विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अगमुदैयन् - सर्व तामिळ प्रदेशांतून ही जात दिसते.  मरवन् आणि कल्लन् या जाती अगमुदैयनांच्या वर्गांत मोडतात.  अगमुदैयनांचा वरील दुसर्‍या दोन्हीपेक्षां ब्राह्मणांशीं विशेष संबंध येऊन त्यायोगानें त्यांच्यावर बराच परिणाम झालेला दिसतो. ते ब्राह्मणास भिक्षुक करितात व वेल्लाळांप्रमाणे जन्म-लग्न-और्ध्वदैहिक संस्कार पाळतात.  यांच्यांत मरवनांप्रमाणें गोत्रांतरविवाह्य वर्ग नाहींत.  साधारणपणें मरवन आणि अगमुदैयन आईबापांची संतति अगमुदैयन समजतात; पण जर बाप मोठ्या योग्यतेचा मनुष्य असेल तर मुलगे मरवन् म्हणून धरतात.  यांच्यांत सामान्यतः प्रौढविवाह होतात.  लग्न जमविण्याच्या वेळीं कुंडली बघतात.  लग्नांतील बर्‍याचशा चाली आपल्याप्रमाणेंच असतात.  मृतांना जाळतात, व किंवा पुरतात. त्यांचे और्ध्वदैहिक संस्कार करितात.  

अगमुदैयन् शैवपंथाचे आहेत.  ऐयनर, पिडारी, करुपन्नस्वामी यासारख्या अनेक लहान देवांनाहि ते भजतात.  मध्यप्रांतांत जबलपूर व रायपूर जिल्हयांत यांची थोडी वस्ती झाली आहे.  या भागांत पूर्वी मद्रासी पलटणी रहात.  त्यांपैकीं पेन्शन घेऊन येथे राहू लागलेल्या लोकांचे हे वंशज आहेत.  हे पिल्ले हा थोर लोकांस संबोधण्याचा शब्द ते स्वतःला लावून घेतात; याचा अर्थ राजाचा पुत्र असा आहे.  यांची कोचीन संस्थानांत चितूर तालुक्याच्या पूर्वभागांत कांहीं वस्तीं आढळतें.  ( थ र्स्ट न - कास्ट अँण्ड ट्राइब्ज ऑफ सदर्न इंडिया रसेल व हिरालाल – कास्ट अँड ट्राइब्स ऑफ सेंट्रल प्राविन्सेस – सेन्सस १९११ रिपोर्ट).