विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अक्कलकोट मुंबई इलाख्यांतील अक्कलकोट संस्थानचें मुख्य गांव. उ.अ. १७० ३१' व पू.रे. ७६० १५' वर आहे. लोकसंख्या ( इ.स. १९११९, ३०३.) हा गांव जी.आय.पी. रेलवेच्या अक्कलकोट रोड (जुनें नांव कडब गांव ) स्टेशनपासून सात मैलांवर आहे. याच्या भोंवतीं पूर्वी तट असून पलीकडे खंदक होता. हल्लीं तट कांहीं कांहीं ठिकाणीं पडला असून खंदकही अर्धवट भरुन गेला आहे. येथील नांव घेण्यासारख्या इमारती म्हटल्या म्हणजे जुना राजवाडा, नवीन राजवाडा, छत्र्या व हायस्कूल या होत. राजवाड्याच्या शस्त्रागारांतील शस्त्रांचा संग्रह प्रेक्षणीय आहे. (इं. ग्या. ५)
अक्कलकोट मुंबई इलाख्यांतील एक संस्थान. मु. सोलापूर हें संस्थान सोलापूरच्या आग्नेयीस असून संस्थानचा पोलिटिकल एजंट सोलापूर जिल्ह्याचा कलेक्टर असतो. खुद्द अक्कलकोट शिवाय या संस्थानाकडे माळशिरस तालुक्यांतील सहा गांवे व खटाव तालुक्यांतील कुर्ले हें गांव आहे. या संस्थानांत एकंदर १०३ गांवें (१ गांव व १०२ खेडीं असून एकंदर क्षेत्रफळ ४९८ चौरस मैल आहे. त्यापैकी एकंदर १३ चौरस मैल जंगल आहे. ३९ चौरस मैल जमीन लागवडी योग्य नाही. लोकसंख्या १८८१ मध्यें ५८०४० होती; (१८९१) ७५७७४ (१९११) ८९०८२. (१९०१) ८२०४७ एकंदर उत्पन्न १८८१ मध्यें रु. २३५००० होतें. १९०३-०४ सालीं ४५०००० रु. झालें. हल्लीं तें पावणेसहा लाख असून लवकरच जें सेटलमेंट होणार आहे त्यांत आणखी एक लाखानें वाढण्याचा संभव आहे.
मर्यादा :− माळशिरस व खटाव तालुक्यांतील सात गांवें सोडून याच्या उत्तरेस निझामचें राज्य; पूर्वेस पटवर्धन जहागिरी व निझामचें राज्य; दक्षिणेस इंदी तालुका व निजामचें राज्य; आणि पश्चिमेस सोलापुर तालुका.
अक्कलकोटचा प्रदेश समुद्रसपाटी पासून १२०० फूट उंचीवर असलेलें सपाट मैदान असून बहुतेक वृक्षरहित आहे. गांवाभोंवतीं कायतीं आंब्यांचीं वगैरे झाडें दिसतात. या संस्थानाच्या सरहद्दीच्या कांहीं भागावर भीमा व सीमा या नद्या असून या संस्थानांतून बोरी ही नदी वहात जाऊन भीमेस मिळते. हिची एक हरणी ही शाखा आहे. या संस्थानांत विहिरी पुष्कळ असून पाणी जवळ व विपुल आहे. नदी कांठची जमीन काळी असून बाकीची काळवट मध्यम प्रतीची आहे. कांही ठिकाणीं चुनखडी आढळते. बाकी चांगल्या विटा करण्यासारखीहि माती आढळत नाहीं. हवा पावसाळ्याच्या अखेरीस रोगी असते. बाकी हिंवाळ्यांत व उन्हाळ्यांत उत्तम असते. उष्णमान उन्हाळ्यांत १०८० पर्यंत जातें, व हिंवाळ्यांत तें ६२० पर्यंत खालीं उरतें. पाऊस सरासरी ३० इंच पडतो. इ.स. १८८२ मध्यें २०००० एकर जमीन राखीव जंगल म्हणून राखून ठेवण्यांत आली आहे. बाकी बाभळीशिवाय झाडें नाहींत. कुरल्यास मात्र साग व चंदनाचीं झाडें आहेत. वाघ, चित्ते वगैरे क्रुर पशु आढळत नाहींत. कोल्हे, लांडगे कांहीं आढळतात. शिकारीची इतरांना बंदी असल्यामुळें हरणें व काळवीट पुष्कळ आढळतात. खाण्यासारखे पक्षीहि फारसे आढळत नाहीं.
