विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अधर्मसंतति :- प्रत्येक देशांत अनीतीच्या आचरणामुळें झालेली संतति आहेच. आणि ही संतति अनेक प्रकारचे सामाजिक प्रश्न उभे करते. वेश्यागमन आणि शरीरविक्रय यामुळेंच केवळ अणीतीचें आचरण होतें असें नाहीं तर अन्यत्रहि बरेंच होतें, निदान अधर्मसंततीची संख्या वाढविण्यास वेश्यागमनाहून निराळीं कारणें आहेत. आपल्याकडे अधर्मसंततीचीं कारणें अनेक आहेत. दासी वण्याच्या चालीनें देवळांतल्या भाविणीपासून झालेल्या संततीनें, आणि वैधव्यांत असलेल्या स्त्रियांच्या अनीतीच्या आचरणानें अधर्मसंतति उत्पन्न झाली आहे. आपणांकडे कुमारींपासून झालेल्या मुलांची संख्या फारशी नाहीं तथापि नाहींच असेंहि नाहीं. पंढरपूरच्या अनाथ बालकाश्रमाच्या अहवालांत कुमारिकांपासून झालेल्या मुलांचेहि आकडे येऊं लागले आहेत. पाश्चात्य देशांत अधर्मसंतति बहुतेक अंशी कुमारींपासून झालेलीच असतें.
अधर्मसंततीचें भिन्न भिन्न प्रमाण, समान आचारविधींनीं नियंत्रित झालेल्या समाजांचा नैतिक दर्जा कांहीसा दिग्दर्शित करितें, तरी निरनिराळया राष्ट्रांची जेव्हां आपण तुलना करूं तेव्हां अधर्म संततीच्या प्रमाणावरून राष्ट्रांतील नीतिमत्ता ठरवितां येणार नाहीं. एखाद्या देशांत अधर्मसंततीचें प्रमाण अतिशय मोठें असलें तर त्याचें कारण तेथील नीतिमत्ता बिघडली आहे हेंच केवळ नसून तेथील आचारविधी किंवा आर्थिक स्थिति तरुणपणीं विवाहाला पोषक नसतील किंवा मुलांच्या आईबापांनीं मागाहून लग्न केल्यास मुलें औरस बनणें तेथील कायद्याप्रमाणें शक्य होत असल्यामुळें अधर्मसंतति हा मोठया महत्त्वाचा प्रश्नच नसेल. ज्या लोकांत अधर्मसंततीचें प्रमाण बरेंच कमी असेल, पण गर्भपात व गर्भधारणेला मुद्दाम प्रतिबंध करणें यासारख्या पद्धति प्रसृत पावल्या असतील तर त्या लोकांत केवळ अधर्मसंततीचें प्रमाण पाहून त्यांची नीतिमत्ता उच्च तर्हेची ठरविणें भ्रामक आहे. या तर्हेची चूक न्यूआ होमनें आपल्या 'व्हायटल स्टॅटिस्टिक्स' वरील ग्रंथांत केली आहे; बहुतेक ख्रिस्ती देशांतल्यापेक्षां मुसुलमानी देशांत अधर्मसंतति नि:संशय कमी आहे. पण तेवढयावरून मनोनिग्रहाच्या बाबतींत मुसुलमान श्रेष्ठ आहेत असें म्हणतां येत नाहीं. तथापि समान संस्कृति व आचारधर्म असलेल्या भिन्न समाजांत अधर्मसंततीच्या प्रमाणांत जी भिन्नता येते, ती नीतिकल्पना व नीतिभावना कांहीं अंशीं स्पष्ट करण्यास खास उपयोगी पडते.
