विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अजमीरमेरवाड - उत्तर अक्षांश २५ २४' ते २६ ४२' व पूर्व रेखांश ७३ ४५' ते ७५ २४'. यांत राजपुतान्यांत अगदीं अलग असलेला ब्रिटिश मुलूख आहे. राजपुतान्यांतील पोलिटिकल एजंट येथें कमिशनर आहे. हा प्रांत अजमीर मेरवाड यांचा बनलेला आहे.

अजमीरच्या उत्तरेस जोधपूर, दक्षिणेस उदेपूर, पूर्वेस जयपूर आणि पश्चिमेस जोधपूर आहे. मेरवाडच्या उत्तरेस जोधपूर व अजमीर, दक्षिणेस उदेपूर, पूर्वेस अजमीर व उदेपूर व पश्चिमेस जोधपूर आहेत. एकंदर क्षेत्रफळ २७११ मैल असून इ. स. १९०१ मध्यें लोकसंख्या ४७६९१२ होती. अजमीर हें नांव अजराजापासून पडलें आहे.

अजमीर पुष्कळ भागीं वालुकामय असून कोठें कोठें डोंगराळ आहे. पण मेवाड निखालस डोंगराळ आहे. अजमीर शहरानजीक तारागड ज्या डोंगरावर आहे तो समुद्रसपाटीपासून २८५५ फूट उंच आहे. अजमीर डोंगरपठारावर वसलेलें असून तें पठार सर्व हिंदुस्थानांत अति उंच आहे. ह्या प्रांतात फार मोठ्या अशा नद्या नाहींत. येथील अनासागर तलावाच्या सभोंवतालच्या डोंगरांतून साबरमती नदी निघते. पुष्कर खेरीज येथें लक्षांत ठेवण्याजोगें सरोवर नाहीं. अजमीर प्रांतांत डोळ्यांत भरण्यासारखें सृष्टिसौंदर्य क्वचित दिसून येतें. पण अजमीर शहराची मात्र तशी गोष्ट नाहीं. येथें पावसाळा सुरू होतांच सर्व डोंगर हिरवा शालू नेसलेले दिसतात व सूर्यास्ताचा देखावा मनोहारी असतो.

अरवलीपर्वताच्या पूर्वेस राजपुतान्यांत सांपडणार्‍या सर्व वनस्पती येथें मिळतात. पिंपळ, वड, लिंब, सेमल हीं झाडें येथें विशेष आहेत. फळझाडांमध्यें डाळिंब व पेरू हीं सर्वत्र पुष्कळ आढळतात.

वाघ मेरवाडमध्यें क्वचित आढळतो पण चित्ते व तरस पुष्कळ आहेत. तसेंच रानडुकर, भेकर, नीलगाय हीं अजमीर मध्यें आढळतात व त्यांची शिकार करण्याचा लोकांना विशेषनाद आहे.

येथील हवा (निरोगी) आरोग्यदायक आहे. उन्हाळ्यांत हवा कोरडी व उष्ण असते पण हिवाळ्यांत ती थंड व उत्साहजनक असते. साधारणपणें अजमीर येथील उष्णतामान जानेवारी महिन्यांत ५९०४, मेमध्यें ९१०५, जुलै ८४०९ व नोव्हेंबरमध्यें ६७०९ असतें. येथील गेल्या इ. स. १९०१ मध्यें संपणार्‍या २५ वर्षांतील पावसांचें सरासरी मान २१०२ आहे.

अजमीरचा तारगड चव्हाणघराण्यांतील रजपूत अजराजानें इ.स.१४५ मध्यें बांधला अशी समजूत आहे. पण इतिहासज्ञांच्या मतें अजय व अज हे इ.स.११०० मध्यें होऊन गेले. प्रथम अज मग अजय व त्यांच्यामागून अर्णोराजा गादीवर आला. त्याच्यामागून त्याचा मुलगा विग्रहराज जो विशालदेव ह्या नांवानें प्रसिद्ध आहे तो राज्यावर आला. इ.स.११९२ मध्यें विशालदेवाचा नातू पृथ्वीराज हा गादीवर होता. महंमद घोरीनें त्याचा पराभव करून त्याला आपला मांडलीक बनवल्यावर, त्याचा चुलता हरिराज यानें पृथ्वीराजास पदच्युत करून आपण गादी बळकावली. परंतु त्यानें घोरीचा सुभेदार कुतुबुद्दिन याच्या त्रासानें लवकरच आत्महत्या केली. पुष्कळ राज्याच्या घडामोडी व रक्तपात होऊन शेवटीं मारवाडच्या मालदेव राठोरच्या ताब्यांत हा प्रांत गेला व मग अकबर बादशहानें हा प्रांत आपल्या राज्याचा एक सुभा केला. इ. स. १७२१ मध्यें मोंगलराज्यास उतरती कळा लागली असतां अजमीर पुन्हां मारवाडचा राजा जसवंतसिंग याच्या अजितसिंह नामक मुलानें आपल्या ताब्यांत घेतलें. कांहीं वर्षांनीं अजमीरचा किल्ला व प्रांत मराठ्यांच्या ताब्यांत आला व शेवटीं सिंहाच्या कडून इंग्लिशांनी इ. स. १८१८ मध्यें तो आपणाकडे घेतला.

