विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकाली - हा पंथ इतर शीखपंथांहून वेगळा आहे.  नाग किंवा गोसावी लोकांप्रमाणें अकाली संग्रामोत्सुक असतात. शीखांचा दहावा व शेवटचा गुरु गुरुगोविंद (१६७५-१७०८) यानें हा पंथ स्थापिला असें सांगतात.  ''अकाली-पुरुष '' ( अनंताचे उपासक ) या नांवापासून ''अकाली ''  ( अमर ) या संज्ञेची कोणी उत्पत्ति लातितात; दुसरे कोणी ''अकाल '' = अमर, देव, या अर्थापासून अकाली म्हणजे ईश्वरोपासक असें समजतात.  ''सत श्री अकाल'' हा अकाल्यांचा रणगर्जनेचा शब्द होय.  अकाली निळा पोशाख वापरतात. ( कृष्णाचा वडील भाऊ बळराम निळा पोशाख वापरी म्हणून त्याला नीलांबर असें नांव आहे ).  हातांत पोलादी कांकणे घालतात व बारीक खंजीर चाकू, एक लोखंडी साखळी आणि पोलादी चक्रें आपल्या उंच निमुळत्या निळ्या रंगाच्या पागोट्यांत खोवितात.  कांही थोडे अकाली जटा वाढवितात.  जे जटा वाढवीत नाहींत ते फक्त 'दूर' आणि 'लोटा ' पाणी वापरतात; ते धुम्रपान करितात. पण जटाधारी तसें करीत नाहींत.  कांहीजण निळ्या फेट्याखालीं पिवळा फेटा बांधितात.  

संग्रामसामर्थ्यावरुन अकाल्यांना 'निहंग' म्हणजे बेफिकीर असें म्हणतात.  शीख इतिहासांत यांनी बरीच कामगिरी बजावली आहे.  इ.स. १८१८ तील मुलतानच्या वेढ्यांत त्यांनी अचानक रीतीनें बाह्य तट घेऊन किल्ला सर करण्याच्या बेतांत आणिला होता.  फुलासिंगच्या चरित्रावरुन यांचे गुणदोष चांगले समजतील. १८०९ मध्यें जेव्हां अमृतसर येथें मेटमाफवर छापा पडला त्यावेळीं हा फुलासिंग प्रथम त्या छाप्याचा पुढारी म्हणून प्रसिद्धीस आला.  नंतर रणजितसिंगानें त्याला सिंधखोर्‍यांस मुख्य अधिकारी नेमिलें. त्या ठिकाणीं मुसलमानी प्रजेचा त्यानें अतोनात छळ केला.  पुढें त्याला काश्मीरांत धाडिलें. रणजितसिंग फुलाला वचकून असे. १८२३ मध्यें तेरीच्या लढाईंत फुलासिंग व त्याचे अकाली अनुयायी यांनीं रणजितसिंगाच्या बाजूनें लढून यूसफझईंचा चांगला पराभव केला.  पण या लढाईंत शौर्य गाजवीत असतां फुलाला मरण आलें.  नौशहरांतील त्याची समाधी हिंदुमुसलमानांचें हल्ली तीर्थाचें ठिकाण बनलें आहे.

फुलासिंगाच्या नेतृत्वाखालीं किंवा त्याच्याहि आधीं अकाली आपल्या शत्रूंना व मित्रांनाहि सारखेच भीतिप्रद झाले होते.  शीख राजांना त्यांची फार भीति वाटे.  कारण पुष्कळ वेळां अकाल्यांनी त्यांच्याकडून बळजबरीनें धन मिळविलें होतें. १८२३ नंतर खुद्द रणजितसिंगानें त्यांची सत्ता कमी करण्याचा पुष्कळ प्रयत्‍न केला व त्यामुळें या पंथाचें महत्व बुडालें.

अकाल्यांची गादी अमृतसर येथे अकालबूंग नांवानें प्रसिद्ध होती. त्या ठिकाणी अकाली धार्मिक विधींची संथा घेत व गुरुमातेला आव्हान करीत.  खालश्याचा सामान्य पुढारीपणा आपल्याकडे आहे असें ते समजत.  रणजितसिंगाच्या कालापासून त्यांची खरी गादी आनंदपूरला आली आहे, पण त्यांचें वजन बरेचसें कमी झालें आहे असे म्हणण्यास हरकत नाहीं.

या पंथांत ब्रम्हचर्य पाळावें म्हणून आज्ञा आहे.  गुरुचें उष्टें चेला खातो.  इतर शीखांप्रमाणे हे मांस किंवा दारु सेवन करीत नाहींत पण भांग मात्र बेसुमार पितात.

शीखांच्या प्रार्थना मंदिरांना '' गुरुद्वार '' म्हणतात.  या मंदिराच्या देखरेखी करितां एक महंत असे.  पुढें हे महंत दुराचारी निघून शीखभक्तांना त्रास पोहोंचू लागल्यावर १९१९-२० साली गुरुद्वारप्रबंधक कमीटीची स्थापना झाली.  हिचे जे स्वयंसेवक त्यांची गणना ''अकाली'' पंथांत करितात. हल्लीं अकाल्यांची संख्या लाखांनी मोजतां येण्या इतकी आहे.  गुरुद्वारप्रबंधक कमीटीनें गुरुद्वारें आपल्या ताब्यात घेतलीं आहेत व ती महंतांकडून घेतांना रक्तपात सुद्धां झाले.  हल्लीं सरकार या कमीटीवर आपली देखरेख असावी अशी गुरुद्वार बिलानें व्यवस्था करण्याच्या खटपटींत आहे; अकाली शीखांचा या कामी सरकाराशीं पूर्ण विरोध आहे.  नाभाचा संस्थानिक रिपुदमनसिंग यानें गादीचा राजिनामा दिला. (१९२३) त्या कामीं ब्रिटिश सरकारचा कांहीं हात असावा व त्यांनीं या कामांत अन्याय केला अशा समजुतीनें अकाली लोकांनी नाभामध्यें जाऊन सत्याग्रह करण्याचा विचार चालविला आहे.