विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अगस्त्य - वैदिक माहिती ३ र्‍या विभागांत आली आहे.  येथें फक्त पौराणिक माहितीच देतों.  स्वायंभू मन्वंतरांतील ब्रह्ममानस पुत्र जो पुलस्त्य ॠषी, त्यापासून कर्दम प्रजापतीची कन्या हविर्भुवा, तिच्या ठायीं झालेल्या दोन पुत्रांतील जेष्ठ, याच्या दुसर्‍या सहोदराचें नांव विश्रवा ॠषि असें होते.  (पुलस्त्य शब्द पहा )

२ पूर्वी कित्येक असुर समुद्रामध्यें लपून राहून, इंद्रादिक देवांस, ॠषीस, व इतर प्रजेस अतिशय पीडा देत.  समुद्र शोषल्यानें नाहींसा होऊन, सकल प्रजेसहित आपण सुखी होऊं, असे मनांत आणून इंद्रानें, अग्नि आणि वायू यांस समुद्र शोषण्याची आज्ञा केली.  तिचा त्यांनी अनादर केल्यामुळें त्यानें सक्रोध होऊन,  दोघांसही असा शाप दिला होता कीं, तुम्हांस मुत्युलोकीं जन्म घडेल.  त्याप्रमाणें या चालू वैवस्वत मन्वंतरांत त्या उभयतांस मित्रवरुणांपासून एकाच देहानें जन्म घडले,  त्यासच अगस्त्य असें नांव होतें.  येथें त्यास भ्राता कनिष्ठ वसिष्ठ ॠषि होता.  मित्रवरुणांनीं आपलें तेज कुंभांत सोडलें होतें त्यापासून अगस्त्य आणि वसिष्ठ उत्पन्न झाले होते म्हणून,  त्यांस मैत्रावरुणि, कुंभयोनि अशीं नांवें पडलीं होतीं.  (मत्स्यपुराण अध्याय २०१ )

हा अगस्त्य महातपस्वी व विरक्त असल्यामुळें विवाह करणार नव्हता.  परंतु पित्याच्या आज्ञेमुळें निरुपाय होऊन विदर्भ देशाधिपतीची कन्या लोपामुद्रा ही यानें आपणास स्त्री केली होती.  (लोपामुद्रा शब्द पहा).  पुढें अगस्त्य तिजपासून पुत्रोत्पत्तीची इच्छा करु लागला असतां,  ऐश्वर्ययुक्त होऊन आपणांशी संभोग करावा असा तिचा हेतु आहे असें जाणून हा द्रव्ययाचनेसाठी श्रुतर्वा राजाकडे गेला (श्रुतर्वा शब्द पहा). (अ) महाभारत वनपर्व अध्याय ९७, ९८.)

श्रुतर्वा राजाकडून याची द्रव्यकामना तुप्‍त न झाल्यामुळें त्याच्या सांगण्यावरुन, व त्यास बरोबर घेऊन हा ब्रदनश्व राजाकडे गेला. (ब्रदनश्व शब्द पहा) तेथेंही तसेच झाल्यामुळें हा त्या उभयांसहित त्रसद्दस्यु राजाकडे गेला.  (त्रसद्दस्यु श. पहा). तेथे तीच स्थिति अवलोकन करुन हा पुढें काय करावे म्हणून चिंतन करीत आहे तो त्रसद्दस्यूनें विनंती केली कीं इल्वल असुर मोठा संपत्तिमान आहे.  त्यास जिंकल्यास अपार द्रव्य मिळेल.  त्यावरुन हा तिघाही राजांस समागमें घेऊन, इल्वलाकडे गेला; आणि त्यास जिंकून लागत होते तितकें द्रव्य आपण घेऊन, व त्या राजांसही देऊन त्यांस मार्गस्थ केल्यावर आपण आपल्या आश्रमास आला, आणि आणलेले द्रव्य लोपामुद्रेस देऊन तिचें चित्त यानें संतुष्ट केलें. (इल्वल श. पहा)

पुढें लोपामुद्रेस अगस्त्यापासून गर्भधारण झालें. व ती, दृढस्यु आणि दृढास्य या दोन पुत्रांस क्रमेंकरुन प्रसवली.  या दोन पुत्रांत दृढास्यु हा इध्मवाह या नांवानें अतिप्रसिद्ध होता.

अगस्त्यॠषि स्त्री व पुत्र यांसहीत आश्रमधर्म चालवीत असतां,  कालकेय नामक असुरांनी जनांस अत्यंत पीडा दिली.  तेव्हां यानें महान ॠषींच्या प्रार्थनेवरुन समुद्रोदकाचें शोषण करुन कालकेयांचा नाश केला, व सकल जनांस स्वस्थ केलें,  तेणेंकरुन इंद्राचाही संतोष झाला. (कालकेय शब्द पहा).

अगस्त्य ॠषि उत्तम तत्त्ववेत्ता होता.  याशिवाय त्याच्या अंगीं परोपकार बुद्धि असून, धनुर्वेदामध्यें तर, त्याची गणना उत्तम कोटींत असे. यानें देवांच्या प्रार्थनेवरुन प्राणिमात्रांस, विंध्यपर्वतापासून झालेलें विघ्न निवारण करण्यासाठीं काशीवासही सोडून देणें पत्करलें. (विंध्य शब्द पहा). तसाच दाशरथिराम दंडकारण्यांत चालला असतां तोही याच्या दर्शनास येऊन याचा प्रसाद संपादन करुन नंतर पुढें गेला.