जुन्या इतिहासाला मदत होईल अशा इमारती किंवा जुन्या पुराण्या वस्तू व ठिकाणें अजमीर व पुष्कर सोडून बाहेर क्वचितच आहेत. अजमीर प्रांताच्या आग्नेय भागांत अतिशय पुरातन हिंदू देवळांचे अवशेष आढळून येतात.

इ. स. १९०१ च्या खानेसुमारी प्रमाणें ( अजमीर २६७४ - ५३ व मेरवाड १०९४५९ ) अजमीर व मेरवाडची लोकसंख्या ४७६९१२ ( १९११ मध्यें ५०१३९५ ) होती. ती इ. स. १८९१ च्या मानानें फारच कमी आहे व त्याचें कारण म्हणजे दुष्काळ. दर चौरस मैलाला लोकसंख्येचें प्रमाण १७६ पडतें; तेंच इ. स. १८९१ मध्यें २०० होतें. ह्या प्रांतांत ४ मोठीं शहरें व ७४० गांवें आहेत. लोकसंख्येच्या मानानें पुरुषांचें प्रमाण शेंकडा ५२.६ आहे. इ. स. १९०१ मध्यें

पुरुष बायका
  अविवाहीत  १७६३३८   ११३९४३  ६२३९५
  विवाहीत  २३२९२०  ११६४६९  ११६४५
  विधूर व विधवा  ६७६५४    २०६१४    ४७०४

 

 


              

अशा तर्‍हेची स्थिती होती. तान्ह्या मुलांचीं लग्नें होत नाहींत दोन किंवा जास्त बायका करण्याचा प्रघात नाहीं. बायकांना दोन नवरे तर ठाऊकच नाहीं. मुसुलमानांत घटस्फोट चालू आहे. विधवाविवाह जाट वगैरे जातींत लागतात. मेरवाड मध्यें जिंदगी बापाकडून न मिळतां आईकडून मिळते. अजमीर मध्यें सर्व इस्टेट वडील घराण्यांतील वडील मुलाकडे जाते. लहान मुलांना मारण्याचा प्रघात कोठेंहि नाहीं.

येथील भाषा राजस्थानी व हिंदी ह्या आहेत. एकंदरींत लोक उद्योगी व चांगल्या वर्तनाचे आहेत परंतु दुष्काळाच्या दिवसांत मेरवाडांतील मेर व अजमीरचे मिन लोक दरवडे वगैरे घालतात. लोक शरीरानें धष्टपुष्ट असून चांगले काटक असतात. येथें हिंदुलोकांच्या खालोखाल मुसुलमान लोक आहेत. येथील हिंदु वैष्णव, शैव व शाक्त या तीन पंथांचे आहेत. शेंकडा ५५ लोक शेतकीवर उपजीविका चालवणारे आहेत. कांहीं लोक विणकाम व कातडीं कमावणें हे धंदे करतात. वरच्या वर्गांतील लोक बहुतेक शाकाहारी आहेत.

शहरांमध्यें घरें दगडाचीं बांधलेली असतात पण खेड्यांतून तीं मातीचीं केलेलीं असतात. आरोग्यशास्त्रदृष्ट्या घरांची बांधणी चांगल्या प्रकारची नसते.

कसरत, दांडपट्टा, कुस्ती, हे इकडील उघड्या हवेंतील खेळ होत. सध्यां क्रिकेट फुटबाल वगैरे इंग्लिश खेळांचाहि शिरकाव होऊं लागला आहे. लोकांना गाणें बजावणें, सतार, बीन, वगैरेचा नाद विशेष आहे.

येथील हिंदुलाकांचे मुख्य सण म्हणजे होळी, दिवाळी, दसरा व तेजाजीका मेळा. व्यापारी लोक गांगोर नांवाचा एक सण पाळतात. पार्वतीदेवी आपल्या बापाकडे परत गेली त्याचा हा उत्सव असतो. तेजाजीका मेळा हा जाटांचा उत्सव आहे. तेजाजी म्हणून एक प्रसिद्ध योद्धा होऊन गेला.

येथील शेतकीची स्थिति समाधानकारक नाहीं. कारण खोल उत्तम मातीच्या जमिनी येथें नाहींत. खडक पुष्कळ वर आलेले आहेत. पाऊस थोडा पडून अनियमित असतो. ह्यामुळें खत फार टाकावें लागतें.

येथील मुख्य पिकें म्हणजे ज्वारी, मका, कापूस, गळितांची धान्यें आणि गहूं हीं आहेत. पुष्करच्या आसमंतभागांत उंसाची लागवड करतात व तोडगड तहशीलमध्यें अफूचीं झाडें लावतात. एक हिवाळ्यांत व एक वसंतऋतूच्या वेळीं अशीं दोन पिकें काढतात.

