विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अग्निपुराण - नांवावरुन हें पुराण अग्निमाहात्म्य वर्णन करणारें असावें असा साहजिक तर्क धांवतो; पण तसें नसून अग्नीनें वसिष्ठाला पाठविलेलें विद्यासार यांत ग्रथित केलें आहे. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, मन्वंतर आणि वंशानुचरित हीं पांच लक्षणें सामान्यतः पुराणांत प्रामुख्यानें आढळतात; यांशिवाय इतर अनेक विषय पुराणांत असतात. अग्निपुराणांत याच्या उलट प्रकार आहे. वरील पंचलक्षणांना यांत विशेष महत्व दिलें नसून, परा व अपरा या दोन विद्या यांत जास्त विवेचिल्या आहेत. यांखेरीज मनुष्याला उपयुक्त अशा पुष्कळ गोष्टी यांत घुसडून दिल्या आहेत, हें सहज चाळणारालाहि समजून येतें. थोडक्यांत याचें स्वरुप सांगावयाचें म्हणजे हा एक स्वतंत्र प्राचीन ज्ञानकोशच आहे. अवतारचरित्रें, भारतरामायणादि इतिहास ग्रंथ, पुराणें, वंशावळी जगदुत्पत्तिविवेचन, ज्योतिःशास्त्र, वास्तुशास्त्र, वैद्यकशास्त्र, नाट्यशास्त्र, छंदःशास्त्र, काव्य-व्याकरणशास्त्र, तत्त्वज्ञान, व्यवहारनीति, यांसारिखे विविध विषय यांत आहेत. पुराणामध्यें हा ग्रंथ तामस कोटींत घालण्यांत येतो याचें कारणच हें कीं यांत परमार्थासंबंधी फार थोडा उहापोह केला आहे.
कोणत्याहि एका विशिष्ट पंथाचा यांत पुरस्कार केलेला दिसत नसला तरी, शैवधर्माचें प्राबल्य या पुराणरचनेच्या काळीं असावें व मंत्रतंत्राकडे लोकांचा ओढा असावा असें वाटतें.
आनंदाश्रम संस्कृत ग्रंथावलींत प्रसिद्ध झालेल्या अग्निपुराणाच्या प्रतींत ३८३ अध्याय व ११४५७ श्लोक आहेत. नारदपुराणांत अग्निपुराणांतील श्लोकसंख्या १५ हजार व मत्स्यपुराणांत ही संख्या १६ हजार म्हणून म्हटली आहे. शिवाय या पुराणाची विषयानुक्रमणिका जी नारदपुराणांत दिली आहे त्यांत ईशनकल्पवृत्तांताचा उल्लेख केलेला आहे पण तो वृत्तांत उपलब्ध असणार्या अग्निपुराणांत नाहीं. तसेच बल्लाळसेनानें दानसागरांत अग्निपुराणांतील म्हणून जे उतारे घेतले आहेत त्यांतील कांहीं यांत नाहींत. तेव्हां या पुराणाचा कांहीं भाग लुप्त झाला असला पाहिजें हें सिद्ध होतें.
याचा काल कोणता हें सांगणें फार कठीण आहे. तथापि ख्रि. शकाच्या ५ व्या शतकानंतर व मुसलमानी स्वार्या हिंदुस्थानावर होण्याच्या आधीं याचें संकलन झालें असावें असें वाटतें.
संदर्भ ग्रंथ - दत्त - अग्निपुराण (वेल्थ ऑफ इंडिया सीरीज). काळे - पुराण निरीक्षण. विंटरनिझ - हिस्टरी ऑफ इंडियन लिटरेचर (जर्मन ग्रंथ). असन - हिंदु क्लसिकल डिक्शनरी. अग्निपुराण. आनंदाश्रम आवृत्ति.
या पुराणांत अनेक विषय आल्यामुळें या पुराणाचें सविस्तर वर्णन दिल्यास प्राचीन हिंदूंच्या सामाजिक व राजकीय आयुष्यक्रमाची साकल्यानें कल्पना येईल म्हणून या ग्रंथाचें सविस्तर वर्णन दिलें आहे. व प्रसंगीं ज्या अनेक विषयांविषयीं सामान्य वाचकास जिज्ञासा असेल अशा विषयांचे तर अधिक विस्तारशः वर्णन केलें आहे. अग्निपुराणांत अनेक शास्त्रांचें विवेचन आहे. निरनिराळ्या शास्त्रांवरील लेखांच्या प्रसंगीं अग्निपुराणांचा उल्लेख करावा लागतो किंवा त्यांतील शास्त्रविवेचनाचें स्वरुप द्यावें लागतें. यासाठी अग्निपुराणाचें यथार्थ स्वरुप येथेंच दिलेले बरें.
अं त रं ग नि री क्ष ण
दशावतार वर्ण अ. १-१६
पहिल्या अध्यायांत प्रथम श्लोकामध्यें लक्ष्मी, सरस्वती, गौरी, गणेश, स्कंद, ईश्वर ब्रह्मा, बन्हि, इन्द्रादिक, व वासुदेव यांचे मंगल केलें आहे. इतक्यांचे मंगल अथवा त्यांना केलेला नमस्कार इतरत्र आपणांस फारसा आढळत नाहीं.