ज्या स्त्रियांस अधर्मसंतति होते त्या स्त्रिया सर्वस्वी वाईट असतात असें नाहीं. स्त्रियांसंबंधी विचार ( Thoughts about Women ) या ग्रंथांत मिस मुलॉक (Miss Mulock) अशा स्त्रियांविषयीं विधान करिते कीं, ''अशा पतित झालेल्या स्त्रिया त्यांच्या दर्जाच्या मंडळींत निकृष्टतम मुळींच नसतात. त्यांच्यापैकीं पुष्कळ अतिशय उत्तम म्हणजे सुधारलेल्या, हुषार सत्यवादी आणि प्रेमळ असतात, असें बर्याच स्त्रियांकडून मीं ऐकिलें आहे.'' स्कॉट, गोएटे (Goethe), ह्युगो, हॅथॉर्न, टॉल. स्टॉय आणि जॉर्ज इलिअट यासारख्या अद्भुतरम्य काव्यकारांनीं असेंच दाखविलें आहे.
अधर्मसंततीच्या प्रमाणाविषयीं कांहीं नियम आंकडेशास्त्राच्या साह्यानें आढळून येतो काय, असा प्रश्न केल्यास त्यास होय म्हणून उत्तर देतां येईल. दरवर्षीं त्याच देशांत किंवा समाजांत, तितक्याच वारंवार या प्रकाराची आवृत्ति होते. उदाहरणार्थ, इंग्लंडमध्यें गेल्या पंधरा वर्षांत अधर्मसंततीचें प्रमाण दर हजारीं ३९ आणि ४२ यांच्यामध्यें कोठेंतरी असे. हें या राष्ट्रांतील प्रमाण इतकें एकसारखें आहे कीं १८९१ मध्यें आलबर्ट लेफिंगवेल यानें असें भविष्य वर्तविलें होतें कीं १८९३ साली इंग्लंड आणि वेल्स मध्यें जन्माला येणार्या दर हजार मुलांमध्यें निदान ४२ किंवा ४३ मुलें अनीतिज असतील आणि अशा मुलांची एकंदर संख्या सुमारें ३८,००० भरेल. जेव्हां १८९५ त, १८९३ सालचे आंकडे प्रसिद्ध झाले तेव्हां लेफिंगवेलचें भविष्य बरोबर होतें असें प्रत्ययास आलें. मानवीवर्तनावर ताबा चालविणार्या कायद्यांच्या प्रमाणशीर सातत्यावर इतक्या निश्चितपणें अवलंबून राहातां येतें कीं, विकार व मूर्ख-पणामुळें घडणार्या गोष्टींचें भविष्य देखील अगोदर कित्येक वर्षें वर्तवितां येतें.
अ ध र्म सं त ती चें प्रमाण काढण्याची रीत :- आंकडेशास्त्र वापरतांना अधर्मसंततीच्या आंकडयांची तुलना दुसर्या कोणत्या आंकडयाशीं करून प्रमाण काढावें ? हें प्रमाण निरनिराळया अनेक पद्धतींनीं काढतात. देशाच्या एकंदर लोकसंख्येशीं जारजजननाचें जें प्रमाण ( Proportion ) पडतें तें किंवा एकंदर जननाशीं याचा येणारा संबंध, किंवा सर्वांत उत्तम म्हणजे, १५-४५ वर्षें वयाच्या अविवाहित बायकांच्या
संख्येशीं अधर्मजननाचा संबंध काढून अधर्मसंततीचें प्रमाण ठरवितात. खालील कोष्टकांत दोन काळांतींल (१८८०-८१; १९०१-४) निरनिराळया देशांचें लोकसंख्येच्या दर हजारीं-अधर्मसंततीचें प्रमाण दाखविलें आहे.
देश. | दोन वर्षें १८८०-८१ |
चार वर्षें १९०१-४ |
आस्ट्रिया | ६२ | ५७ |
सॅक्सनी | ६४ | ५२ |
बव्हेरिया | ५९ | ४८ |
स्वीडन | २९ | ३३ |
डेन्मार्क | ३६ | ३२ |
प्रशिया | ३३ | ३० |
इटली | ३५ | २५ |
फ्रान्स | २३ | २३ |
नॉर्वे | २५ | २२ |
बेलजम | २७ | २२ |
स्कॉटलंड | २८ | १७ |
न्यू झीलंड | १८ | १२ |
इंग्लंड व वेल्स | १९ | ११ |
आयर्लंड | ०६ | ०५ |
वरील दोन काळांतील आंकडयांची तुलना केल्यास, असें दिसून येतें कीं अधर्मसंतति हळू हळू कमी होत आहे. पण त्यावरून नीतिमत्ता वाढली असें म्हणतां यावयाचें नाहीं, कां कीं गर्भसंभव टाळण्याचें व गर्भनाश करण्याचें कौशल्य पुष्कळच वाढलें आहे. तथापि निरनिराळया राष्ट्रांमध्यें अधर्मांचरणांत जो फरक दृष्टीस पडतो त्याचें कारण काय असावें?
