विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अथेन्स : ग्रीसचें राजधानीचें शहर. हे आटिका मैदानाच्या दक्षिण टोंकाला वसलें आहे. अथेन्सच्या भौगोलिक रचनेचा एकंदर इतिहासावर फार परिणाम झालेला आहे. आटिाका मैदानांत सर्व प्रकारच्या खाद्योपयोगी वस्तु उत्पन्न होत असल्यामुळें अथेन्समध्यें उपजीविकासाधनांची कांहीं तूट नाहीं. एखादें शत्रुसैन्य जमिनीवरून अथेन्सवर अचानक छापा घालूं म्हणेल तर तें शक्य नाहीं व समुद्रापासून बरेंच दूर असल्यामुळें समुद्रावरून आरमार अचूक मारा करील याचीहि अथेन्सला काळजी बाळगावयास नको. येथील हवामान सामान्यत: समशीतोष्ण आहे, तथापि केव्हां बदलेल याचा नेम नसतो. उत्तरेकडील वारे आणि समुद्रलहरींच्या वायूमुळें येथें उन्हाळा फार थंड असतो. स्वच्छ व उत्तेजक हवेमुळेंच येथील लोक बुद्धिमान आणि उत्साही आहेत असें कित्येक जुन्या ग्रंथकारांचे म्हणणे आहे.

अगोरा म्हणून अथेन्समध्यें एक प्रसिद्ध व्यापाराची पेठ असे. या ठिकाणीं भरभराटीचा व्यापार चालत असून मोठाल्या भव्य इमारती होत्या.

अथेन्समधील महत्वाचें स्थळ म्हणजे ज्या ठिकाणी प्लेटो आणि आरिस्टाटल शिकवीत असत ती अकॅडमी होय, शोधकांच्या प्रयत्नांमुळें ज्यांत निसर्गदेवतेचें आणि अपोलोचें वास्तव्य होतें अशा दोन गुहा सांपडल्या आहेत. अथेन्समधील दुसरें महत्त्वाचें स्थान म्हणजे ऑलिंपिअन देऊळ होय.

अथेन्सची लोकसंख्या १८३४ त ५००० हून कमती होती ती १८७० त ४४५१०, १८७९ त ६३३७४, १८८९ त १०७२५१ आणि १८९६ त १११४८६ अशी वाढत गेली. सध्यां अथेन्स, पिरिअस, फेलेरॉन मिळून लोकसंख्या सुमारें ३,००,००० इतकीं आहे. १९१२ सालीं अथेन्स मध्यें दोन विश्वविद्यालयें स्थापन झालीं.

अर्वाचीन कालांत अथेन्सचा व्यापारधंदा फार वाढत्या प्रमाणावर आहे. पिरिअस मध्यें ८ कापडाच्या गिरण्या असून, १५ वाफेनें चालणार्‍या पिठाच्या चक्क्या, साबणाचे कारखाने आहेत. बोटी बांधण्याचा धंदा फार मोठया प्रमाणावर चालतो.

अथेन्सच्या प्राचीन इतिहासाविषयीं खात्रीलायक माहिती फारशी उपलब्ध नाहीं. दंतेकथेवरून व परंपरागत माहितीवरून पाहतां असें कळतें कीं आयोनिअन लोक अथेन्समध्यें आले व त्यांच्या प्रयत्नानेंच निरनिराळया ज्ञातींचे एकीकरण होऊन राजसत्ता स्थापन झाली. परंतु या राजसत्तेचा लवकरच अंत होऊन महाजनसत्ता अस्तित्वांत आली व लोकांचे राजकीय हक्क एकामागून एक हिरावून घेतले जाऊं लागले. शेवटीं पेसीट्रेटस या अरेरावी सरदाराच्या स्वामित्वाखालीं एकतन्त्री राज्यपद्धतीचें भूत अथेन्समध्यें मनमुराद वावरूं लागलें. परंतु या भुताला ताळयावर आणण्याचें काम क्लीस्थिनीझ या पंचाक्षर्‍यानें पत्करून, आपल्या कर्तबगारीनें तें भूत गाडून टाकलें व प्रजासत्ताक राज्याची मुहूर्तमेढ अथेन्समध्यें रोंवली.