ॠषींनी सूतांस आम्हांस सारांत सार काय आहे तें सांग असा प्रश्न केला. तेव्हां झालेला अग्निवसिष्ठसंवाद सूतानें ॠषींस सांगितला. हा अग्निवसिष्ठसंवाद म्हणजेच अग्निपुराण होय. परा व अपरा या दोन विद्येला धरुन हें पुराण सांगण्यांत आलें आहे. अर्थात् ॠग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद व त्यांची सहा अंगे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष व छंद, मीमांसा, धर्मशास्त्र, पुराण, न्याय, वैद्यक, गांधर्व, धनुर्वेद, अर्थशास्त्र, हीं अपरा व परा म्हणजे ब्रह्मप्राप्त्यर्थ सांगितलेली ज्ञानविषयक वचनें, ह्या परापरा विद्या होत. अशा तर्हेनें या पुराणाचा आरंभ झाला आहे.
दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे ब्रह्मदेव, सृष्टी वगैरे विषयांपासून या पुराणाला आरंभ न होतां अवतारचरित्रापासून आरंभ झाला आहे.
अ. २. मत्स्यावतारचरित्र अ. ३. कूर्मावतार. पद्मपुराण व मत्स्यपुराण यांमध्यें हे विषय आले आहेत. विषयांच्या प्रतिपादनांत फरक नाहीं. श्लोकरचना मात्र निराळी आहे. मत्स्यपुराणांत कुर्मांवतारचरित्र आढळत नाहीं. अवतार चरित्रें बहुतेक पुराणांत आहेतच. अ. ४ वराह, नारसिंह, वामन व परशुराम यांचीं संक्षिप्त चरित्रें, अ. ५ श्रीरामावतार. यांत वाल्मीकिरामायणांतील जन्मकांडाचा संक्षिप्त विचार आला आहे. अ. ६ रामायण, अयोध्याकांड. अ. ७ रामायण, अरण्यकांड अ. ८ रामायण, किष्किन्धाकांड. अ.९ रामायण, सुंदरकांड. अ. १० रामायण, युद्धकांड. अ.११ रामायण, उत्तरकांड. ''रामरावणयोर्युध्दं रामरावणयोरीव '' हा सुप्रसिद्ध श्लोकार्ध येथें आहे. हें रामायण संक्षिप्त असून त्यांत महत्त्वाचा कोणताही कथाविषय सुटलेला नाहीं. या एकंदर रामायणाच्या श्लोकांची संख्या १८९ आहे.
अ. १२ कृष्णावतार (यांत आलेल्या गोमंताचा निर्णय कसा करावयाचा. कारण गोमंत हा आपण जर गोवा प्रांत घेतला तर जरासंधाच्या स्वारीला भिऊन मथुरा सोडून कृष्ण इतक्या दूर पळून गेला असेल हें संभवनीय नाहीं. गोमंत हें पर्वताचें नांव आहे. भागवतांत त्या पर्वताचें नांव निराळें आहे.)
भारताख्यान अ. १३ । १४ । १५ यांत आहे. तीन अध्याय मिळून अवघे ७२ श्लोक आहेत.
अ. १६ वा. बुद्धवतार व कल्क्यवतार. बुद्धावताराची कथा सर्वत्र आहेच. बुद्धावताराची पौराणिक समजूत अथवा कथा अशी आहे कीं, पूर्वी देव दैत्यांच्या युद्धांत देवांचा पराभव झाला. तेव्हां देवांनीं विष्णूची प्रार्थना केली. विष्णूनें बुद्धाचा अवतार घेतला. तो काल असा होता कीं सगळे दैत्य वैदिक कर्म करणारे होते व त्यांस त्या धर्मापासून भ्रष्ट करुन त्यांचा नाश करावयाचा होता म्हणून बुद्धाचा अवतार विष्णूनें घेतला. म्हणून बुद्धांच्या मताचें अनुकरण करणारे बौद्ध होत. त्यापुढें जैनमताचा उद्भव झाला अशी समजूत व्यक्त केली आहे. जैनमताचा पुरस्कर्ता विष्णूचाच अवतार असें समजतात.