(१) धार्मिक श्रध्देमुळें, म्हणजे एखाद्या विशिष्ट संप्रदायाचा अंगीकार केल्यामुळें हा फरक पडणार नाहीं. प्रॉटेस्टंट पंथाची त्याच्या नीतिमत्तेबद्दल मोठीशी स्तुति करतां येईल असें नाहीं, कारण स्वीडन नॉर्वे, स्कॉटलंड व डेन्मार्क या देशांत पूर्ण कॅथॉलिक आयर्लंडपेक्षां अधर्मसंततीचें प्रमाण फार मोठें आहे. त्याच प्रमाणें, कॅथॉलिक पथांत नीतिमत्ता श्रेष्ठ आढळेल व ती या विकारदोषाला आळा घालील अशी अपेक्षा करणेंहि बरोबर होणार नाहीं; कारण इंग्लंड आणि स्काटलंड या प्रास्टेस्टंट देशांतल्यापेक्षां आस्ट्रिया, सॅक्सनी व बव्हेरिया या ठिकाणीं जारजोप्तत्तीचें प्रमाण जास्त आहे. दोन अगदीं निरनिराळ्या धर्मांचे देश एक ख्रिस्ती व दुसरा ख्रिस्तीतर तुलनेस घेतले असतांहि त्या तुलनेचा फायदा ख्रिस्ती देशांस मुळींच मिळत नाहीं. उदाहरणार्थ, बुद्धधर्मी जपान घ्या तेथें १९०२ सालीं एकंदर लोकसंख्येशीं अधर्मसंततीचें प्रमाण ३० होतें- म्हणजे पांच ( तीन कॅथॉलिक व दोन प्रॉटेस्टंट ) यूरोपांतील राष्ट्रांचें जारज जननाचें प्रमाण जपानांतल्यापेक्षां अधिक होतें. खुद्द इंग्लंडमध्यें, नॉरफोक आणि हियरफोर्ड परगण्यांत १८९९ ते १९०२ या चार वर्षांत जारजजननांची जी संख्या होती तितकीच जपानच्या उत्तर व मध्य प्रातांत होती हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.
(२) अधर्मसंततीच्या प्रमाणांतले फरक शिक्षणांतल्या फरकांमुळें होतात असें म्हणतां येणार नाहीं. जेथें केवळ अज्ञानाचें साम्राज्य आहे तेथल्यापेक्षां जेथें उच्च दर्जाचें प्राथमिक शिक्षण दिलें जातें अशा जिल्ह्यांतून किंवा परगण्यांतून जास्त सुस्थिति दिसून येत नाहीं. पॅरिस सोडून फ्रान्समध्यें, असें नजरेस आलें आहे कीं जेथें निरक्षरता सर्वसामान्य आहे अशा ठिकाणीं अधर्मसंततीचें प्रमाण अतिशय कमी असते.
(३) एकंदर जननसंख्येशीं असणारें अधर्मसंततीचें प्रमाण मोठाल्या शहरांतल्यापेक्षां इतर भागांतच बहुधा जास्त असतें. उदाहरणार्थ, इंग्लंडांतील तीन मोठया शहरांतील जारजजननाचें दहा हजारीं प्रमाण व कांहीं शहराबाहेरील जिल्ह्यांतील हें प्रमाण खालील प्रमाणें आहे.
