विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अग्निक्रीडा - मनुष्यानें आपली देहयात्रा चालविण्याकरितां व आपली करमणूक व मनोरंजन होण्याकरितां नानाप्रकारच्या कल्पना शोधून काढल्या आहेत. त्यांपैकींच अग्निक्रीडा किंवा आतषबाजी ही होय. अग्नि, ज्वालाग्राही पदार्थ, स्फोटक द्रव्याच्या संयोगानें दृष्टीस आनंददायक व मनाची कांहीं वेळ करमणूक करणारी अशी ही कल्पना आहे. हिंदु लोकांच्या चौसष्ट कलांचे यादींत अग्निक्रीडेचा निर्देश नसल्यानें दारुकाम तयार करण्याची कला आपले देशांत केव्हां व कोणी सुरु केली हें निश्चयात्मक सांगतां येणें शक्य नाहीं. बंदुकीची दारु तयार करण्यास जीं द्रव्यें लागतात, त्याच द्रव्यांत फेरफार करुन आतषबाजीचे प्रकार तयार करितात. महाभारतांत शतघ्नी, युद्धयंत्रें वगैरे शब्द योजलेले आढळतात. परंतु शतघ्नी म्हणजे आधुनिक काळीं जीस तोफ किंवा machine gun म्हणतात, त्याच तत्त्वावर तयार केलेलें यंत्र होतें किंवा कसें ह्याचा खात्रीलायक निर्णय होणें कठीण आहे. कारण आपले देशांत सुसंगत व विश्वसनीय इतिहास किंवा बखरी लिहून ठेवायचा प्रघात नसल्यामुळें कल्पनाशक्तीवरच पुष्कळदां अवलंबून रहावें लागतें. बंदुकीची दारु, फटाके वगैरे करण्याची कला चिनी लोकांनी प्रथम शोधून काढली व त्यांचेपासून इतर देशांत पसरली असा साधारण समज आहे. रोमनलोकांचे सर्कशींत - दारुकाम उडवीत. ग्रीकलोक शत्रूशीं दर्यांतील युद्धाचे वेळी ज्वालाग्राही पदार्थानें भरलेली जहाजें पेटवून शत्रूच्या जहाजांना जाळण्याकरितां व या रीतीनें शत्रूस घाबरवून जेरीस आणण्याकरितां सोडीत असत. क्यारिनस व डायोक्कीशन या दोन रोमन बादशाहांच्या सन्मानार्थ दारुकाम उडविण्यांत आलें होतें अशी वर्णनें आहेत. तसेंच क्लाडिअयन याचे ग्रंथावरुन असेंही दिसतें कीं, चक्राप्रमाणें फिरणारें, व पावसाप्रमाणें देखावा दाखविणारें दारुकाम इ. सनाच्या चौथ्या शतकांत तयार होत असे. तसेंच दर्यावरील व जमिनीवरील युद्धप्रसंगीं अग्नीचे गोळे शत्रुसैन्यांत फेंकण्याची युक्तीही त्या काळीं निघाली होती.
ग्रीस, रोम आदिकरुन मुख्य राष्ट्रांचा र्हास झाल्यानंतर कांहीं कालपर्यंत ही कला बहुतेक युरोपखंडांत नामशेष झाली होती. परंतु क्रूसेडर्स (ख्रिस्ती धर्मयुद्धांतील वीर) यांनी पूर्वेकडील लोकांपासून बंदीकीची दारु व इतर स्फोटक द्रव्यें करण्याची कला शिकून आपले देशांत त्याची माहिती नेल्यावर पुन्हां युरोपमध्यें त्या कलेचा प्रसार झाला. हिंदुस्थानांत जसें कांही ठिकाणी विजयादशमीचे दिवशीं रावणाचीं मोठाली बांबूचीं कागदानें मढविलेलीं चित्रें करुन त्याचे आंत दारु घालून त्यास पेटवून देतात, त्याचप्रमाणें फ्लारेन्स वगैरे शहरीं सन १५४० पर्यंत बायबलांतले कांही प्रसंगांस साजेल अशा तर्हेचीं लांकडीं किंवा कागदी मोठीं चित्रें करुन त्या चित्रांत दारु घालून पेटवून देत.
याच धर्तीवर इंग्लंड, फ्रान्स वगैरे देशांतही (Festivals) होळ्या किंवा अग्न्युत्सव करीत असत. व हा प्रघात अद्यापिही कांहीं ठिकाणीं चालू आहे.