आर्हतः सोऽभवत्पश्चादार्हतानकरोत्परान् ॥
सृष्टीची उत्पत्ति अ. १७-२०
अ.१७. जगत्सर्गवर्णन; सर्ग म्हणजे ब्रह्मापासून हिरण्यगर्भ ब्रह्मापर्यंतची उत्पत्ति. हें वर्णन सर्वांच्या परिचयाचें आहे. ''अप एव ससर्जादौ '' हा श्लोक इतर पुराणाप्रमाणें येथेंहि आहे (१७।७). अव्यक्त ब्रह्म, प्रकृति-पुरुष, महत्व, अहंकार, तो तीन प्रकारचा, वैकारिक, तैजस, व तामस अहंकार. - आकाश वायु, तेज पाणी व पृथ्वी ही तामस अहंकाराची संतती. तैजस अहंकारापासून इन्द्रियें व वैकारिक अहंकारापासून इन्द्रियांच्या अधिष्ठातृ देवता व मन हीं उत्पन्न झालीं. ''ततःस्वयंभूर्भगवान् '' या श्लोकार्धापासून अध्याय संपेपर्यंत सगळे श्लोक भारतांतून घेतले असावेत. कारण दोन्ही ग्रंथांत श्लोकरचनेचें साम्य आहे असें टीपाकारानें म्हटलें आहे. हेच श्लोक हरिवंश अ. २ यामध्यें आहे असें टीपाकार म्हणतो. अ. १८ वा स्वायंभुवमनुवंशवर्णन, हा अध्याय थोड्या फार फरकानें पूर्वीच्याच अध्यायाप्रमाणें हरिवंशांत आहे. अ. १९ कश्यपवर्णन अ. २० जगत्सर्गवर्णन ( पुढें चालू ) अ. १७ यांत सांगितलेल्या प्राकृतादि तीन सर्गांच्या पुढचें हें वर्णन आहे प्राकृतसर्गामध्यें महत्सर्ग ( महतापासून अहंकारापर्यंत ), भूतसर्ग (आकाशापासून पृथ्वीपर्यंत ), वैकारिक सर्ग ( भूतांच्या सूक्ष्मत्वानें बनलेला इंद्रियवर्ग ), हे तीन सर्ग मोडतात. विकृत सर्गामध्यें स्थावर, तिर्यक् स्त्रोतस, अर्धःस्त्रोतस, ऊर्ध्वस्त्रोतस व अनुग्रहसर्ग असे ५ भाग कल्पितात. तियग्स्त्रोतस् म्हणजेच तिर्यक् योनीमध्यें जन्मलेले प्राणी, उर्ध्वस्त्रोतस् म्हणजेच देवसर्ग, अर्वास्त्रोतस् म्हणजे मनुष्य सर्ग, हे वैकृत पांच व तामस तीन मिळून ८ सर्ग, व नववा सात्विककुमारसर्ग होय. म्हणून ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेले जगाचे मूलभूत नऊ सर्ग होत.
देवोपासना व मंत्र अ. २१ - ३८
अ. २१ विष्ण्वादि देवतांची सामान्यपूजा. यांत देवतांच्या मंत्रबीजांचें विधान आहे. अ. २२ पूजाधिकारार्थ सामान्य स्नानविधि. अ. २३ आदिमूर्त्यादि- पूजाविधि अ. २४ कुंडनिर्माणादि अग्निकार्यादिकथन. षोडशसंस्कार. अ. २५ वासुदेवादि मंत्रलक्षण. अ.२६ मुद्रालक्षण. अ. २७ शिष्यांना दीक्षा देण्याचा प्रकार. अ. २८ आचार्यभिषेक वर्णन. अ. २९।२९ मंत्रसाधनविधि, सर्वतोभद्रादि लक्षण व विधान. अ. ३०; ३१ अपामार्जनविधान. अ. ३२ निर्वाणदीक्षासिध्यर्थसंस्कारवर्णन. अ. ३३।३६ पवित्रकारोपण विधि, पूजा व होम, (अधिवासन व इतर देवतासंबंधी पवित्रारोपण विधि-उत्तर खंड अ. ८९ पद्म पुराण त्यांत व ह्यांत फरक आहे. हा पवित्रारोपण विधि श्रावण महिन्यांत सांगितला आहे. ) अ. ३८ देवालयनिर्माणफल, निर्माणारंभ. देवालय निर्माण करण्यासाठीं जमीनीची परीक्षा. ही परीक्षा पंचरात्र, अथवा सहा रात्र यांमध्यें दिली आहे. प्राणप्रतिष्ठा करण्याला लायक ब्राह्मण कोण याचा ग्रंथोक्त विचार येणेंप्रमाणें. मध्यदेशांतील ब्राह्मण प्राणप्रतिष्ठेला योग्य आहे. कच्छ, कावेरी, कोंकण, कलिंग, कांची, काश्मीरक या देशांतील ब्राह्मण प्रतिष्ठेला अयोग्य आहेत. जमीनीचा उंचवटा काढून टाकून ती सारखी करावी व मापावी. नंतर अष्टदिशेकडे सातु, उडीद, हळद वगैरे द्रव्यें टाकावींत. त्या योगानें राक्षस पिशाच्च वगैरेंचा नाश होतो. ही जमीन देव स्थापनेला योग्य होते. ही जमीन सारखी करण्याचें यंत्र म्हटलें म्हणजे बैलांकडून नांगर ओढणें हा होय. हा विषय कमी जास्त प्रमाणानें मत्स्यपुराण अ. २५२ पासून आला आहे.
उ पा स ना मि श्र वा स्तु शा स्त्र ३९.१०६
अध्याय ३९ पासून ४५ पर्यंतचा विचार वास्तुशास्त्रविषयक विचार आहे. यांतील बराचसा भाग दुर्बोध आहे.