शहर | १९०१ | १९०२ | १९०३ | १९०४ | १९०५ |
लंडन | ३७ | ३६ | ३६ | ३८ | ३८ |
बर्मिंगहॅम | ३३ | ४० | ३५ | ३९ | ४० |
मँचेस्टर | २७ | ३२ | ३२ | ३५ | ३० |
परगणें |
|||||
कंबर्लंड |
५८ | ५७ | ६१ | ५९ | ५६ |
नॉरफोक |
६४ | ६१ | ६४ | ६२ | ६५ |
नॉर्थ वेल्स |
५९ | ६० | ५६ | ५८ | ६० |
इंग्लंडाबाहेर हा नियम उलट दिसतो. पॅरिस, व्हिएन्ना, बर्लिन आणि इतर राजधानीच्या शहरीं त्या सभोंवतालच्या ग्राम्य जिल्ह्यांतल्यापेक्षां हें अधर्मसंततीचें प्रमाण जास्त असलेलें दिसतें. पॅरिसमध्यें याचें बहुतांशीं कारण तेथें अनेक कामकरी असून त्यांच्या मध्यें प्रचलीत असलेले स्त्रीपुरुषसंबंध सरकारनें किंवा धर्मपीठानें मान्य केलेले नाहींत हें होय.
(४) गरिबी किंवा नेहेमींची दुर्भिक्षता यामुळें अधर्मसंततीचें प्रमाण वाढतें असें नाहीं. नॉर्थ आयर्लंड अतिशय समृद्ध आहे; पण त्या ठिकाणीं दरवर्षीं जारजजननाचें प्रमाण, जेथें सामान्यत: नेहेमीं दुष्काळ असतो अशा आयर्लंडमधील दक्षिण व पश्चिम भागांतल्या पेक्षां अतिशयच जास्त असतें. लंडनमधील कांहीं भागांतील आंकडयांची तुलना फार बोधक होईल यांत शंका नाहीं. या शहरीं, उच्च वर्गाचे लोक '' वेस्टएंड '' भागांत व गरीब लोक '' ईस्टएंड '' भागांत राहातात. खालील कोष्टकांत दर हजारीं जननांत अनौरसतेचें प्रमाण दिलें आहे.
वरील कोष्टकावरून असें दिसून येईल कीं, लंडनसारख्या एखाद्या मोठया शहरांत, ज्या भागांत शहरांतील अतिशय गरीब लोक राहतात, ते भाग जननांच्या अनीतीनें अति कमी पछाडले गेले असतात. ही गोष्ट दरवर्षी दिसून येईल.
लंडन | १९०१ | १९०२ | १९०३ | १९०४ | १९०५ |
ईस्ट एंड : | |||||
स्टेपने | १२ | ११ | ९ | १० | १८ |
बेथ्नल ग्रीन | १३ | १२ | १५ | १४ | १३ |
माईलएंड | १५ | ११ | १३ | १६ | १६ |
(जुनें शहर) | |||||
व्हाईटचॅपेल | २२ | २० | २४ | २४ | १९ |
वेस्टएंड | |||||
सेंटजार्ज, हॅ- | |||||
नोवर स्क्वेअर | ४० | ५२ | ४५ | ४७ | ४५ |
केन्सिंगटन | ४८ | ४९ | ४४ | ४५ | ४९ |
फुलहॅम | ४३ | ४३ | ४२ | ४५ | ४५ |
सेंटमेरिलेबोन | १८२ | १८१ | १८६ | १८५ | १९८ |
राष्ट्रांत किंवा विशिष्ट भागांत अनौरसत्वाकडे होणार्या प्रवृत्तींत जो विशिष्ट फरक दिसून येतो, त्यांचीं खरीं कारणें कांहीं आनुवंशिक प्रभावांत सांपडतील. याचा अर्थ असा नव्हे कीं एखादें गूढ व अतर्क्य बल एका वर्गांतील लोकांना दुसर्या वर्गांतील लोकापेक्षां दुराचाराकडे किंवा अवास्तविक संबंधाकडे जास्त ओढून नेतें; तर त्याचा अर्थ इतकाच कीं, निरनिराळया राष्ट्रांत आणि समाजांत-दुराचाराकडे प्रवृत्ति सारखीच आहे असें धरून