सोरा, गंधक व लाकडी कोळसा हे जिन्नस मुख्यत्वेंकरुन बंदुकी दारुचे घटकावयव आहेत. त्यांतच मनशीळ, पोलादाचा कीस वगैरे पदार्थ मिसळले म्हणजे उडविण्याची दारु तयार होते. निरनिराळ्या रंगांचीं फुलें व गोळे दारु उडविते वेळेस निघण्याकरितां मिश्रणांत अनेक रासायनिक द्रव्यें घालावी लागतात. त्यांची संपूर्ण माहिती या स्थळीं देणें अशक्य आहे. नमुन्याकरितां एक दोन कृति खालीं दिल्या आहेत.
फिरतें चक्र करण्याची कृति. | |
बंदुकीची दारु | २४ भाग |
सोरा | १० |
गंधक | ७ |
कोळसा | ५ |
पोलादाचा कीस | ८ |
हिरवे तारे करण्याची कृति. | |
पोटाशम क्लोरेट | १० |
बेरिअम नायट्रेट | ४८ |
गंधक | १२ |
कोळसा | १ |
लाख | ५ |
रसकापूर | ८ |
तांब्याचा कीस (कापर सल्फाईड) | २ |
खुद्द पेशवाईंत आतषबाजीस बरेंच उत्तेजन मिळत होतें असें पेशव्यांच्या बखरींवरुन व त्या वेळच्या दरबारांचीं वर्णनें इंग्रजी ग्रंथकारांनीं लिहून ठेवलीं आहेत त्यांवरुन सिद्ध होतें. दरबार, लग्नसमारंभ किंवा इतर महत्त्वाचे प्रसंगीं दारु काम होऊन तो समारंभ पुरा व्हावयाचा अशी पूर्वीची वहिवाट होती. ह्या वेळीं पेशवे सरकार व इतर खाशी मंडळी पर्वतीचे टेंकडीवरुन आतषबाजी पाहत असत. व दारुकाम पर्वतीचे तळ्याभोवतीं होत असे. अलीकडे नवीन शास्त्रीय शोधा निघाल्यामुळें आतषबाजी ( Pyrotechny) या कलेमध्यें पुष्कळ सुधारणा झाली आहे. व नवीन नवीन तर्हेच्या कामाची भर पडली आहे. पेशव्याचे वेळीं दारुकाम होत असे त्याची यादी मिळाली आहे ती खालीं दिली आहे. त्या माहितीवरुन पेशव्याचे कारकिर्दीत सुध्दं या कलेंत महाराष्ट्र पाठीमागें नव्हता असें सिद्ध होतें. सवाई माधवरावाच्या लग्नाच्या वेळच्या अग्निक्रीडेचें वर्णन पेशवाईच्या बखरींत आहे.
तावदाणी रोषणी - यांत कांचेच्या कमानीस भिंगें लावून त्यांत दारुकाम करण्याची व्यवस्था होती.
आकाशमंडळ - तारागण - हें दारुकाम बाणाप्रमाणें असून तें आकाशांत उंच फेंकल्यानंतर चित्रविचित्र रंगाचे तारे दिसत असत.
नारळी झाडें - ह्यांस अग्नि लावल्याबरोबर तोफेसारखा मोठा आवाज होऊन त्यांतून रंगीबेरंगी सर्पाकृति देखावे वगैरे निघत असत.
प्रभा चमक - ह्यांत फिरतीं चित्रें असून सोनेरी व रुपेरी रंगांमुळें हे काम फार शोभिवंत दिसत असे.
ह्यांखेरीज पुष्कळ प्रकारचे बाण, पांखरें, फुलें, झाडें इत्यादि प्रकारची रंगीबेरंगी रोषणाई दिसत असे.
स्वदेशी अग्निक्रीडेमध्यें खालीं दिलेले प्रकार आढळून येतात.
घडेबाजी, भुईनळ, नळा, चंद्रजोत, तारा, चांपा, चिचुंदरी, जातीण, पेठी, फुलझाडी, फुलझाड, फुलबाजी, मेहताब, बाजा, चक्र, शिंगर, सुरसुरी, हातनळा, लंका, दारुचा डल्ला वगैरे.
नवीन शास्त्रीय शोध युरोपीयन देशांत झाल्यामुळें पुष्कळसें स्वदेशी दारुकाम मागें पडून विलायती माल त्याऐवजीं मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानांत येऊं लागला आहे. व इतर धंद्यांप्रमाणे हा धंदाही हलके हलके परकीयांच्या हाती जाण्याचे पंथास लागला आहे. इकडे सुशिक्षित लोक व रसायनशास्त्रवेत्ते यांचे लक्ष गेल्यास ह्या धंद्याचें पुनरुज्जीवन होईल असें वाटतें.