विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अत्रि :- मूळ शब्दार्थ “खाणारा” असा आहे. हा महर्षि अग्नि, इंद्र, अश्विन् व विश्वेदेवता यांच्या सूत्रांचा कर्ता म्हणून वेदांत आला आहे. याच्या संबंधीं वैदिक वाङमयांतील माहिती विभाग तीन दाशरज्ञ युद्ध या प्रकरणांत व शब्दसृष्टि प्रकरण ५ यामध्यें येऊन गेली आहे. यासंबंधाची पौराणिक माहिती पुढीलप्रमाणें मांडतां येईल. स्वायंभुव मन्वंतरामध्यें, प्रजोत्पादनार्थ, ब्रह्मदेवानें जे दश मानसपुत्र निर्माण केले होते, त्यांतील हा एक असून ब्रह्मदेवाच्या नेत्रापासून उत्पन्न झाला होता व यास, कर्दम प्रजापतीच्या कन्यांतील अनसूया नामक कन्या, ही स्त्री होती. यास तिचे ठायीं दत्त, दुर्वासा, आणि सोम, असे तीन पुत्र झाले होते. पुढें त्याच मन्वंतरांत, सर्व ब्रह्ममानसपुत्र महादेवाच्या शापानें मरण पावले, त्यांत हाहि मरण पावला होता.
(२) पूर्वीचे ब्रह्मपुत्र मरण पावले असतां, ब्रह्मदेवानें, त्यांस, चालू वैवस्वत मन्वंतरारंभीं, पुन: उत्पन्न केलें, त्यांत हा ब्रह्मदेवानें स्वत: यज्ञ केला, त्यांतील अग्नीच्या अर्चि ( ज्वाला ), त्यांपासून उत्पन्न झाला होता. येथेंहि यास, अनसूयाच स्त्री होती, मात्र दत्त, दुर्वासा, सोम, आणि अर्यमा, असे चार पुत्र, व अमला नामक महाब्रह्मनिष्ठ कन्या, अशीं अपत्यें होतीं. हा प्रस्तुत, प्रति ज्येष्ठमासीं असणार्या द्वादशादित्यांतील एका आदित्यासमागमे संचार करीत असतो.
दाशरथि राम, दंडकारण्यांत चालला असतां, याच्या आश्रमास गेला होता. त्या कालीं यानें, त्याचें उत्तम प्रकारानें, आदरातिथ्य केलें होतें, तसेंच अनसूयेनेंहि, सीतेचें आतिथ्य करून, तिला पातिव्रत्यविषयक नीति सांगितली होती. पुढें, राम जाण्यास निघाला असतां, सीताहि निघाली तेव्हां, तिला, मार्गसंबंधीं श्रम, व राक्षसांपासून भीति इ. होऊं नयेत, म्हणून अनसूयेनें, अंगरागादिंक उत्तम उत्तम वस्तु दिल्या, नंतर अत्रीनें सीता व लक्ष्मण यांसहित रामास दंडकारण्याचा मार्ग दाखवून, मार्गस्थ केलें. ( वा. रा. अयो. स. ११७-११९ ).
याच्या कुलांत यासहित, मंत्रद्रष्टे ॠषि सहा होते. ते असे मुख्य स्वत: हा, अर्द्वस्वन, श्यावाश्व, गविष्ठिर, कर्णक, आणि पूर्वातिथि. (मत्स्य. अ. १४४ ).
याच्या वंशाची वृद्धि करणारे ॠषि नऊ. ते असे. – अत्रि, गविष्ठिर, वाद्भुतक, मुद्गल, अतिथि, वामरथ्य, सुमंगल, बीज- वाप, आणि धनंजय. यांत त्रिवंशांतील ॠषि, व त्यांची प्रवरव्यवस्था अशी. – उयलकि, शोण, कर्णिरथ, शौकतु, गौर-ग्रीव, गौरजिन, चैतायण, अर्ध्दपण्य, वामरथ्य, गोपन, तकिबिंदु, कर्णजिव्ह, हरप्रीति, नैद्राणि, शाकलायनि, तैलप, वैलेय, दुसरा अत्रि, गोणिपति, जलद, भगपाद, सौपुष्पि, आणि छंदोगय, हे सर्व, आत्रेय, श्यावाश्व, आर्चनानस, अशा तीन प्रवरांचे होते.
