विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अग्रोहा - हिसारा जिल्हा ( पंजाब ) मधील फत्तेबाद तहशिलींतील एक पुरातन शहर. उत्तर अक्षांश २९.२० व पूर्व रेखांश ७५.३८ हें हिसारच्या वायव्येला १३ मैलांवर आहे. हें अगरवाला बनिया जातीच्या लोकांचें मूळचें स्थान असें म्हणतात. व तें बरेंच महत्त्वाचें ठिकाण होतें. किल्ल्याचे अवशेष व इमारतींचे चौथरे पूर्वीच्या महत्त्वाची साक्ष पटवतात. इ.स.११९४ मध्यें महमद घोरीनें तें शहर जिंकून घेतलें तेव्हां बनिया लोक सर्व दक्षिण भागांत पसरले.
सध्यां या गांवाला बिलकूल महत्त्व नाहीं व इ.स.१९०१ मध्यें येथील लोकसंख्या फक्त ११७२ होती.