विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अक्कड - अक्कड हें बाबिलोनियामधील निमरुड राज्याच्या केंद्रस्थानीं जी चार शहरें होतीं त्यांपैकीं एकाचें हिब्रु नांव आहे. या शहराचा उल्लेख जुन्या करारांत एक वेळ आला आहे. पूर्वीचा बाबिलोनिन राजा पहिला सारगन याच्या राजधानीचें जें अगडे नांवानें प्रसिद्ध शहर तें व अक्कड हें एकच असावें असा अंदाज आहे. बॉबिलोनियाचा शेवटचा सेमिटिक राजा, नबोनिडस (५५५-५३७ इ.स. पूर्वी) यानें सारगन राजाचा काळ इ.स. पूर्वी ३८०० वर्षे दिला आहे. कदाचित् हा राजा खि.पू. ७०० किंवा त्या अगोदर १०० वर्षे झाला असावा. असाहि संशोधकांचा तर्क आहे. अगडे हें नांव पुष्कळ शिलालेखांत आढळतें. अगडे पासून अक्कड हा असुरी बाबिलोनियन सेमेटिक अपभ्रंश असावा.
अगडे शब्दाचा अर्थ 'अग्निमुकुट ' ( अग=अग्नि वदे =मुकुट ) असा होतो. याचा संबंध इश्तर (Ishtar) च्या पूजेकडे असावा. कारण नबोनिडसच्या अधारावरुन असें दिसतें किं इश्तरच्या नंतर अनुनित देवतेची उपासना अगडे येथें सुरु झाली. या अनुनित देवतेचें देवालय सिप्पुर येथें होतें. अगडे — अक्कड हें सिप्पुरच्या समोर, युफ्रेटिस नदीच्या डाव्या तीरावर असून सिप्पूर शहरचा अतिशय जुना भाग असावा असा तर्क आहे.
असुरी बाबिलोनियन वाङ्मयांत अक्कड हें नांव सुमेरुचे बरोबर राजांच्या बिरुदावलींत सांपडतें. याचा अर्थ प्रोफेसर मेक्कर्डी यांच्या मतांप्रमाणें, एवढाच निघतो कीं, आक्कड शहर व अक्कडचा प्रांत यावर राजाचा हक्क आहे.
(प्रस्तावना खंड विभाग ३ सुमेरु, आणि असुर, बाबिलोनिया हे शब्द पहा.)