विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकोट - गांव – हें तालुक्याचें मुख्य ठिकाण असून अकोल्याच्या उत्तरेस २८ मैलांवर आहे.  अकोला आणि अकोट यांचें मध्ये एक पहिले वर्गाचा रस्ता आहे.  लोकसंख्या सुमारें एकोणीस हजार.  येथें तालुक्याच्या ठिकाणीं असणार्‍या सर्व इमारती असून एक दवाखाना, इंग्रजी मराठी शाळा वगैरे आहेत.  येथे आठवड्यांतून दर बुधवारीं आणि रविवारीं बाजार भरतो.  इ.स. १८८४ साली म्युनिसिपालिटीची स्थापना झाली.  येथे कापसाचा बाजार, दहा सरकी काढण्याचे कारखाने आणि चार रुई दाबण्याचे कारखाने आहेत.  येथून सुमारें ५००००० रुपयांचा कापूस बाहेर जातो.  येथे सावकारी धंदा बर्‍याच मोठ्या प्रमाणावर चालत असून मेळघाट कडील इमारती लांकडांचा व्यापारही बराच आहे.  साध्या सत्रंज्या येथें होतात.  वर्‍हाडांत एका काळीं अकोटची सत्रंजी प्रसिद्ध असे. व हा गांव जोगवन, चिंचखेड, आणि कमळापूर हीं तीन खेडेगावें मिळून झालेला असून वस्ती साधारण दाट आहे.  साधारण प्रत्येक घराला एक विहीर आहे.  गांवाभोंवतीं एक मातीची भिंत व तिला सहा दरवाजे होते; परंतु हल्ली त्याचा मागमूस राहिला नाहीं.  ज्या ठिकाणी हल्लीं तहशिली आहे तिला पूर्वी किल्ला म्हणत.  मुसलमानांची वस्ती बरीच आहे.  येथील पाहण्यासारख्या इमारती पूर्वीचे मोठमोठे कामगार यांच्या असून त्यांवरील लाकडाचे खोदकाम प्रेक्षणीय आहे.  दिवाकरभाऊंचा दिवाणखाना, पहाण्यालायख आहे.  सरदारसिंग आणि फडणविस यांच्या हवेल्या चांगल्या आहेत.  फडणविसांच्या हवेलीमध्यें मजबूत तळघरें आहेत.  येथील सरदेशमुखांच्या घरांतून दूरच्या बागेपर्यंत एक भूयार आहे असें त्यांचे म्हणणे आहे.  पीरशहा दर्यासाहेब नांवाच्या टेकडीवर त्यांचे थडगें व एक मशीद आहे.  याच ठिकाणीं येथील स्थाईक रजपूत आणि मुसलमान यांमध्यें मारामारी झाली.  या टेकडीवरील एका मुसलमानानें एका रजपूत स्त्रीची चेष्टा केली; हे रजपूतांस सहन न होऊन त्याच रात्रीं कित्येक रजपूत या टेकडीवर गेले.  त्यावेळी झालेल्या झटापटींत कित्येक मुसलमान प्राणास मुकले.  या टेंकडीवर एक विहीर आहे.  त्या विहिरींतून नरनाळ्यास जाण्याकरितां ११ मैल लांबीचें एक भुयार आहे असें म्हणतात.  हल्ली ती विहीर पडलेली आहे.  गांवाजवळच अकोला रस्त्यावर एका बाजूला एकगाडानारायणची समाधि असून तीस हिंदू आणि मुसलमान पूज्य मानतात.  दुसर्‍या बाजूस मीरजाफर करोडा याचें थडगें आहे. दोन्ही इमारतीवर फारसी शिलालेख आहेत.  मीरजाफर करोडा याच्या वंशजास इनामी जमीन असून त्याचा उरुस दरवर्षी भरतो.  जवळच गैबी पीर असून येथें हिवताप बरा होतो अशी लोकांची समजूत आहे.  हिंदूंचीं येथें पुष्कळ देवालयें आहेत. परंतु देवळाचें काम फारसे वाखाणण्यालायक नाहीं.  नंदीबाग, बालाजी आणि केशवराजा यांचीं देवळें साधारण बरीं आहेत.  तरी सर्वांत महत्त्वाचें देऊळ नरसिंहबोवाचें आहे.  हा एक मुसलमान फकीराचा शिष्य असून इ.स. १८८७ सालीं मरण पावला.  दरवर्षी कार्तिक महिन्यांत मोठा उत्सव असून २०००० /२५००० माणसांची गर्दी असते.  सुमारें १२० एकर जमीन देवळास दिली आहे.  नरसिंगबोवाचें चरित्र पुस्तकरुपानें प्रसिद्ध झालें आहे. (अकोला डिस्ट्रिक्ट ग्या.)