चालले तरी-निवारक बलें सर्वांना सारखींच जाणवत नाहींत. एक बलिष्ट दुष्कृत्यनिवारक गोष्ट म्हणजे लोकापवाद होय. ज्या ज्या समाजांत किंवा देशांत अधर्मजननाकडे नेहमीं चेंच आपल्या इष्ट मित्रांवर व शेजार्यापाजार्यांवर केव्हां तरी ओढवणारें एक स्वाभाविक संकट म्हणून कानाडोळा करण्यांत येतो त्या ठिकाणीं, जेथें असें जनन आईच्या तोंडाला काळोखी फांसते अशा प्रकारची समजूत असते
ठिकाणच्यापेक्षां अधर्मसंततीचें प्रातिवार्षिक प्रमाण खास जास्त दिसून येथें. लोकांच्या भावनेचा मानवी वर्तनावर अन्य गोष्टींत कसा परिणाम होतो हें आपण प्रत्यहीं पहातोंच. कॉर्सिका आणि सिसिली या देशांतल्याप्रमाणें ज्या ठिकाणीं खासगी सूडास चोरून क्षमा व संमति मिळते, तेथें कायद्याची मदत मागण्याऐवजी खून करण्यांत येतील; जेथें घटस्फोट गर्हणीय मानण्यांत येत नाहीं तेथें वारंवार घटस्फोट होतील. हें सूक्ष्म लोकमतबल मापणें, एका समाजांत दुसर्यांतल्यापेक्षां याचा कितपत प्रभाव पडतो हें ठरविणें, मानवी वर्तनावर पिढयानु-पिढया याच्या होणार्या परिणामांच्या अभ्यासानेंच फक्त शक्य आहे.
बहुतेक सर्व यूरोपांतल्या देशांतून अधर्मसंतति हळू हळू कमी होत चालली आहे हें मागें कोष्टक देऊन सिद्ध केलेंच आहे. इंग्लंड आणि वेल्समधील, १५ ते ४५ वर्षे यापर्यंतच्या अविवाहित बायकांच्या एकंदर संख्येशीं अधर्मजननाचें काय प्रमाण पडतें तें काढल्यास, ३५ वर्षांत (१८७०-१९०५ ) हें प्रमाण शेंकडा ५० नें उतरलें आहे असें दिसून येईल.
इंग्लंड आणि वेल्स. | |
वर्षे. | दर दहाहजारीं प्रमाण |
१८७०-७२ | १७० |
१८८०-८२ | १४१ |
१८९०-९२ | १०५ |
१९००-२ | ८५ |
१९०३ | ८४ |
१९०४ | ८४ |
१९०५ | ८२ |
अधर्मजनन कमी करण्यासंबंधीं फारच थोडें लिहितां येईल. ज्या कांहीं देशांतून लग्नसंबंधांतील सर्व अडथळे कायद्यानें दूर केलेले असतात, तेथें नि:संशय यावर बराच परिणाम घडलेला दिसतो; पण बहुतकरून अशा ठिकाणीं दु:खी जोडप्यांची संख्या वाढण्याकडे व घटस्फोटाकडे बरीच प्रवृत्ति होत राहील. सर्वच ठिकाणीं हल्लीं लोकापवादाची तीव्रता कमी होत चालली आहे; पण लोकापवाद जाज्वल्य झाला असतांहि बालहत्यांकडे अधिकाधिक प्रवृत्ति होते. एवढें मात्र खात्रीपूर्वक सांगतां येईल कीं, वैवाहिक जीविताची आणि कौटुंबिक सुखाची जिकडे तिकडे खरी प्रशंसा झाल्यास, ज्यापासून बव्हंशीं अधर्म जनन होतें ते क्षणिक व विधिविरुद्ध संबंध कमी होऊं लागतील.
हिंदुस्थानांत अधर्मसंततीचें प्रमाण मुळींच सांगतां येत नाहीं. जेथें विवाहांची नोंद नाहीं जननाचीहि सक्तीची नोंद नाहीं तेथें अधर्म संततीचे आंकडे कोठून मिळणार.
