विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अग्निमापक - अत्युष्णमान मोजण्याचें यंत्र. याला इंग्रजींत पायरॉमिटर म्हणतात. हा शब्द प्रथम मशेनब्रोक यानें धातुशलाकेच्या प्रसरणानें उष्णमान मोजण्याच्या यंत्रासाठीं उपयोजिला होता. एखाद्या धातूच्या अथवा क्षाराच्या वितळण्यावर अवलंबून असणार्या खंडित उष्णदर्शकाचाहि या कामाकडे उपयोग करण्यांत येतो. प्रिन्सेप यानें रुपें व सोनें आणि सोनें व प्लातिन यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या अशा मिश्रधातू बनविल्या कीं त्यांचे वितळण्याचे बिंदू ९५४० पासून १९७५० उष्णमानापर्यंत २५ पासून २० अंशांच्या अंतरानें पडतील. ज्या भट्टीचें उष्णमान पहावयाचें असेल त्या भट्टींत या मिश्रधातूंचे गोळे क्रमाक्रमानें टाकून त्यांपैकीं कोणता गोळा वितळतो हें पाहिलें असतां त्या भट्टीच्या उष्णमानाची स्थूल कल्पना सहज करतां येते. कार्नेली व विल्यम्स हे या कामासाठीं ज्यांचे वितळण्याचे बिंदू ठाऊक आहेत अशा विशिष्ट क्षारांचा उपयोग करीत होते. चिनी भांड्यांच्या कारखान्यांत ज्यांचा उपयोग करतात ते ' सेजरचे शंकू ' हे चिकणमातीचे केलेले लहान लहान शंकू असून त्यांच्या वितळण्यानें भट्टीचें उष्णमान कळतें.