विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अगार्या - गोंडांची पोटजात त्यांचा धंदा लोखंडी काम.  सन १९११ सालीं त्यांची संख्या ९५०० मंडला, रायपूर, बिलासपूर जिल्ह्यांत सांपडते.  मिरझापूर बंगालमध्येंहि कांही लोक सांपडतात.  उडिया मुलखांत जे अगारिया सांपडतात ते यांपासून भिन्न आहेत.  ही जात जगाच्या आरंभापासून आहे अशी या लोकांची समजूत आहे.  जगाच्या आरंभीं बैलांनी जमीन नांगरिली तो नांगर यांच्याच पूर्वजांनी केला होता असें समजतात.  यांच्या दोन पोटजाति आहेत त्या (१) पथारिया अगारिया आणि (२) खूंटिया अगारिया हे होत.  भट्टी पेटवितांना भात्याच्या तोटीवर जे लोक दगड ठेवतात ते पथारिया आणि जे खुंटी ठोकतात ते खुंटिया.  यांच्या गोत्रांची नावें गोंडासारखींच आहेत.  सोनवाई पोटभेदाचे लोकांकडून वाळींत घातलेल्यांचा प्रायश्चित्त विधि करविण्यांत येतो.  एका भांड्यांत सोन्याचा तुकडा ठेऊन त्यांत पाणी टाकून तें पतिताच्या आंगावर शिंपडून त्याला शुद्ध करतात.  सगोत्रविवाह निषिद्ध आहे.  मामेभाऊ आतेबहीण, मावस भाऊ व बहिणी यांचा विवाह होतो.  लग्न प्रौढपणीं होतें.  मुलाचा बाप मुलीच्या बापाकडे निरोप पाठवितो कीं अमूक अमूक तुझी ''बासी '' (शिळा भाताचें खाद ) खाण्यास आला आहे; जर मुलीच्या बापास तो संबंध मान्य असला तर तो म्हणतो '' तो पाई आला असेल तर मी शिरसावंदन करुन त्याचें स्वागत करतों. '' नंतर वराचा बाप वधूच्या घरीं जातो.  तेथें त्याचे पाय धुतात व त्याला पाणी पिण्यास देतात.  वधूला देण्याच्या देणग्या वरपक्षीय वाजत गाजत आणतात.  पावसाळ्यांत लग्नाचा दिवस ठरवितात.  लोखंड वितळण्याचे दिवस नव्हेत म्हणून तेच लग्नास त्यांना सोईस्कर पडत असतील.  मुलीबद्दलचें शुल्क लग्नापूर्वी कांहीं दिवस चुकतें करावें लागतें.  तें बहुधा ५ शेर उडीद किंवा तीळ आणि ४ ते १२ रुपयांपर्यंत नगदी रक्कम असें असतें.  सोमवार, मंगळवार, शुक्रवार यांतून कोणत्या तरी दिवशीं लग्न होतें.  बैगा (पुरोहित) जमीनींतून भट्टी तयार करण्याकरितां एक ढेंकूळ खोदतो तें ढेंकूळ वधूच्या आईनें ओटींत घेतले पाहिजे.  वर आल्यानंतर काडीनें त्याचे दांत घांसतात आणि मेहुणी  ''सांज'' पानें त्याच्या तोंडांत घालते.  तीं तो हातांतील पंख्यानें दूर करतो.  याबद्दल मेहुणीला बिदागी द्यावी लागते.  उडीद फार पवित्र धान्य समजलें जातें.  या विवाहविधीपैकीं बराच भाग पुन्हां वराच्या घरी करावा लागतो.  ताडाच्या पानाचे मुगुट करुन वधूवरांस तळ्यांत जाऊन ते टाकावे लागतात; आणि पाळीपाळीनें गडवा पाण्यांत एकानें लपवावा व दुसर्‍यानें काढावा असें खेळतात.  मग वधूवर कपडे बदलून घरीं जातात.  वधूला पाण्यानें भरलेली एक घागर डोकीवरुन न्यावी लागते.   वरानें गवत भरलेल्या हरिणाला मारण्यासाठीं बायकोच्या खांद्यावरुन तीर सोडले पाहिजेत.  प्रत्येक तीर सोडल्यानंतर वधू त्याला साखर खाण्यास देते.  तीन तीरांपैकीं एकही न लागला तर नवरा मुलगा चार आणे दंड देतो.  लग्न झाल्यावर वधुवरांचा महिनाभर संयोग होतां कामा नये, असा नियम आहे.  लग्नाचा खर्च वरास १५, वधूच्या बापास ४० रुपयें लागतो.  वराला कधीं कधीं भावी सासर्‍याकडे नोकरी करावी लागते.  नोकरीचा सर्वांत जास्त काळ म्हणजे तीन वर्षें आहे.  नौकरींत असतां लग्नाचा विचार ठरल्यावर वधू वरांनीं घरातून निघून जावें.  मग त्यांना वधूच्या बापानें बोलावून आणून प्रायश्चिताकरितां एक जातीला भोजन दिलें म्हणजे झालें.  जर ते बोलावण्यानें आले नाहींत तर विवाहितांशीं संबंध तोडून टाकावा.  विधवांच्या विवाहास पूर्ण मोकळीक आहे, आणि विधवेनें नवर्‍याच्या भावाबरोबर लग्न केलें तर फारच चांगले.  व्यभिचार, किंवा दुष्टपणाच्या वर्तनाकरितां घटस्फोटही होतो.  घटस्फोट केलेली स्त्री पुन्हां लग्न करते.  परंतु जर ती घटस्फोटाखेरीज दुसर्‍या बरोबर पळाली तर त्या माणसास १२ रुपयें दंड नवर्‍यास द्यावा लागतो.

