विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकोला जिल्हा -  वर्‍हाडांतील एक जिल्हा.  उ.अ. २० १७' ते २१ १६' व पू.रे. ७६ २४' ते ७७ २७'. उत्तरेस मेलघाट डोंगर, पूर्वेस दर्यापूर आणि मूर्तिजापूर तालुके.  दक्षिणेस मंगरुळ, बाशीम आणि मेहकर तालुके; पश्चिमेस चिखली आणि मलकापूर तालुके. प्रदेश बहुतेक सपाट आहे.  यांतून पूर्णा नदी वहात असून जमीन काळी व सुपीक आहे.  पाइनघाट खोर्‍याच्या मध्यभागीं हा जिल्हा वसलेला आहे.  काळवीट, रानडुकरें, नीलगाई, चित्ते हीं रानटी जनावरें सांपडतात.

येथें उन्हाळा अति भासतो.  त्यावेळीं मेलघाटांतील नर्नाळा किल्ल्यावर जरा उष्णता कमी असते.

सरासरी ३४ इंच पाऊस असतो.  अवर्षणाच्या वेळीं येथे गुरांची फार वाईट स्थिति असते व असंख्य मृत्युमुखीं पडतात.  

अकोला पूर्वी कधींहि स्वतंत्र असें राज्य नसल्यानें त्यास स्वतंत्र इतिहास नाहीं.  या भागांत अडगांव आणि बाळापूर येथील लढाया व नर्नाळा किल्याचे दोन वेढे प्रसिद्ध आहेत.  अकबराच्या कारकीर्दीत हा जिल्हा नर्नाळा सरकाराच्या ताब्यांतील एक परगणा होता.

इ.स. १८५३ सालापर्यंत (त्या साली ब्रिटिशांकडें निजामांनीं वर्‍हाड लावून दिला ) निजामच्या जमीन वसूली पद्धतीमुळें तंटे बखेडे फार होत असत.  इ.स. १८४१ सालीं जामोदच्या तटावर मोंगलरावनें भोंसल्याचें निशाण रोवलें होतें.  इ.स. १८४४ सालीं अकोल्यास कांहीं धार्मिक प्रकरणावरुन बराच बखेडा माजला होता.  परंतु इलिचपूरच्या ब्रिटिश कामगारानें तो मोडला.  स. १८४९ सालीं अप्पासाहेबानें उभारलेलें बंड ब्रिटिश सरकारनें लष्करी उपायानें मोडून टाकलें. मोगलाईंत  किंवा त्याच्या पूर्वी या जिल्ह्याची किंवा परगण्याची व्याप्‍ती किती असावी हें सांगतां येत नाहीं.  शके १६८५ च्या एका पत्रांत मौजे धामणगांव परगणे अकोलें येथून १५० बैल पंधरा खंडा गल्ला भरुन पुण्यास रवाना केल्याचा व त्यावर जकातीचा तगादा करूं नये असा उल्लेख आहे.  (राजवाडे खं. १०-१६-८) वर्‍हाड ब्रिटिशांकडे आल्यावर त्याचे पूर्व व पश्चिम वर्‍हाड असे दोन भाग केले गेले.  इ.स. १८६७ पासून १८७२ पर्यंत अकोला हें पश्चिम वर्‍हाडाचें मुख्य ठिकाण होतें.

प्राचीन प्रेक्षणीय स्थळें — नर्नाळा आणि बाळापूर येथील किल्ले; बाळापूर येथील छत्री; पातूर डोंगरांतील दोन विहार; आणि या भागांत सांपडणारी हेमाडपंती देवळें.  त्यांपैकीं वाशी टाकळी येथील देऊळ प्रेक्षणीय आहे.

या जिल्ह्यांत एकंदर गांवें व खेडीं यांची संख्या ९७६ आहे.  एकंदर लोकसंख्या सुमारे सातलक्ष अठ्याण्णव हजार आहे.  या जिल्ह्यांत पांच तालुके होते.  त्यांची नांवें — अकोला, अकोट, बाळापूर, खामगांव, जळगांव.  मुख्य गांवें — अकोला, खामगांव, अकोट आणि शेगांव.  या जिल्ह्यांतील जमीनकाळी लापण जातीची असून सुपीक आहे.  ४२ जहागीरीचीं गांवें सोडून दिलीं तर सर्व जिल्हा रयतवारी आहे.  मुख्य पिकें — ज्वारी, कापूस.  वर्‍हाडी गुरांची खामगांव व उमर्दा या अवलाद या जिल्ह्यांत आहेत.  घोडी, मेंढरें चांगल्या जातीचीं नाहींत.  इ.स. १९०३-४ सालीं फक्त २१ चौरस मैल बागाईतीखालीं होती.  जमीन सुपीक असल्यामुळें या जिल्ह्यांत जंगल महत्त्वाचें नाही.  जंगलांत सालई, खैर, साग, बाभूळ वगैरे झाडें सांपडतात.

मुख्य व्यापार म्हटला म्हणजे कापसाचे गट्ठे करुन बाहेर पाठविणे.

जी.आय.पी. व सी.पी. रेलवे या जिल्ह्यांतून आहे.

दुष्काळ —पाटबंधार्‍याची सोय नसल्यामुळें लोकांस पावसाच्या पाण्यावरच सर्वस्वी अवलंबून राहणें भाग पडतें.  पावसानें टाळा दिल्यास दुष्काळ पडण्याचा बराच संभव असतो.  इ.स. १८६२, १८९६-९७ व १८९९-१९०० चे दुष्काळ लोकांस बरेच भोंवले.  इ.स. १९०० सालीं ८९८८० माणसें दुष्काळाप्रीत्यर्थ काढलेल्या कामावर होतीं व २२६४२ लोकांस तगाई देण्यांत आली होती.  या जिल्ह्यांतील त्या साली अर्धी गुरें प्राणास मुकलीं असावीं असे म्हणतात.

राज्यव्यवस्था - इतर जिल्ह्यांप्रमाणे.

इ.स. १९०३-४ सालीं जमीनमहसुलींचे उत्पन्न २२५४००० व एकंदर उत्पन्न ३१३९००० रुपये होते.

शिक्षणाचें प्रमाण शेकडा ५.२ आहे.

इ.स. १९०५ साली वर्‍हाडच्या सहा जिल्ह्याच्या क्षेत्रात फेरबदल करण्यांत आला.  त्यावेळी उमरावती जिल्ह्यांतील मूर्तिजापूर तालुका व बाशिम आणि मंगरुळ हे पूर्वीच्या बाशिम जिल्ह्यांतील तालुके यांचा समावेश अकोला जिल्ह्यांत करण्यांत आला.  बाशिम जिल्हा नाहींसा केला व अकोला जिल्ह्यांत मोडणारे खामगांव व जळगांव तालुके बुलढाण्यास जोडण्यांत आले.  अकोला जिल्ह्यांचे हल्लींचे क्षेत्रफळ ४१११ चौ. मैल व लोकसंख्या सात लक्ष अठ्याण्णव हजार पांचशे चवेचाळीस (१९२१ ची खानेसुमारी) आहे.