लोकवस्ती हिंदु मुसलमान ख्रिस्ती वगैरे असून हिंदूंमध्यें ब्राम्हण, वाणी, लिंगायत, मराठे, कोळी, धनगर, पांचाळ, म्हार, मांग वगैरे जाती आहेत ९००० विणकर्यांची संख्या आहे. यापैकीं बहुतेक कोष्टी, लिंगायत, पंचम साळी, मुसलमान वगैरे आहेत.
पाणी पुरवठा बहुतेक विहिरींपासून होतो, व पाण्याखालची जमीन दोन पिकें देते. खरीप पिकांमध्यें बाजरी, तूर, अंबाडी, कापूस हीं मुख्य आहेत व रबीमध्यें बहुतेक ज्वारी पिकते. याशिवाय भात, आळशी, हरबरा, गहूं व उंस यांचीहि कांहीं लागवड होते. पूर्वी संस्थानिकाच्या बागेंत नारळींचीं व पोफळीचीं झाडें पुष्कळ होतीं परंतु पर्जर्न्याच्या अभावी हल्ली ती राहिली नाहींत.
कांही गुजराथी व मारवाडी वाणी आणि कांहीं ब्राह्मण सावकारीचा धंदा करतात.
या संस्थानांतून पेनिन्शुला रेलवेचा १८ मैलांचा रस्ता गेला आहे. त्यावर अक्कलकोट रोड हें स्टेशन आहे. हें अक्कलकोटापासून ७ मैल असून दरम्यान उत्तम सडक आहे. येथून ज्वारी व कापड, विड्याचीं पानें, मिरच्या बाहेर जातात व गहूं, डाळी, मीठ, वगैरे जिन्नस बाहेरुन येतात. अक्कलकोट संस्थानास लागून असलेल्या मोंगलाई मुलुखांत उत्पन्न होणारा माल अक्कलकोट शहरामार्फत बाहेर पाठविला जातो.
येथें लुगडी, खण, पागोटीं व खादी इत्यादि प्रकारचें कापड तयार होतें. या संस्थानांत सुमारें १२०० माग असून वर्षास पांच लाख रुपयांचा माल तयार होतो. असें सोलापूर गॅझेटियर मध्यें म्हटलें आहे.
इ.स. १८६६ ते १८७१ यांच्या दरम्यान संस्थानची मोजणी व पैमाश केली होती. त्यावेळीं दर एकरीं सारा सरासरी १२ आणे होता. त्यानंतर पुन्हां १८९४ सालीं जमिनीची नवी पाहणी करण्यांत येऊन तेव्हां जमिनीचा धारा ठरला त्यांत ३० वर्षेपर्यंत बदल करावयाचा नाहीं असे ठरले. प्रथम कांहीं जमीन ओसाड होती परंतु आतां सर्व जमीन लागवलीखाली आली आहे.
ब्रिटिश हद्दींतील कायदे योग्य फेरफारानिशीं संस्थांनांत लागू करण्यांत आलेले आहेत. संस्थानचा एक दिवाण एक मुख्य न्यायाधीश, एक मामलेदार व दोन महालकरी ' चीफ मेडिकल ऑफिसर ' स्टेट ओव्हरसियर पोलीस इन्स्पेक्टर, वॉटर वर्क्स एंजीनियर हायस्कूलचा हेडमास्तर व एज्युकेशनल इन्स्पेक्टर, असे अम्मलदार आहेत. हल्लींच्या राजेसाहेबांच्या बाल्यावस्थेंत गव्हर्नरमेंट कारभारी अशी नवीन जागा करुन दिवाणाकडून त्यास चार्ज देवविण्यांत आला आहे. खुद्द राजेसाहेबास दिवाणी, फौजदारी, मुलकी वगैरेचे पूर्ण अधिकार आहेत. दिवाण हा डिस्ट्रिक्ट आणि सेशनजज्ज व डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतो व सर्व खातीं त्याच्या हाताखाली असतात. न्यायखात्याच्या मुख्य अंमलदारास असिस्टंट सेशनजज्जाचे अधिकारी असून शिवाय अपिलाचेहि कांहीं अधिकार आहेत. न्यायाधीश हा पहिल्या वर्गाचा मॅजिस्ट्रेट असून दिवाणी दाव्याचें प्राथमिक कोर्ट त्याचेंच आहे. मामलेदार हा दुसर्या वर्गाचा मॅजिस्ट्रेट असून शिवाय तो वर्ग केलेले दिवाणी दावे चालवितो. महालकर्यासहि स्थानिक लहान दिवाणी दावे चालविण्याचा अधिकार असून तिसर्या वर्गाच्या मॅजिस्ट्रेटाचेहि अधिकारी त्यास असतात. दिवाणी व फौजदारी कामाचें सर्वांत वरिष्ठ कोर्ट राजेसाहेबांचें असतें. परंतु त्यांच्या हल्लींच्या अज्ञानावस्थेंत त्यांचे अधिकार पोलीटिकल एजंट व मुंबई सरकार वापरतात; व सेशनजज्जानें दिलेली फांशीची शिक्षा अंमलात यावयास खुद्द मुंबई सरकारची मंजुरी लागते.