अ. ४६/४७ शालग्राम लक्षण. व पूजन अ. ४८ केशवादि चोवीस नांवांच्या मूर्तीचें स्तोत्र. अ. ४९ दशावतारप्रतिमालक्षण. अ.५० चंडी आदि देवींच्या प्रतिमेचीं लक्षणें; अ. ५१ सूर्यादिग्रहदेवताप्रतिमालक्षणें. अ. ५२ चौसष्ट्योगिनीप्रतिमालक्षणें अ. ५३ लिंगादिलक्षण. अ. ५४ लिंगाच्या प्रमाणाचें व्यक्ताव्यक्तस्वरुप. अ. ५५ पिंडिकालक्षण. अ. ५६ दशदिक्पालयागवर्णन. अ. ५७ कलशाधिवासविधि. अ. ५८ स्नपन विधि. अ. ५९ अधिवासनविधि. अ. ६० वासुदेवादि देवतांची सामान्य प्रतिष्ठा. अ. ६१ अवमृतस्नान, द्वारप्रतिष्ठा. ध्वजारोपण विधि. अ. ६२ लक्ष्यादिदेवताप्रतिष्ठासामान्यविधि. अ.६३ विष्णवादिदेवताप्रतिष्ठासामान्यविधि. पु स्त क ले ख न वि धि. - हें कसें लिहावें याचा विचार नसून फक्त वर सांगितलेले नारसिंह मंत्र रुपेरी अथवा सोनेरी शाईनें नागर भाषेमध्यें लिहावेत येवढाच उल्लेख आहे.
स्था प ना क र्म - अ. ६४ कूपवापीतडागप्रतिष्ठाविधि. अ. ६५ सभादिस्थापनविधि. अ. ६६ जमीनीची परीक्षा करुन तेथें वास्तुयाग करावा. ही सभा चौक अथवा गांवाच्या आरंभी करावी, शून्य ठिकाणी करूं नयें. या सभेमध्यें चार, तीन, दोन अथवा एक शाल किंवा कोपरे हे सोडावेत.
अ. ६६ देवतासामान्यप्रतिष्ठा. अ. ६७ जीर्णोद्वारविधि. अ. ६८ वा उत्सवविधि. अ. ६९ मूर्तीना स्नान घालण्याचा विधि. अ. ७० पादपप्रतिष्ठा. वृक्षांना अलंकृत करुन सोन्याच्या सुईनें टोंचे मारावेत व नंतर पूजा करावी. अ.७१ गणपतिपूजा. अ. ७२ स्नानविधि. अ. ७३ सूर्यप्रजाकथनं सूर्याच्या अंगाला रक्षावगुंठन करुन पूजा करावी. अ. ७४ / ७५ शिवपूजाहोमविधि. जप करतांना चर्मानें वेष्टिलेलें खड्गचें गंध, फूल, अक्षता, दर्भ इत्यादिकांनीं पूजावें. ऱतांत अर्ध्याचें पात्र घेऊन अग्निगृहांत जावें. यागाला लागणार्या सर्व द्रव्यांची तरतूद ठेवावी. उत्तरेकडे तोंड करुन कुंडांवर प्रोक्षण करावें. हें प्रोक्षण अस्तमंत्रानें करावें, वर्मानें अभ्युशण, खड्गानें जमीन उकरणें, वर्मानें सारखी करुन पाणी शिंपडणें, बाणाच्या टोकानें मातीचें ढेंकूळ फोडणें, त्रिसूत्री परिधान, वर्माने पूजन अशाच तर्हेनें ही सर्व तांत्रिक पूजा आहे असें समजावें.
अ. ७६ चंडपूजा अ. ७७ कपिलापूजा अ. ७८ पवित्राधिवासनविधि. कुलधर्म अजून प्रसिद्ध आहे अ. ७९ पवित्रारोहण विधि. अ. ८० दमनका रोहणविधि. अ. ८१ समयदीक्षा अ. ८२ वा. संस्कारदीक्षा.
हे सर्व विषय मंत्रशास्त्रांतले आहेत.
अ. ८३ निर्वाणदीक्षाविधि. अ. ८४ निवृत्तिकलाशोधन. अ. ८५ प्रतिष्ठाकलासंशोधन. अ. ८६ विद्यासंशोधनविधि. अ. ८७ शांतिशोधनविधि. अ. ८८ निर्वाणदीक्षाशेषविधि वर्णन. अ. ८९ एकतत्त्वदीक्षाविधि. अ. ९० अभिषेकादि. अ. ९१/९२ प्रतिष्ठविधि, अभिषेकानें देवतापूजन संक्षेपानें. अ. ९३ वास्तुपूजा. अ. ९४ शिलाविन्यास. अ. ९५ प्रतिष्ठा कालसामग्र्यादिविधि. अ. ९६ प्रतिष्ठाविधींतील अधिवासनविधि. अ. ९७ शिवप्रतिष्ठाविधि. अ. ९८ गौरीप्रतिष्ठाविधि. अ. ९९ सूर्यप्रतिष्ठा. अ. १०० व्दारप्रतिष्ठाविधि अ. १०१ प्रासादप्रतिष्ठा. अ. १०२ ध्वजारोपणविधि.