स्वतंत्रतेबरोबरच उत्साह अंगी बाणल्यामुळें अथेनिअनांनी इ.स. पूर्वी ४५० या वर्षी इराणावर विजय मिळविला. या विजयाचें पुष्कळसें श्रेय थेमिस्टोक्लीझ या प्रसिद्ध मुत्सद्याला आहे. इराणच्या पराभवानंतर अथेन्सनें आरिस्टिडीझ व सायमन यो दोन प्रसिद्ध मुत्सद्यांना आपलें पुढारीपण दिलें. यांच्या कर्तबगारीनें व कर्तव्यपरायणतेनें अथेन्सला डेलिअन संघाचे अध्यक्षत्व मिळून, अथेन्स साम्राज्य या पदवीस जाऊन पोंचलें. सायमनच्या नंतरचा महत्त्वाचा मुत्सद्दी म्हणजे पेरिक्लीझ हा होय. याचें धोरण अथेन्स साम्राज्याचा सरराहा प्रसार करणें हें होतें. इ.स. पूर्वी ४४३-४२९ हीं वर्षें म्हणजे अथेन्सच्या पूर्ण वैभवाचा उज्ज्वल काळ होय. या वेळीं अथेन्सचा व्यापार ईजिप्त आणि कोलचिझपासून तों इटृरिआ व कार्थेजपर्यंत सारखा पसरलेला होता. वाङमय आणि संस्कृतिविषयक बाबतींत तर अथेन्स उच्च शिखरावर विराजित झालें होतें. तथापि या उज्ज्वल वैभवचित्राला लेशमात्र कलंक नव्हता असें म्हणतां यावयाचें नाहीं. पेरीक्लीझच्या नंतर अथेन्सला जें मंत्रिमंडळ मिळालें तें नालायक किंवा स्वार्थसाधु असल्यामुळें साम्राज्यप्रसाराचें धोरण नेटानें चालवूं शकलें नाहीं आणि अथेन्सच्या वैभवाचा पेलापोनीशिअन युद्धांत अंत होऊन मासिडोनच्या फिलीपच्या अंमलाला अथेन्सला मुकाटयानें मान वांकविणें भाग पडलें. हा परकीय अंमल इ. स. पूर्वी २२९ या वर्षीं दूर झाला आणि अथेन्स फिरून एकदां स्वतंत्र झालें. या वेळीं अथेन्सला लष्करी राष्ट्र म्हणून जरी मान नसला तरी लोकसत्ताक राजपद्धतीचें पुरस्कर्तें राष्ट्र म्हणून त्याची सबंध यूरोपभर ख्याती होती.

यापुढील अथेन्सचा इतिहास म्हणजे केवळ परतन्त्र राष्ट्राचा नसला तरी रोमन साम्राज्याखालील राष्ट्राचा इतिहास होय. इ. स. पूर्वी २२८ या वर्षीं अथेन्सनें रोमशीं मैत्री जोडली. रोमन बादशहांचा अथेन्सवर फार लोभ असे. या वेळचें अथेन्स हे लढवय्यें राष्ट्र नसून पंडितांचें राष्ट्र होतें. `ज्ञानाचें माहेर घर’ अशी त्याची या वेळीं कीर्ति होती. परंतु हें वैभवहि अथेन्स फार दिवस भोगूं शकलें नाहीं. जस्टिनीअनच्या कायद्यानें तत्त्वज्ञानाचा अभ्यास बंद होऊन प्राचीन अथेन्सचा अवतार येथेंच संपला.

यापुढील अथेन्सचा इतिहास म्हणजे बिझान्शिअमच्या अंमलाचा काळ, लॅटिन अंमलाचा काळ, व तुर्क अंमलाचा काळ, अशा तीन भागांत विभागतां येईल. इ. स. १४५४ त तुर्कांनीं अथेन्स जिंकलें. १८२१ त, अथेन्सनें तुर्कांना हुसकावून लावण्याच प्रयत्न केला पण १८२६ तें फिरून तुर्कीं अंमलाखालीं गेलें. १८३३ सालापर्यंत तुर्कांचा आक्रापोलीसच्या दुर्गावर अंमल होता. १८३३ त अथेन्स हें नूतन ग्रीसच्या राज्याचें राजधानीचें शहर बनलें. गेल्या दोनतीन वर्षांत अथेन्समध्यें घडलेल्या सर्व गोष्टींचा इतिहास ग्रीस या लेखांत येईल, कारण त्यांचा सर्व ग्रीसच्या इतिहासाशीं संबंध पोंचतो.