आणि अद यांचा संयुक्त पदार्थ आहे. हें औषध अॅरिस्टॉल किंवा अॅनिडॅलिन या नांवानें प्रसिद्ध आहे. अदपुत्तिकाच्या ऐवजीं याचा उपयोग करितात व तें कमी विषारी आहे. '' ग्लायकोथायमोलिन '' या नांवाचें औषध श्लेष्मल आंत्राच्या शैत्यविकारावर वापरतात. नख्तलीन, कापूर, व अजमोदल यांचें मिश्रण '' थायमोलिन '' या नांवानें बाजारांत विकत मिळतें.
अजमोदलची रासायनिक घटना क१०उ११४प्र किंवा क६उ३ ( प्रउ ) ( कउ३ ) ( क३उ७ ) [ १:३:६ ] अशी आहे. अजमोदल हा मथिलतुल्यमेदिलभानल (मेथिल इसो प्रापिल फिनोल ) असून कंठिजरल (कारव्हाकोल) याशीं तुल्यरूपी ( समघटक ) आहे. हा सुगंधी असून उत्कर्ब ' सायमीन ' क१०उ१४ आणि ' थायमीन ' क१०उ१६ यांबरोबर ओव्याच्या तेलांत व दुसर्या तेलांत असतो. या तेलांतून अजमोदलचें निष्कासन करण्याकरितां त्यांत सौम्य दाहक पालाशचा जलद्रव घालून चांगलें हलवून मिश्रण करावें. व हा द्रव गाळून आलेल्या गळणांत उद्धराम्ल घालावें म्हणजे अजमोदलचा निपात येतो. तो गाळून वाळवून ऊर्ध्वपतनानें युद्ध करावा.
अजमोदल मेन्थोनपासून कृत्रिम रीतीनें करतां येतो. याकरितां मेन्थोनचा हरपुत्तिकांत (क्लोरोफॉर्म ) करून त्यावर स्तंभनची क्रिया करावी म्हणजे द्विस्तंभ मेन्थोन तयार होतो. यांतून उद्-स्तांभाम्लाचे दोन अणू काढले ह्मणजे अजमोदल तयार होतो. अजमोदलचे स्फटिक मोठे चपटे व निर्वण असतात. यांचा रसांक ४४० श. असून उत्क्कथनांक २३०० श असतो. अजमोदल आणि स्फुरगंधकिद यांचें पातन केलें म्हणजे सायमीन तयार होतो.
अजमोदल यास ओव्याचा तिखट वास असून रुचि तीक्ष्ण असते. अल्कहल, इथ्र, हरपुत्तिक किंवा ऑलिव्ह ऑईलमध्यें अजमोदल विद्राव्य आहे, परंतु थंड पाण्यांत तो प्राय: अविद्राव्य आहे. हा कर्बाम्लापेक्षां ( कॅर्बालिक अॅसिड ) फार शक्तिमान पूतिनाशक आहे परंतु याच्या अविद्राव्यतेमुळें याचा या कामीं उपयोग करण्यास अडचण येते. याचा संपृक्त जलद्रव ( एक भाग १००० भाग गरम पाण्यांत ), अजमोदल पट्टी व मलम यांचा उपयोग औषधी कामांत होतो.