अ. १०३ जीर्णोद्धारविधि. अ. १०४ प्रासादलक्षण. अ. १०५ गृहादिवास्तुविचार. अ. १०६ नगरादिकवास्तुकथन.
भू गो ल ज्ञा न - अ. १०७ प्राचीनभूगोलज्ञानबोधक आहे स्वायंभुवसर्ग. स्वयंभुमनूच्या वंशाचा थोडक्यांत उल्लेख. अ. १०८ भुवनकोश. या भुवनामध्यें सात द्वीपें असून त्यांच्या भोंवतीं सहा सागराचा वेढा आहे. त्या सप्तदीपांचीं नांवें :- जंबु, प्लक्ष, शाल्मलि, कुश, क्रौंच, शाख व पुष्कर, हीं होत. सहा समुद्रांचीं नांवें - खारा समुद्र, उंसांचा समुद्र, दारुचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, दुधाचा समुद्र, गोड्या पाण्याचा समुद्र. अ. १०९ तीर्थमाहात्म्य. अ. ११० गंगामहात्म्य. अ. १११ प्रयागमाहात्म्य. अ. ११२ वाराणसी माहात्म्य. अ. ११३ नर्मदामाहात्म्य. अध्याय ११४ ते ११६ गयामाहात्म्य. पुराणांतील ''एको मुनिः कुंभकुशाग्र हस्त '' हा रुढ श्लोक या ठिकाणीं गाहे. अ. ११७ श्राद्धकल्प. ११८ भारतवर्ष या भरतवर्षात इन्द्रद्वीप, कसेरु, ताम्रवर्ण, गभस्ति, नागद्वीप, सौम्य, गांधर्व, वारुण, अशीं आठ वर्षे आहेत. ११९ महाद्वीपादिवर्णन. १२० भुवनकोशवर्णन.
फलज्योतिषमिश्रित ज्योतिःशास्त्र व वैद्यक अ. १२१-१४१ अ. १२१ ज्योतिःशास्त्र. अ. १२२ कालगणना. १२३ युद्ध जयार्णवीय. नानायोगांची नांवे. युद्धजयार्णव हा ग्रन्थ दिसतो. स्वरोदय, शनिचक्र, कूर्मचक्र, व राहुचक्र, हे यांत विषय आहेत. अ. १२४ युद्धजयार्णवीय ज्योतिःसारवर्णन. अ. १२५ युद्धजयार्णवीय नानाचक्रवर्णन. हा व या पुढील वर्णनभाग मंत्रशास्त्राचा आहे. अ. १२६ नक्षत्रनिर्णय. अ. १२७ नानाबल.
अ. १२८ कोटचक्र. अ. १२९ अर्धकाणु. अ. १३० मंडलादिकथन. १३१ घातचक्र. १३२ सेवाचक्र. १३३ नानाबलवर्णन. गर्भामध्यें असलेल्या जीवाचें ग्रहबलावरुन स्वरुपवर्णन; उदाहरणार्थ. सूर्याच्या घरांत पडलेला फार उंच स्थूल, कृश, ठेंगणा असा नसून मनुष्य मध्यम असतो, गोरा व पित्त प्रकृतीचा असून रक्ताक्ष, गुणी व शूर उपजतो. याप्रमाणें पुढील ग्रहांचें बलाबल जाणणें. याचप्रमाणें ग्रहांच्या दशांचें बलाबल वर्णिलें आहे. याशिवाय मंत्रविद्या वर्णिली आहे. अ. १३४ त्रैलोक्यविजयविद्यामंत्रशास्त्र. अ. १३५ संग्रामविजयविद्या. अ. १३६ नक्षत्रचक्र. अ. १३७ महामारीविद्याकथन (मंत्र). अ. १३८ मंत्रशास्त्रांतील सहा कर्मे. अ.१३९ साठ संवत्सरांचीं नांवें अ. १४० वश्यादि योग. यांत कांहीं वनस्पतींचीं नांवें आहेत.
अ. १४१ छत्तीस पदकांचें ज्ञान. वनस्पतींचा व इतर द्रव्यांचा उल्लेख आहे. येथें ज्योतिषमिश्र वैद्यक आहे. हिरडा (हरीतकी), ब्याहडा (अक्ष), अवळकाठी (आमलकी), मिरें (मरीच), पिंपळी (पिप्पली), बाळंतशेप (शिफा), चित्रक (वन्हि), सुंठ (शुंठी), गुडुची (गुळवेळ), वेखंड (वचा), निंब (निंबक), अडळसा (वासक), शतावरी (शतमूली), सैंधव (सैंधंव), सिंधु वारक, निर्गुडी (कंटकारी), गोखरु (गोक्षुरक), बेल (बिल्व), पुनर्नवा किंवा घेटोळी (पौनर्नवा), एरंड, मुंडी, शेंदेलोख (रुचक), माका (भृंग), क्षार, पित्तपापडा (पर्पट), धणे (धन्याक), जिरें (जिरक), बडीशेष (शतपुष्पी), ओंवा (जवानिका), वावडींग (विडंग), खैर (खदिर), बाहवा (कृतमाल), सिद्धार्थ, दारुहळद, मोहरी.