या संस्थानांत ४१ शिबंदीचे शिपाई ( अलीगोल ) असून ७१ नक्त पगारी पोलीस व कांहीं गांव पोलीस ( गांव पाटील व शेतसनदी ) असून त्यांस काहीं पगार नक्त व कांही बिनसार्याच्या जमीनीच्या रुपानें मिळतो.
संस्थानचे १८८२-८३ सालचें एकंदर उत्पन्न २३५००० रुपयें होतें व त्यापैकी सार्याचें उत्पन्न १४८००० रु. असून लोकलफंड पट्टी ११३०० रु. वसूल झाली होती. १९०३-४ साली सार्याचें उत्पन्न ३,६००० व एकंदर उत्पन्न ४,५०,००० झालें.
१८८२-८३ सालीं संस्थानांत एकंदर १९ शाळा होत्या. हल्लीं थोड्याशा वाढल्या आहेत.
१८७१ सालीं पहिला दवाखाना अक्कलकोट येथें स्थापण्यांत आला असून आता करजगी येथें आणखीहि एक दवाखाना झाला आहे. यापैकीं करजगीस स.अ.सर्जन व अक्कलकोट येथें असिस्टंट सर्जन असतो. अक्कलकोटचा असिस्टंट सर्जन तोच चीफ मेडिकल ऑफिसर असतो. या संस्थानांत अक्कलकोट हेंच काय तें मोठें गांव असून अक्कलकोट शिवाय या संस्थानांत चांफळगांव, जेऊर, करजगी, मंगरुळ, नागनसूर, तोलनूर, बागदरि इत्यादि १० गांवे दोन हजारांच्या वर परंतु पांच हजारांच्या आंत लोकवस्ती असलेली आहेत.
इ ति हा स :- अक्कलकोट संस्थानच्या स्वतंत्र इतिहासास १८ व्या शतकामध्यें आरंभ होतो. १६ व्या शतकामध्यें या प्रदेशाबद्दल विजापूर व अहमदनगर यांच्यामध्यें एकसारखे तंटे चाललेले असत. १७ व्या शतकाच्या आरंभीं या प्रदेशांत मलिकंबराची जमाबंदी पद्धती सुरु होती यावरुन त्यावेळीं हा प्रदेश अहमदनगरच्या राज्यांत असावा.
इ.स. १७१२ मध्यें शाहूनें, १७०७ साली पारद गांवीं तेथील पाटलाच्या बायकोनें त्याच्या पायावर घातलेल्या राणोजी लोखंडे या नांवाच्या मुलास आपल्या घरी आणून त्याचें कुटुंबांतल्या मुलाप्रमाणें पालन पोषण केलें. त्यावर शाहूची इतकी मर्जी होती कीं त्याच्या राहण्याची सातारच्या वाड्यांत स्वतंत्र व्यवस्था करण्यांत आली व त्याला एक मोठी मनसब देण्यांत येऊन तिच्या खर्चासाठीं ३५ लाखांचा मुलूख तोडून दिला गेला. शाहूची विरुबाई नांवाची एक आवडती राख होती. तिचें फत्तेसिंगावर पुत्रवत् प्रेम होतें असें दिसतें. कारण ती मरण पावली तेव्हां तिचें उत्तरकार्य फत्तेसिंगाकडूनच करविण्यांत आलें होतें व यामुळें तिची सर्व जिंदगी व तिच्या हयातींत खर्चासाठीं तोडून दिलेली अक्कलकोट परगण्याचीं जहागिरी कायदेशीर रीतीनें फत्तेसिंगाच्या ताब्यांत आली. अशा रीतीनें फत्तेसिंग हा शाहूचा मानसपुत्र समजला जात असल्यामुळें तो आपल्यास राजा असें म्हणवून घेऊं लागला, व सातारच्या घराण्याप्रमाणें आपणही अष्टप्रधानाच्या नेमणुका करुन त्यानें आपल्या मोठ्या जहागिरींतून या अष्टप्रधानांस जी इनामें तोडून दिली होतीं तीं सातारचें राज्य बुडाल्यावरहि त्यांच्याकडे थोड्या बहुत प्रमाणांत चालूच होतीं. उदा. त्यानें पेशव्यास अजमासें ५०००० रुपये उत्पन्नाचा मैंदर्गी परगणा सबंधचा सबंध इनाम दिलेला होता.