जमिनीचा खंड पिकाच्या रूपानें देंतात. उत्पन्नाच्या १/२ पासून १/ पर्यंत मालकाला खंड मिळतो. कांहीं पिकांच्या बाबतींत खंडादाखल पैसे देतात. मजुराचा रोजमुरा २ आणे पासून ४ आणेपर्यंत असतो. गंवडी, सुतार, लोहार, यांना रोज ४ आणे ते ८ आणे पर्यंत मिळतात. खेड्यांतून बुलत्याची वहिवाट आहे.

शहरांत मध्यम वर्गांतील लोक खाऊनपिऊन सुखी आहेत. पण खेड्यांत शेतकरी लोकांची स्थिती इ. स. १९०१ मधील दुष्काळापासून अजून सुधारली नाहीं.

अजमीर मेरवाडच्या डोंगरामध्यें धातूंच्या खाणी पुष्कळ आहेत. अजमीरच्या उत्तरेकडील डोंगरामध्यें लोखंड व तांबें यांच्या खाणी आहेत. व तारागडच्या डोंगरांत शिसें सांपडतें.

अजमीरमध्यें कलाकुसरीचीं कामें किंवा उद्योगधंदे विशेष म्हणण्यासारखे नाहींत. मेरवाडबद्दल तर बोलावयासच नको. कांहीं ठिकाणीं मागावरील कापड, हस्तीदंती व लाखेच्या बांगड्या करतात. अजमीरच्या तुरुंगांत गालिचे व सतरंज्या होतात.

या प्रांताची राज्यव्यवस्था एका कमिशनरकडे असते. तो अजमीर शहरीं राहतो. तोच मुख्य न्यायाधीश असून पोलीसखातें, जंगलखातें, शिक्षणखातें यांच्यावर त्याचा अधिकार चालतो. ह्याच्या हाताखालीं दोन असिस्टंट कमिशनर्स असतात. एकंदर या प्रांताच्या तीन तहशिली केल्या आहेत. अजमीर, बेवार व तोडगड. राजपुतान्यांतील गव्हरनर जनरलचा एजंट हाच चीफ् कमिशनर असतो.

अजमीर येथील जमीनधार्‍याची पद्धत राजपुतान्यांतील इतर संस्थानांप्रमाणेंच आहे. जमिनीचे दोन भाग केले आहेत. एक खालसा व दुसरी इस्तिम्रारि-सैन्यांतील नोकरी करितां दिलेली जमीन.  परंतु मराठ्यांच्या ताब्यांत हा मुलूख आला तेव्हां क्षत्रिय बाण्याला उत्तेजन देणें त्यांना हितावह नसल्यामुळें त्यांनीं सैन्यांतील नोकरीच्या ऐवजीं एक ठराविक पैशांच्या रूपानें मोबदला घेणें सुरू केलें. ब्रिटिशांच्या ताब्यांत हा मुलूख गेल्यावर त्यांनीं ही खंडणी पुष्कळ वाढवली; परंतु इ. स. १८७३ मध्यें इस्तिमदार लोकांना सनदा देण्यांत येऊन त्यांची खंडणी एकदांच ठरविण्यांत आली आहे.

दुसरी एक ध्यानांत घेण्याजोगी पद्धत म्हणजे '' भूम '' होय. अशा जमीनीच्या मालकाला भूमिया म्हणतात. ही पदवी मानाची समजली जाते. पूर्वी भूमियांचीं कामें तीन प्रकारचीं असत-१ ज्या गांवांत भूम असेल त्याचें रक्षणकरणें. २ जे पांथस्थ उतारू असतील त्यांच्या मालमत्तेचें रक्षण करणें. ३ कांही गुन्ह्यापासून झालेलें नुकसान भरून देणें. सध्यां ह्या लोकांचें काम म्हणजे दंगेधोपे झाल्यास सरकाराला मनुष्यसाहाय्य करणें हें आहे.

मेरवाडमध्यें ब्रिटिशांच्या पूर्वी एक सत्ता कायम नसल्यामुळें तेथें जमीनधार्‍याची पद्धत वगैरे कांहीं एक नव्हती. इ.स.१८५१ मध्यें जी मोजणी झाली त्यावेळी (अजमीर) सर्व जमीन कसणार्‍यांनां जमिनीचे मालक करण्यांत आले.

दुसरी उत्पन्नाची बाबत म्हणजे अफूवरील कर. ह्या देशांतून चीनमध्यें अफू पुष्कळ जात असे.

येथील शिक्षणसंस्थांत शिकणारे विद्यार्थी अलाहाबाद युनिव्हर्सिटीच्या परिक्षेस बसतात. इ. स. १९०२-३ मध्यें ४७१८ मुलें येथील शाळांमधून शिक्षण घेत होतीं. स्त्री-शिक्षणहि वाढत्या प्रमाणावर आहे. इ.स.१९०३ मध्यें शाळेंत जाणार्‍या मुलींची संख्या १८४० होती.