अ. १४२ मंत्रौषधिप्रकरण. प्रश्न कसा पाहवायाचा विचार अ. १४३/१४४ कुब्जिका पूजा, अ. १४५ मालिनी मंत्र. अ. १४६ अष्टाष्टकदेव्य. अ. १४७ त्वरितापूजा. अ. १४८ संग्रामविजयपूजा. अ. १४९ लक्षकोटिहोम.
व र्णा श्र म ध र्म अ. १५० मन्वंतरें. अ. १५१ वर्णेतर धर्मकथन. सर्व धर्मांचें श्रवण करावें, राजांवर प्रेम ठेवावें. याशिवाय अहिंसा सत्यवदन वगैरे धर्म सार्ववर्णिक आहेतच. वध्यांचा वध करणें हें चांडाळाचें काम होय स्त्रियांवर उपजीविका करणें व त्यांचे रक्षण करणें हें वैदेहकाचें काम होय. अश्वसारथ्य करणें हें सूताचें काम होय. व्याधाचें काम करणें हें पुल्कसाचें काम होय. राजाची वंशावळीं गाणें अथवा स्तुति करणें हें मागधाचें काम होय. रंगावतरण व शिल्पावर जीवन करणें हें आयोगवाचें काम होय. गांवाच्या बाहेर राहणें व मृतांचीं वस्त्रें धारण करणें हें चांडाळाचें काम होय. चांडाळ अस्पृश्य होय.
गाईसाठीं अथवा ब्राह्मणासाठीं अथवा स्त्रिया मुलें वगैरे आपत्ती मध्यें पडल्यास त्यांच्यासाठीं ज्यानें आपला देह खर्ची पाडला तो ह्या बाह्य वर्गांतून वर येतो. किंवा त्या बाह्याची सिद्धि होते.
गृ ह स्थ वृ त्ति. अ.१५२ गृहस्थवृत्ति. मरेपर्यंत ब्राह्मणानें आपली वृत्ति सोडूं नये. तथापि आपत्कालीं त्यानें क्षत्रिय, वैश्य अथवा शूद्र वृत्तीचा आश्रय करावा. या पुढच्या म्हणजे बाह्यांच्या वृत्तीचा आश्रय करुं नये. कृषि, वाणिज्य, गोरक्षा, व व्याजबट्टा हें ब्राह्मणाच्या वृत्तीचें साधन आहे. गोरस, गूळ, मीठ, लाख, व मांस हीं विकूं नये. भूमी खणून, औषधी तोडून, पिपीलिकांदिकांचा नाश केल्यानें घडणार्या पातकांचा नाश यज्ञानें होतो. पण हे यज्ञाचें फल देवपूजेनेंच शेतकर्यास प्राप्त होतें. नांगरास आठ बैल जुंपणें उत्तम, ६ जोडणे मध्यम, चार जोडणें अधम व २ जोडणे अधमाधम. याला धर्म्य, जीवितार्थ, नृशंस व धर्मघातक अशीं नांवें आहेत.
अ. १५३ ब्रह्मचर्याश्रम धर्म. अ. १५४ विवाह. विवाहाच्या वेळेस क्षत्रिय स्त्रीनें बाण, वैश्यस्त्रीनें चाबूक, शुद्रस्त्रीनें फडकें हातांत धरावें. अपत्यविक्रयास प्रायश्चित नाहीं. ''नष्टे मृते प्रव्रजिते.'' हा पाराशर स्मृत्युक्त श्लोक येथें आहे. अ. १५५ आचार. अ. १५६ द्रव्यशुद्धि अ. १५७ प्रेतासंबंधी अशौचनिर्णय अ. १५८ गर्भस्त्रावाचा अशौचनिर्णय. अस्थिसंचयनास. ४।५।७।९ हे दिवस अनुक्रमानें घ्यावे असें हा ग्रंथकार म्हणतो. परंतु पराशरमाधवामध्यें ३।५।७।९ हे दिवस घेतले आहेत व अस्थिसंचयन गोत्रजांसह करावें असें मत दिलें आहे व चतुर्थाबद्दलचा उल्लेख विष्णुस्मृतीचा केला आहे. अ. १५९ अ. संस्कृतादिशौचनिर्णय. अ. १६० वानप्रस्थाश्रमवर्णन अ. १६१ यतिधर्म. अ. १६२ धर्मशास्त्रकथन अ. १६३ श्राद्धकल्पवर्णन.