अ ध र्म सं त ती चें स म जां ती ल स्था न - रोमन लोकां मध्यें अधर्मसंततीचे दोन वर्ग पाडले होते. एक नोथी म्हणजे राखेचीं मुलें व दुसरा स्पुरी म्हणजे जी धर्मपत्नी नाहीं किंवा राख नाहीं अशा स्त्रीचीं मुलें व या दोन्ही वर्गांतील संतती आईची वारस असे, व नोथी संततीला बापाचा आश्रय मिळविण्याचा हक्क असे. पण त्याच्या संपत्तीवर मात्र वारस नसे. तथापि इतर बाबतींत या दोन वर्गांना नागरिकांचे बहुतेक हक्क असत. जर्मन कायदा याहून अगदीं भिन्न अशा तत्त्वावर तयार केला होता. त्यांत फक्त एकाच सामाजिक दर्जाच्या मातापितरांपासून झालेली संतति औरस समजण्यांत येई. इतरांना अधर्मजात किंवा अकरमासे समजण्यांत येई; व आई किंवा बाप-यांच्यापैकीं ज्याचा दर्जा खालचा असेल. त्या दर्जाचे ते बनत. जर्मन कायद्याचा हेतु बीजशुद्धि कायम ठेवण्याचा असे. पण समाजाची नीतिमत्ता सुधारण्याचा त्यानें
प्रयत्न केला नाहीं, कारण अगम्यगमन निंदास्पद समजण्यांस येत नसे. जुन्या सरंजामी सरदारीच्या काळांत जारज संततीसंबंधाचा हा कायदा कायम राहिला. अशा संततीला वारसाचा हक्क मिळत नव्हता. तेराव्या शतकांत रोमन कायद्याचा यावर परिणाम होऊन त्यांतील कडकपणा कांहींसा कमी झाला. ज्यांचे जनक राजघराण्यांतील असत अशांच्या बाबतींत हा जर्मन कायदा लागू केला जात नसे, अशी संतति काळीमा आणणारी म्हणून सुद्धां समजली जात नसे; व तिला वारसाचा हक्कहि मिळे. फ्रँक लोकांमध्यें क्लोव्हिसचा दासीपुत्र पहिला थिओडोरिक हा औरस मुलाबरोबर ज्याचा वांटेकरी झाला. इ. स. ८९५ मध्यें अर्नुल्फनें आपला राखीपुत्र इचेंटिबोल्ड यास लोरेनचा राजा केलें. विल्यम दि काँकररच्या ढालीवरील चिन्हांत अनौरसतेचा पट्टा होता; कारण तो नार्मडीच्या डयूकचा राखीपुत्र होता.
इंग्लिश कायद्यांत अजूनहि अधर्मसंततीत पुरे हक्क मिळाले नाहींत. तो जे मिळवील तेवढेच त्याचे हक्क. दिवाणी कायद्याच्या दृष्टीनें तो कशाचाहि वारस होऊं शकत नाहीं. कारण त्याला कोणाचा पुत्रच मानण्यांत येत नाहीं. पण नैतिक दृष्टया तो कुटुंबरहित किंवा संबंधरहित मानला जातो असें मात्र मुळींच नाहीं. उदाहरणार्थ, त्याला आपल्या आईशीं किंवा बहिणीशीं लग्न लावतां येत नाहीं. वंशपरंपरागत नसलें तरी दुसरें एकादें आडनांव त्याला धारण करितां येतें. व पार्लमेंटनें त्याच्या बाबतींत तसा ठराव केला तर तो औरस व वारसहि बनतो.