फत्तेसिंग हा कोल्हापुर ( १७१८ ) बुंदेलखंड ( १७३० ) भागानगर, कर्नाटक वगैरे ठिकाणच्या स्वार्यांत स्वतः हजर होता. १७४९ त शाहू निवर्तल्यावर तो अक्कलकोट येथें जाऊन राहिला, व तेथे तो १७६० सालीं मरण पावला (फत्तेसिंग भोंसले पहा). फत्तेसिंगांच्या मागून त्याचा भाऊ पारद येथील पाटील बाबाजी लोखंडे याचा पुत्र शहाजी हा गादीवर बसला. याला फत्तेसिंगानें पांच वर्षापूर्वी पेशव्यांच्या मंजुरीनें दत्तक घेतलें होतें. फत्तेसिंग वारल्यावर त्रिंबक हरी पटवर्धन शहाजीस बरोबर घेऊन पेशव्याकडे आला. अक्कलकोटच्या जहागिरीची ही भानगड पुढें दोन तीन वर्षे चालू होती. अक्कलकोटकरांकडे बाबूजी नायकाचें कर्ज येणें होते, त्यासाठी जहागिरीची वहिवाट आपल्या हातीं असावी अशी नायकाची खटपट होती. ती मान्य न करतां पेशव्यानें त्रिंबक हरीच्या सल्ल्यानें जहागिरीचा सर्व अधिकारी शहाजीस दिला. यामुळे नायकानें शहाजीच्या मुलुखांत दंगा उसळून त्रास देण्यास आरंभ केला. शहाजी अधिकारारुढ झाला तेव्हां फत्तेसिंगाच्या मोठ्या जहागिरीपैकीं फक्त अक्कलकोटचीच जहागीर त्याच्याकडे राहिली होती. थोरल्या माधवराव पेशव्यांनीं हैदरावर ज्या स्वार्या केल्या त्यांत शहाजी भोसल्याचें पथक जात असे. तथापि अक्कलकोटकर भोंसले हे पेशव्याच्या बरोबरीचें सरदार असल्यामुळें ज्या स्वारींत पेशवे स्वतः जात नसत त्या स्वारींत हजर राहण्याची त्यांच्यावर जबाबदारी नसे. शहाजी १७८९ त मरण पावला व त्याच्या मागून त्याचा पुत्र फतेसिंग ऊर्पच् आबासाहेब हा गादीवर बसला. शहाजीस तुळजाजी नांवाचा आणखी एक मुलगा होता. त्याचे व फत्तेसिंगाचें भांडण होऊन तुळजाजीस फत्तेसिंगानें अटकेंत ठेविलें पण लवकरच तुळाजाजी पेशव्याकडे पळून गेला व त्यानें आपल्या भावाविरुद्ध पुण्याच्या दरबारी तक्रार केली. थोड्याच दिवसांनी सदाशिवराव भाऊ माणकेश्वर यांच्या मध्यस्थीनें भावाभावांत सलोखा होऊन तुळजाजीनें सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यांतील कुर्ला वगैरे ८१०० रुपये उत्पन्नाचीं गांवें घेऊन १८०७ सालीं स्वस्थ बसण्याचें कबूल केलें. सातारचें राज्य इंग्रजांनीं घेतल्यावर ३ जुलै १८२० रोजीं फत्तेसिंगाबरोबर ब्रिटिश सरकारनें तह करुन त्याचा मुलूख त्यास दिला. १८२२ मध्यें (एप्रील १८२३ ?) फत्तेसिंग मरण पावला व त्याचा पुत्र मालोजी हा गादीवर बसला. १८२७ सालीं इंग्रजांनीं मराठे संस्थानिकांची यादी केली तेव्हां अक्कलकोटचें उत्पन्न पुढें दिल्याप्रमाणें होतें.
