विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अद्वैतानंद – हे नामांकित पुरुष श्रीक्षेत्र काशी येथें संन्यास घेतल्यावर रहात असत. हे मूळचे महाराष्ट्र ब्राह्मण असून मोठे विद्वान होते. यांजवळ अध्ययन करण्यास पुष्कळ विद्यार्थी असत, म्हणून यांस काशींत गुरुस्वामी असें लोक म्हणत. शांकरवेदांत विषयावर यांचा ब्रह्मविद्याभरण नांवाचा उत्कृष्ठ ग्रंथ आहे. सदानंदकृत जो वेदांतसारनामक ग्रंथ आहे त्यावर यांची संस्कृत टीका आहे. मध्वमुनीश्वर व कटिबंधादिक कविता करणारा प्रसिद्ध जो अमृतराय तो, असे दोघे यांचे शिष्य होते. हे कधीं जन्मले व मरणकाळीं यांचें वय किती होतें तें नक्की माहित नाहीं परंतु शके १६८७ पार्थिवनामक संवत्सरीं हे काशींत समाधिस्थ झाले असें अर्वाचीन कोशकार म्हणतात. अमृतरायाचा गुरु अंबिकासरस्वती होता असें त्याच्याच “अविनाशसंदेहहरण” ग्रंथांत आढळतें. मध्वमुनींनीं आपले गुरु अद्वैतानंद यांजकडून रायास उपदेश देवविला अशी एक दंतकथा आहे.  [ सं. क. का. सू.; अ. को. ]