विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अथमलिक : बंगालमध्यें ओरिसाचें एक मांडलिक संस्थान, याच्या उत्तरेस रैराखोलचें संस्थान, दक्षिणेस महानदी, आणि पश्चिमेस सोनपूर व रैराखोल हीं आहेत. प्रतापदेव हा या संस्थानचा मूळ पुरुष होय अशी दंतकथा आहे. पुरीच्या राजानें त्याच्या सात भावांपैकीं दोघांस ठार मारिल्यावर, त्यानें अथमलिक येथें येऊन डोम राजास ठार मारून संस्थान आपल्या ताब्यात घेतलें. १८९४ मध्यें इंग्रजांनीं येथील राजास ओरिसांतील इतर संस्थानिकांप्रमाणें सनद दिली. संस्थानचें उत्पन्न ७१००० रु आहे. राजा इंग्रजांस वार्षिक खंडणीदाखल ४८० रु, देतो. इमारती लांकूड, तांदूळ, व गळिताचीं धान्यें यांचा व्यापार बैलगाडयांनीं व नावांनीं होतो. येथे कटकवरुन जावें लागतें. बी. एन. रेलवेवर हें स्टेशन आहे. पाऊस सरासरी ५१० .८२० असतो. लोकसंख्या (१९११) ५३७६६.