१६४ नवग्रहहोम १६५ नानाधर्मवर्णन; ''न स्त्री दुष्यति जारेण ... बलात्कारोप भुक्ता चेत्'' बलात्कारानें उपभुक्त स्त्री अथवा शत्रु हस्तगत स्त्री टाकावी; ती ॠतुकालीं शुद्ध होते. कित्येकांच्या मतें योगाची व्याख्या 'मन व इन्द्रियें यांच्या संयोगास योग म्हणतात' (विषयेन्द्रियसंयोगेकाविद्योगंवदंतिवै) अशी आहे; परंतु ग्रंथकारास हें म्हणणें पसंत नाहीं. असवर्णानें स्त्रीचे ठायी राहिलेला गर्भ तो असेपर्यंत ती स्त्री अशुद्ध आहे. शल नाहिसें झाल्यावर रजानंतर ती स्त्री शुद्ध होते. (अशुद्धतुभवेत्नारी यावच्छल्यंनमुंचति ) अ. १६६ वर्णधर्मादिकथन अ. १६७, ग्रहयज्ञ अयुतलक्षकोटिहोम अ. १६८।१७४ महापातकादिकथन व प्रायश्चित्त.
व्रतें. अध्याय १७५ पासून २०८ पर्यंत अध्याय व्रताकडेसच दिलें आहेत. अ. १७५ व्रतपरिभाषा अ. १७६ प्रतिपदा व्रतें. अग्निव्रत अ. १७७ द्वितीयाव्रतें. अ. १७८ तृतीयाव्रतें. अ. १७९ चतुर्थीव्रत. अ. १८० पंचमीव्रतें अ. १८१ षष्ठीव्रतें. अ. १८२ सप्तमीव्रतें. अ. १८३।१८४ अष्टमीव्रतें अ. १८५ नवमीव्रतें. अ. १८६ दशमीव्रतें. अ. १८७ एकादशीव्रतें. १८८ द्वादशीव्रतें. अ. १८९ श्रवणद्वादशीव्रत. अ. १९० अखंडद्वादशीव्रत. अ. १९१ त्रयोदशीव्रतें. अ. १९२ चतुर्दशी व्रतें. अ. १९३ शिवरात्रिव्रत. अ. १९४ अशोकपौर्णिमाव्रत. अ. १९५ वारव्रतें. अ. १९६ नक्षत्रव्रतें. नक्षत्र पुरुष कल्पून त्याची पूजा करावयाची. अ. १९७ दिवसव्रतें. अ. १९८ मासव्रतें. अ. १९९ अनेक व्रतें. अ.२०० दोपदानव्रत. तुलनेसाठीं या एकंदर व्रतांचा व त्यासंबंधीच्या कथांचा संग्रह आपणांस व्रतराज, व्रतार्क किंर्वा व्रतकौमुदी वगैरे धार्मिक ग्रंथांमध्यें सांपडेल. या अध्यायांत देविका नदीचें नांव आहे. ही कोठें आहे, हें कळत नाहीं.
अ. २०१ नवव्यूहार्चन. अ. २०२ पुष्पवर्गकथन, देवांच्या पूजेला लागणारीं निरनिराळ्या तर्हेचीं फुलें. अ. २०३ नरक वर्णन. अ. २०४ मासोपमासव्रत. अ. २०५ भीष्मपंचकव्रत अ. २०६ अगस्त्यार्ध्यदानकथन अ. २०७ कौमुदव्रत अ. २०८ व्रतनादादिसमुश्चय.
दा न मी मां सा - अ. २०९ दानपरिभाषाकथन. अ.२१० महादानविधि अ.२११ अनेक प्रकारची दानें. ज्यांच्यापाशीं दहा गाई आहेत त्यांनी १ द्यावी. याप्रमाणें दशांशाचें प्रमाण आहे. येथें उल्लेखिलेलें महिषदान हें आम्हांस अपरिचित वाटतें. तसेच रुप्याचा चंद्र करुन मस्तकीं धरावा; व तो ब्राम्हणाला द्यावा. आपला लोखंडाचा पुतळा करुन देणें किंवा निरनिराळ्या द्रव्यांचा पुतळा करणें, तो असा. पुरुष काळ्या तिळाचा बनवावा. दांत रुप्याचे बनवावे, डोळे सोन्याचे, हातांतील तरवार उगारलेली दाखवावी, तांबडे वस्त्र नेसलेला, शंखाच्या माळा घातलेला, पायांत पादत्राण घातलेला, काळी कांबळ पांघरलेला, डाव्या हातांत मांस दिलेला, सोन्याच्या अश्वावर बसलेला असा हा काल पुरुष करावा.