गविष्ठिर कुलोत्पन्न, दाक्षि, बलि, पर्णवि, ऊर्णनाभि, शिलार्दनि, बीजवापि, शिरीष, मौजकेश, दुसरा गविष्ठिर, आणि भलंदन, हे सर्व, आत्रेय, गविष्ठिर, पौर्वातिथ आणि आत्रेय, गाविष्ठिर, आर्चनानस, अशा दोन भेदांनीं त्रिप्रवरांचे होते. वाद्भुतक कुलोत्पन्न, आत्रेय, आर्चनानस, वाद्भुतक अशा त्रिप्रवरांचे मुद्गलोत्पन्न, आत्रेय, आर्चनानस, पौर्वातिथ, अशा त्रिप्रवरांचे. धनंजय कुलोत्पन्न आत्रेय, आर्चनानस, धानंजय, अशा त्रिप्रवरांचे आणि अतिथि, वामरथ्य, सुमंगल, बीजवाप, या चारहि कुलोत्पन्नांस, आत्रेय, आर्चनानस, आतिथ, आणि आत्रेय, आर्चनानस, गाविष्ठिर, अशा दोन भेदांनीं तीन प्रवर असतात. मात्र यांत सुमंगल कुलास, आत्रेय, सुमंगल, श्यावाश्व, असा विशेष असतो.
कालेय, वालेय, वामरथ्य, धात्रेय, मैत्रेय, कौंद्रेय, शौभ्नेय, इत्यादिक ॠषि, अत्रीच्या कन्या वंशांतील होत म्हणून, यांस आत्रेय, वामरथ्य, पौत्री, असे तीन प्रवर असतात. ( मत्स्य० अ० १९६ ). या कन्याकुलांतील वंशाशीं, विश्वामित्र, आणि वसिष्ठ, यांतील कुलोत्पन्नांचा विवाह होत नाहीं.
(३) चालू वैवस्वत मन्वंतरांतल्या एकोणिसाव्या चौकडींत झालेला व्यास.
हा व्यास होऊन गेलेला अत्रि, अमुक असा निश्चय करतां येत नाहीं, म्हणून असें वाटतें कीं, वसिष्ठ आणि अंगिरा, या दोन कुलांत दोन अत्रि आढळतात, त्यांतील एक असावा.
(४) चालू मन्वंतरांतल्या सप्तर्षीतील एक, हाहि, वर सांगितलेल्या दोहोंतील एक असावा.
(५) गौतमॠषीचा मित्र, एक ॠषि, हा, द्वितीयार्थक जो शुक्र त्याच्या चार पुत्रांत दुसरा पुत्र अत्रि आहे, तोच असावा असें वाटतें. हा अत्रि, एकदां वेनकुलोत्पन्न एका राजाच्या यज्ञांत द्रव्ययाचनेकरितां गेला, आणि तेथें राजाची यानें, तूं केवळ ईश्वरच आहेस, अशी स्तुति केली. तिचा, बाह्यात्कारीं तिरस्कार करून, राजानें यास म्हटलें कीं, राजाची ईश्वराशीं साम्यता करून, स्तुति करणें योग्य नाहीं, तेव्हां दोघांतून कोणाचें म्हणणें खरें, असा त्या सभेंत वाद पडला. शेवटीं, यथार्थ निर्णय व्हावा म्हणून, कांहीं सदस्य सनत्कुमारांकडे गेले व झालेलें वर्तमान त्यांनी त्यांस सांगितलें, तें ऐकून सनत्कुमारांनीं, अत्रीचें म्हणणें खरें असें सांगतांच, त्यांनीं परत येऊन, तें म्हणणें राजास कळविलें, त्यावरून राजा संतुष्ट होऊन, त्यानें यास इच्छेपेक्षां अधिक द्रव्य देऊन मार्गस्थ करतांच, हा आपल्या आश्रमास परत आला ( भार. वन. अ. १८५ ).