भिकार्यांच्या कायद्यांत सर्व औरससंततीचें राहण्याचें ठिकाण त्यांच्या जनकाच्या ठिकाणावरून ठरवितात. पण अनौरस संततीचें ठिकाण मात्र तिच्या आईचें जें ठिकाण असेल तेंच धरतात. अनौरस मुलाच्या आईनें त्याचा प्रतिपाळ करावा असा कायदा असल्यानें त्याला पोसण्याची जबाबदारी तिच्यावर पडते. पण या जबाबदारींत बापाचा कांहीं हिस्सा असावा हें तत्त्व पूर्वीपासून इंग्लिश कायद्यानें मान्य केलें आहे. याचें कारण आईला कांहीं मुलाच्या पोटाकरितां इलाज करतां यावा किंवा बापाला कांहीं थोडी शिक्षा असावी म्हणून नसून केवळ स्थानिक धर्मखात्यावर त्याला पोसण्याचा बोजा पडूं नये म्हणून हें तत्त्व कायद्यानें मान्य केलें आहे. इ. स. १५७६ चा कायदा जो इंग्लिश अधर्मसंततीच्या कायद्याला आधारभूत मानला जातो, त्यानें न्यायाधिशांना धर्मखात्याच्या ताब्यांत असलेल्या जारज मुलाच्या आईबापांना शिक्षा लावण्याचा व त्यांच्यापासून मुलाचा एक आठवडयाचा खर्च वसूल करण्याचा अधिकार दिला आहे. पुढें स. १६०९ आणि स. १७३३ सालीं पास झालेल्या कायद्यान्वयें धर्मखात्यावर पडलेल्या किंवा पोषणाची जबाबदारी पडण्याचा संभव असलेल्या कोणाहि मुलाच्या आईनें त्याच्या बापाला धरून द्यावयाचें असे. व तो मुलाचा खर्च धर्मखात्याला देईपर्यंत त्याला अडकवून ठेवण्यांत येईं. इ. स. १८०९ व १८१० सालच्या कायद्यान्वयें हीं बंधनें फार दृढ करण्यांत आलीं. स. १८३२ सालीं भिकार्यांविषयींच्या कायद्याची अम्मलबजावणी कशी काय होते याची चौकशी करण्याकरितां एक कमिशन नेमण्यांत आलें. त्यानें आपल्या रिपोर्टांत अधर्मसंततीवर बराच भर दिला, व १५७६ पासूनच्या कायद्यांची विचारणा करून असें ठरविलें कीं अधर्मसंततीस संमति देणारा कायदा अतिशय अदूरदर्शी दिसतो; कारण त्यामुळें पुष्कळशा दुराचरणाला जागा मिळाली. उदाहरणार्थ, स्थानिक धर्मखात्यानें वसूल केलेली आठवडयाची पोटगी बहुधा आईला देण्यांत येई. पुष्कळ वेळांतर आईला ती मिळण्याविषयीं जिम्मा घेतला जाई. तेव्हां कमीशनर्सनीं असें सुचविलें कीं मुलाच्या पोषणाची जबाबदारी केवळ आईवर पडली पाहिजे; विधवेवर हीच जबाबदारी असते; तेव्हां व्यभिचाराला आपण अशी सवलत ठेवली तर आपत्तीपेक्षां दुराचरणाला जास्त महत्व दिल्यासारखें होईल. इ. स. १८३४ च्या भिकार्यांविषयींच्या कायद्यांत दुरुस्ती होऊन मानलेल्या बापानें बालसंगोपनाचा खर्च देण्याचें तत्व अमलांत न आणण्याचा प्रयत्न झाला. पण जनता हें तत्त्व झुगारण्यास तयार नसल्यामुळें स. १८४४ सालीं अधर्मसंततीच्या कायद्याची चौकशी करण्याकरितां एक कमिशन बसून मानलेल्या बापाकडून पोषणाचा खर्च घेण्याची तजवीज असावी असा त्याचा अभिप्राय पडला व त्याप्रमाणें स. १८४५ सालीं अधर्मसंततीचा कायदा पास होऊन मुलाच्या बापावर स्वतंत्र दिवाणी दावा आणण्याचा आईला अधिकार मिळाला व त्या संबंधांत धर्म-खात्यानें अगदीं पडूं नये असें ठरलें. पुढें कायद्यानें धर्मखात्याला मुलाच्या पोषणार्थ पैसा वसूल करण्याचा अधिकार दिला.