अक्कलकोट परगणा | २,००,००० |
सोलापूरचा मोकासा | ४,००० |
पुणें शहराच्या जकातीवर मोकसाबाब | १०,००० |
२,२५,००० |
अक्कलकोटच्या भोंसल्यास पूर्वी निजामाच्या मुलुखांत सुमारें २५००० रुपये मोकासबाब वसूल करण्याचा
एक हक्क होता. पुढें अक्कलकोटकरांचा ब्रिटिशांशीं तह झाला तेव्हां इंग्रजांनी भोंसल्याकडून तो हक्क काढून घेतला. निजामाकडून भोंसल्यास ही मोकासबाबीची रक्कम क्वचितच मिळत असे, पण त्यामुळें भोंसल्यास निजामाजवळ त्याची रक्कम मागण्यास व प्रसंगविशेषीं निजामाच्या मुलुखांत स्वारी करण्यास सबब मात्र सांपडत नसे.
इ.स. १८२८ मध्यें मालोजी निवर्तल्यावर त्याचा ८ वर्षांचा मुलगा शहाजी हा गादीवर बसला. तो अज्ञान असल्यामुळें सातारचा राजा संस्थानचें काम पाहूं लागला. परंतु १८२९ साली त्यानें काही बाबतींत फरक केल्यामुळें बोरगांव येथील सरदेशमुख शंकरराव यांच्या नेतृत्वाखालीं रयतेनें बंड केलें तेव्हा सोलापूर व अक्कलकोट येथून कांहीं ब्रिटिश फौज पाठविण्यात आली. परंतु बंडखोरांनी दाद दिली नाहीं. नंतर तपास केल्यावर रयतेचें म्हणणें बरोबर दिसून आल्यामुळें सातार्याच्या राजाकडून कारभार काढण्यांत येऊन तो कॅप्टन जेमसन नांवाचा रीजंट (प्रतिनिधि) नेमण्यांत येऊन त्याच्याकडे सोंपविला. इ. स. १८४९ त सातारा खालसा झाल्यावर अक्कलकोटकर हे ब्रिटिशांचे मांडलिक झाले. इ.स. १८५७ मध्यें शहाजी निवर्तल्यावर त्याचा पुत्र मालोजी हा गादीवर बसला. १८६६ मध्ये मालोजीस गैरकारभाराबद्दल पदच्युत केलें व तो १८७० त मरण पावला. मालोजी मेला तेव्हां त्यास १८६७ सालीं झालेला लहान मुलगा असून त्याचें नांव शहाजी असें होतें. हा त्या वेळीं अल्पवयी असल्यामुळें इ.स. १८९१ पर्यंत ब्रिटिश सरकारच संस्थानची सर्व व्यवस्था पहात होतें. त्या वर्षी शहाजीस सर्व अधिकार देण्यांत आले, परंतु तेंहि पुढें १८९८ सालीं तो निपुत्रिकच मरण पावला, तेव्हां त्याच्या स्त्रीनें ब्रिटिश सरकारच्या संमतीनें पहिल्या शहाजीचे वंशज कुर्ल्याचे जहागीरदार गणपतजी भोंसले यांचे पुत्र फत्तेसिंगराज यास दत्तक घेतलें. हे वयांत येईपर्यंत पुन्हा पूर्ववत् व्यवस्था करण्यांत आली. पुढें हे वयांत आल्यावर १९१६ सालीं त्यांच्या हातीं अधिकारसूत्रें देण्यात आलीं, या राजाच्या कर्तृत्वाविषयी लोकांची अपेक्षा बरीच होती परंतु १९२३ सालीं पुणें येथील सासून इस्पितळांत उपचारासाठीं व शस्त्रक्रियेसाठीं गेले असतां औषधाच्या ( बेरियमसल्फेट) ऐवजीं विषारी द्रव्य (बेरियम सल्फाईड) पोटांत जाऊन त्यांना अपमृत्यु आला.
अक्कलकोटकर संस्थानिक हे पहिल्या प्रतीचे सरदार असून त्यांस दत्तक घेण्याचा अधिकार आहे. त्यांना सलामीचा मान नाहीं. त्यांना खंडणी द्यावी लागत नाहीं. परंतु १८२० च्या तहांत संस्थानिकांनी ब्रिटिश सरकारांत घोडेस्वारांचे पथक आपल्या खर्चानें ठेवावयाचें अशी एक अट होती ती १८६८ साली बदलून तिच्याबद्दल फक्त रुपये द्यावयाचें ठरल्यामुळें ते ब्रिटिश सरकारास दरसाल १४५९२ रुपये देत असतात. सध्यां फत्तेसिंगराज यांच्या मागून त्यांचे पुत्र विजयसिंह हे अक्कलकोट संस्थानचे वारस आहेत. पण यांचें वय हल्लीं अवघें ८ वर्षांचें असल्यामुळें ते वयांत येईपर्यंत इंग्रजांनीं त्या संस्थानाचा कारभार चालविण्याकरितां आपल्याकडून कारभारी नेमला आहे.