गर्भारपणीं वधूची आई मुलीला लुगडें आणि पक्वान्नें देते.  बाळंत झाल्यावर ५ दिवस सोयर असतें. प्रेताचें दहन करतात.  देवीनें व महामारीनें मेले त्यांस पुरतात.  मेलेल्याच्या वारसाच्या डोक्याभोवतीं एक काळें फडकें गुंडाळून तो वारस आहे असें कबूल करतात.  आश्विनांत पितृतर्पण करतात.

दैवत - दूल्हा देव त्यांचा देव आहे.  कोंबड्या बकरें त्याला बळी देतात.  पोळ्या, नारळ त्याला अर्पण करतात.  लोहासुर हा त्यांच्या धंद्याचा देव आहे.  औषधांवर भरंवसा नाहीं.  जादूनें रोग बरे करण्यावर भरंवसा आहे.  देवाला अंगांत आणून आजारी माणसानें काय अपराध केला हें वदवितात आणि प्रायश्चित्त ठरवितात.  तें दिलें म्हणजे रोगमुक्त होतो.  गोंड, कवार (गवार?) आणि अहीर या तीन जातीच्या लोकांस आपल्या जातींत घेतात.  हे लोक माकडें, कोल्हे, मगर, पाली, गोमांस आणि उष्टें खात नाहींत.  डुकराचें मांस, कोंबड्या आणि मद्य याची पूर्ण मोकळीक आहे.  गोंड आणि बैगा यांच्या हातचेच जेवतात.  यांच्या खेरीज स्वतःपेक्षां नीच जातींच्या हातचें जेवीत नाहीत.

यांचे अंगावर कपडे फार कमी असतात.  बायका गोंडासारख्या पोशाक करतात.  अंगावर फार गोंदवितात.

आसाममध्येंहि यांची वस्ती आहे.  हे लोक मूळचे छोटा नागपूरमधील शेतीचा धंदा करणारे आहेत.  परंतु खानेसुमारीचे वेळेला ह्या जातीचे अर्ध्यापेक्षां जास्त लोक आसाममधील काचार, सिलहट् व सिवसागर येथील चहाचे मळ्यांत मजुरी करीत होते.