विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अक्रोड - संस्कृत अक्षोट इतर नांवें आखरोट, आखोर कोल, दून इत्यादि.
हें झाड ग्रीस, आर्मिनिया व अफगाणिस्तान देशांतील पर्वतांवर, अफगाणिस्तानपासून भूतानपर्यंतच्या भागांत विशेषतः हिमालयाच्या वायव्य भागांत त्याचप्रमाणें उत्तर ब्रह्मदेशांतील टेंकड्यांवर, आणि खासिया टेकड्यांवर सांपडतें. क्वचित् समशीतोष्ण प्रदेशांतील उद्यानांतही हें झाड येऊं शकतें.
कित्येक ठिकाणच्या तृतीयकोत्तरकालीन थरामध्यें या झाडाचे किंवा अगदीं याच्या सारख्याच थरांचे अवशेष आढळून येतात. त्यावरुन हें झाड पूर्वी व हल्ली बर्याच विस्तृत भूभागांत वाढत होतें असें दिसतें. हिंदुस्थानांत या झाडाची लागवड अति पुरातन कालापासून होत असून येथील प्राक्कालीन लोकांना या झाडाचे उपयोगही माहित होते.
उ प यो ग - या झाडाचा महत्त्वाचा भाग म्हटला म्हणजे याचें लांकूड होय. तें दिसण्यांत सुरेख व मजबूत; असतें त्यामुळें नकशीदार खणाच्या पेट्या, बंदुकीचे दस्ते करण्याच्या कामीं या लांकडाचा अत्यंत उपयोग होतो. काश्मीरमध्यें आणि पंजाबांत, या लांकडावर कांतकाम व खोदकाम करुन, निरनिराळ्या शोभेच्या वस्तू तयार करतात. या झाडाच्या बुंध्यावरील मोठ्या गांठी अत्यंत मौल्यवान असतात. नकशीदार खणांच्या पेट्या करण्याच्या कामीं या गांठींच्या लांकडाचाच उपयोग होतो. कांही वर्षांमागें या गांठींची फ्रान्समध्यें अत्यंत मोठी निर्यात होत असे. या झाडाचीं पानें व फळाचें टरफल स्तंभक असतात, व त्यांचा औषधाकडे व रंगविण्याकडे थोडा थोडा उपयोग होतो. या झाडाच्या कच्च्या फळांचा लोणचें करण्याकडे उपयोग होतो. या फळझाडावर त्याच्या बिया फार स्वादिष्ट लागतात. फ्रान्समध्यें या बियांपासून उत्तम प्रकारचें तेल बर्याच मोठ्या प्रमाणांत काढण्यांत येतें. अक्रोडाची एक मोठ्या फळाची जात असते तिचा मगज उपयोगी पडत नाही. पण तिच्या कवचाच्या, फ्रेंच लोक, दागिन्यासाठीं पेट्या करितात. या झाडाच्या सालीचा हिंदुस्थानांत औषधाच्या कामीं व दांत स्वच्छ करण्याकडे उपयोग करितात. याचें फळ पौष्टिक आहे. यामुळें काश्मीर वगैरे प्रांतांतून याची फार मोठी निर्यात होते. फळांतील मगजापासून चांगलें तेल निघतें व साल कातडी कमावण्याच्या व रंगविण्याच्या उपयोगीं पडत. याच्या शाखांचा व पानांचा जनावरांस वैरणाच्या जागीं उपयोग करतात. अक्रोडाचें लांकूड दर घनफूटास ४० पौंड प्रमाणें वजनांत भरतें.
