विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अक्किवट - मुंबई इलाखा, बेळगांव जिल्हा. चिकोडीच्या नैॠत्येस सुमारें १२ मैलांवर हें खेडें आहे. यास इ. स. १७७७ सालीं तासगांवचा परशुरामभाऊ यानें वेढा दिला होता. त्यावेळी गांव लढविणारे दोघे भाऊ हल्ल्यांत कामास आल्यामुळें व दुष्काळाची तीव्र आंच लागूं लागल्यामुळें गांव शरण आला. इ. स. १८२७ सालीं कोल्हापुर सरकारास हा गांव ब्रिटिशांच्या स्वाधीन करणें भाग पडलें; कारण या गांवांत दरोडेखोरांची टोळी रहात असून आसपासच्या ब्रिटिश हद्दींतील खेड्यांत ती सतत त्रास देत असे. येथील किल्ला लष्करी दृष्टीनें चांगला नव्हता. (बेळगांव ग्या.)