ब्राह्मणाला दासी अर्पण करावी. (दासीं दत्वा द्विजेन्द्राय) बसवपुराणांत बसव हा जंगमांस पुष्कळ वेश्या देत असे असें वर्णन आहे, त्यास हंसावयास नको अ. २१२ मेरुदान अ. २१३ पृथ्वीदान अ. २१४ नाडीचक्र. अ. २१५ संध्याविधि. गायत्री जप व हवन यांसंबंधीं विचार सांगितला आहे. अ. २१६।२१७ गायत्रीनिर्वाण. अ. २१८ राजधर्माचें वर्णन. पूर्वी राज्याभिषेक कालीं राजाला सर्व तर्हेच्या धार्मिक लोकांचे पालन करीन अशी प्रतिज्ञा करावी लागत असे. निरनिराळ्या ठिकाणांची माती राजाच्या प्रत्येक अवयवाला लावावी असा आचार असतो. पर्वतशिखरावरची माती राजाच्या मस्तकी लावावी, वारुळाची माती कानांवर लावावी, मुखीं विष्णुच्या देवालयाची लावावी. याप्रमाणें जाणावें. ठिकठिकाणच्या मातींचें वर्णन करतांना वेश्येच्या दाराची माती घेऊन राजाच्या कंबरेला लावावी असा आचार सांगितला आहे. सर्व वर्णाकडून राजाला अभिषेक झाल्यावर त्यानें आरशांत व तुपांत पहावें. विष्णुदिकांचें पूजन करावे. शय्येवर व्याघ्रचर्म टाकलेलें असावें. व त्यांवर पुरोहितानें बसून राजास मधुपर्क देऊन वस्त्र बांधावें (पट्टबंध). राजानें मुगुट बांधावा. या मुगुटामध्यें पंचचर्म असावें, म्हणजे मुगुट घालतांना, ज्याप्रमाणें आज शिपायांच्या पटक्यांत टोपी आपणांस आढळते तसें मुकुटामध्यें चर्म बांधावें (पंचचर्मोजरंददेत्). नंतर बैलाच्या, सिंहाच्या, वाघाच्या किंवा चित्त्याच्या कातड्यांवर राजानें बसावें. प्रतिहारीनें प्रधान, सचिव वगैरे लोक दाखवावे; म्हणजे त्यांची माहिती करुन घ्यावी. नंतर दानें वगैरे ब्राह्मणांस देऊन घोडा व हत्तीची पूजा करुन राजाची मिरवणूक राजमार्गानें काढावी.
अ. २१९ अभिषेकमंत्र, या मंत्रांत कांहीं देव, ॠषी, पर्वत, देश, नद्या यांचीं नांवें आली आहेत. त्यांत नद्यांची बरींच अपरिचित नांवें आहेत. अच्छोदा, देविका, वरुणा, निश्चिरा, पारा, रुपा, गौरी, वैतरणी, अरणी वगैरे. अ. २२० साहाय्यसंपत्ती म्हणजे अधिकारीमंडळ अथवा राज्यव्यवस्थेस लागणारीं खाती व त्यांवर अधिकार्यांची योजना. राजाला राज्याभिषेक झाल्यावर त्यानें शत्रूंना जिंकावें. सेनापती ब्राह्मण किंवा क्षत्रिय असावा. धनाध्यक्षास म्हणजे खजिनदाराला रत्नाची व हिशेबाची माहिती असावी. हस्त्याध्यक्ष हा जितश्रम असावा; त्याला हस्तीची परीक्षा असावी. तसाच घोडदळाचा मुख्य अश्वशास्त्रांत पारंगत असावा; (दुर्गाची) किल्लेदार फार हुषार असावा; तसाच वास्तुचा अधिकारी (स्थपती) हा शिल्पशास्त्रांत निष्णात असावा. मंत्री हुषार असावा. सभासद धर्म जाणणारे असावेत. यंत्रमुक्त, पाणिमुक्त, अमुक्त, व मुक्तधारित, हे चार प्रकार बाण व शास्त्र सोडण्याचे आहेत. आचार्य वरील चारी प्रकारांत तद्ज्ञ असावा व युद्ध करण्यांत कुशल असून राजाचें हित साधणारा असावा. प्रतिहारी नीतिशास्त्रामध्यें तद्ज्ञ असावा. दूत गोड बोलणारा, अक्षीण, व अतिबलाढ्य असावा. किंवा प्रतिज्ञेदाखल राजास विडा देण्यासाठीं ज्याची योजना करीत तो तृतीयप्रकृती असे; सारथ्याकडे कामाची बरीच जबाबदारी असे. तो पूर्ण राजनिष्ठ असून संधिविग्रह, षाड्गुण्य, सैन्यादि सर्व जाणारा राजाचें रक्षण करण्यासाठीं नेहमीं हातांत तलवार धारण करणारा असावा. (सूदाध्यक्ष ) आचारी किंवा पाकशास्त्रज्ञ हा त्या पाकशास्त्रांत पूर्ण असावा.
लेखक वळणदार अक्षराचा (अक्षरवित्) असावा. (दौवारिक) देवडीवाला चतुर असावा म्हणजे बोलण्याची कला जाणणारा असावा. वैद्य आयुर्वेद जाणणारा असावा. अंतःपुरांतील कारभारी वृद्ध असावा. अंतःपुरांत काम करणार्या स्त्रिया पन्नास वर्षांच्या पुढें व पुरुष सत्तर वर्षांच्या पुढें असावेंत. आयुधागारामध्यें असणारा पुरुष नेहमीं सावध (जागृत) असावा.