हें झाड मोठ्या आकाराचें असून यास एकआडएक देंठ असलेंलीं व चिंच, गुलाब, कढीनिंब इत्यादि झाडांच्याप्रमाणे पिच्छवत् विभागलेली संयुक्तपणे येतात. या झाडांतून विपुल व सुवासिक चीक निघतो. गळून पडलेल्या पानांमुळें फांद्यास पडलेले खांचखळगे इतर झाडांच्या मानानें बरेच मोठे असतात. पर्णाच्या कांखेत म्हणजे पान व फांदी यांच्यामधील कोणांत बहुधा एकाच्या ऐवजीं अनेक कोंब फुटतात; व पहिल्या कोंबापासून तयार झालेला फणगडा थंडीनें जळून गेला, तर बाकीच्या कोंबापैकी एखादा वाढीस लागून तो मेलेल्या फणगड्याची जागा भरुन काढतों. अक्रोडाचें फूल पोपया, भोपळा इत्यादींच्या फुलांप्रमाणे एकलिंगी व एकौकसीभूत आहे. म्हणजे त्याचें फूल स्त्रीकेसर किंवा पुंकेसर यांपैकीं कोणता तरी एक धारण करतें, व एरंडाप्रमाणें स्त्रीपुष्पें आणि नरपुष्पें ही एकाच झाडावर पण निरनिराळीं येतात. आधल्या वर्षीच्या फणगड्यावरील मांजराच्या शेंपटीसारख्या जाड पुष्पसंनिवेशांतून शेंकडां पुकेसर बाहेर पडून ते नूतन वर्षाच्या वाढींतील लहान लहान अग्रस्थ मंजिर्यांतून असलेल्या तुरळक स्त्रीपुष्पांत गर्भाधान करतात. नरपुष्पांत पुष्पासन हें ज्याच्या कक्षेंतून तें उद्भवतें त्या पुष्पोपांगणालगतच असतें. यामुळें पुष्पासन हें क्षितिजसमांतर राहून फुलें क्षितिजसमांतर वाढणार्या देंठांच्या वरील भागी ठेवल्याप्रमाणें दिसतात. परिकोश हा पांच सहा हिरवसर रंगाच्या पालिकांचा बनलेला असून त्यांत बर्याचशा पुंकेसराचा झुबका असतो. हा पुंकेसर म्हणजे ज्याच्या बाजूवर दोन लांबोळ्या ग्रंथींचा परागकोश व शेंड्यास आणखी एक लांबोळी ग्रंथि असते असा एक आंखूड तंतु असतो. नरपुष्पांत सामान्यतः अंडाशयाचा मागमूस दिसत नाही; तथापि क्वचित् प्रसंगी अपवादादाखल एखादा तयार झालेला आढळून येत नाहीं असें नाहीं.
स्त्रीपुष्पांतील पुष्पासन पेल्याच्या आकाराचें असून अंडाशय त्यासच जोडून असतो व त्याच्या वरच्या भागास एक उपपर्ण व दोन अल्पोपपर्णे असतात. परिकोश प्रांतभागांतून फुटतो व त्याला चार पालिका असतात. अंडाशय एकपेशीय असून तो पुष्पासनीय नलिकेंत असतो व त्यावर एक आंखूड परागवाहिनी व दोन लहान लहान पुष्पयोनीच्या शाखा असतात. अंडाशयाच्या तळापासून एकटें बीजांड ताठ वर आलेलें असतें. अक्रोडाचें फळ हें एक प्रकारें अष्टिवर्गांतील म्ह. आंत कोय व बाहेरुन गीर असलेल्यांपैकी फळ असून त्याचें भरीव टरफल म्हणजे प्रसृत पुष्पासनीय नलिका द्विदल अठळी म्हणजे दोन शिंबें होत. बियेंत मगज नसतो, पण कांहीं विलक्षण रीतीनें कुसमडलेल्या दोन मोठमोठ्या दाळिंब्या असून त्यांमध्ये कोंब झाकलेला असतो. ह्या कोंबाच्या पानांत या पूर्वावस्थेत देखील संयुक्तपर्णाच्या खाणाखुणा दृष्टीस पडतात.
अक्रोडाच्या झाडाला खोल रेताड चिकणमातीची जमीन किंवा चुनखडीचा गादा लागतो. अथवा जिच्या खालीं रेंवडा आहे अशा कठीण चिकणमातीच्या जमिनीवरहि तें वाढूं शकतें. यास हवा आणि प्रकाश मुबलक लागतो. या झाडाचा प्रसार बियांच्या साहाय्यनें होतो; परंतु जेव्हां विशिष्ट जातींची वाढ करावयाची असते तेव्हां कलम लावण्याची पद्धति स्वीकारतात. पहिल्या हिंवाळ्यांत रोपास थंडीची भीति असते. झाडांचे माथे निसर्गतःच बनत असल्यामुळें त्यांस कलम करण्याची आवश्यकता नसते; केवळ गुंतागुंतीनें एकमेकींच्या वाढीस अडथळा करणार्या फांद्या तोडल्या म्हणजे झालें. बियांपासून तयार झालेल्या झाडांपासून ती वीस वर्षांचीं झाल्याशिवाय उत्पन्न येत नाहीं. फळें येतात तीं आधल्या वर्षीच्या फांद्यांच्या शेंड्यांस येतात व म्हणून झाडांवरील फळें काढतांना कोवळ्या फांद्यांस इजा न होऊ देण्याची खबरदारी घेतली पाहिजे.
(संदर्भ ग्रंथ – वॅट – कर्मर्शिअल प्रॉडक्ट्स; व ब्रिटानिका )