हल्लीं अधर्मसंततीला जे अधिकार नाहींत त्यांतील मुख्य हा कीं त्याला कोणाचाहि वारस होतां येत नाहीं. कारण तो कोणाचा संबंधी नसतो. कोणत्याहि पूर्वजाचें बीज त्याच्या ठिकाणीं धरतां येत नाहीं; तेव्हां अशा अधर्मसंतति खेरीज जर एखाद्या मालमत्तेला दुसरा कोणी वारस नसेल तर ती जिंदगीं ज्याच्या हद्दींत असेल त्याच्याकडे जाते. ज्याप्रमाणे हा माणूस कोणाचा वारस नसतो त्याप्रमाणें त्यालाहि त्याच्या पोटच्या मुलाखेरीज दुसरे कोणी वारस नसतात. तेव्हां जर अशा मनुष्यानें एखादी जमीन खेरदी केली व तो संतति किंवा मृत्युपत्रावांचून वारला तर ती जमीन त्याच्या इनामदाराकडे जाते. पूर्वी अधर्मसंततीस उपाध्येगिरी किंवा कोणतेंहि धार्मिक काम मिळत नसे. पण हल्लीं तो व साधारण मनुष्य यांच्यांत भेदभाव ठेवला नाहीं. स्कॉटलंडमध्येंहि अधर्मसंततीसंबंधी अशाच तर्हेचा कायदा आहे. पूर्वी त्या ठिकाणीं अशा माणसाला संतति नसेल तर मृत्यूपत्रहि करितां येत नसे. पण स. १८३५ च्या कायद्यानें ही सवलत दिली. इंग्लंडमधील देशाचारांवरून आंखलेल्या रूढ कायद्यान्वयें पार्लमेंटनें आपला अधिकार गाजवून ठराव केल्याखेरीज व्यक्तीची अधर्मसंततीच्या स्थितींतून सुटका होत नाहीं. पण ज्या देशाचे कायदे रोमन कायद्याला अनुसरून तयार केले आहेत त्या ठिकाणीं त्याचा हा दर्जा कायम नसून त्याच्या आईबापांनीं
विवाह केल्यानंतर त्याची अनौरसता संपते.
अ ध र्म सं त ती चें भा र ती य स मा जां त स्था न. - हिंदु समाज हा जातिबद्ध असल्यामुळें अधर्मसंततीस कोणत्याहि जातींत स्थान मिळत नाहीं. अशी प्रजा निराळी रहाते. व त्यांस निराळी जात बनवावी लागते. अशी परिस्थिती असल्यामुळें कांहीं लहान लहान अनिश्चितपद जाती अधर्मसंततीमुळें उत्पन्न झाल्या असणें शक्य आहे. त्या कोणत्या हें आज सांगणें शक्य नाहीं. कायस्थांच्या विरुद्ध या तर्हेचें विधान याज्ञवल्क्य, कल्हण इत्यादि ग्रंथकारांनी केलें आहे परंतु त्यावर विश्वास टाकतां येत नाहीं. कांकीं धर्मशास्त्र ग्रंथात ज्या अनेक जातींचा संकरजाति म्हणून उल्लेख आहे त्यांत मागध, सैरेध्र, चांडाल यांसारख्या राष्ट्रस्वरूपी जातींचा उल्लेख आहे. आपल्याकडे गोवर्धन ब्राह्मणांस गोलक म्हणून '' अमृते जारज:कुड: मृते भर्तरि गोलक: '' या मनुस्मृतिवाक्यान्वयें त्यांस इतर ब्राह्मण पंक्तिबाह्य धरीत पण गोवर्धन ब्राह्मण ही प्रादेशिक जात असावी, व त्यांची जोशीपणाची वृत्ति निदान रामदेवराव जाधवाच्या काळाइतकी जुनी असावी असें दिसतें. ब्राह्मण पुरुष व ब्राह्मण स्त्री यांची अधर्मसंतति ब्राह्मणांतच गफलतीनें मिसळून गेल्याचीं उदाहरणें प्रस्तुत लेखकाच्या अवलोकनांत आहेत. एकत्र रहाणार्या पण विवाहबद्ध नसलेल्या सजातीय स्त्रीपुरुषापासून झालेली संतसि धडपड करून अडचणींत सांपडलेलीं वधूवरें पाहून आपल्या आईबापांच्याच जातींत प्रवेश करते. जेव्हां वरच्या जातींतील विधवा स्त्रिया पुरुषाबरोबर रहात नसतील व त्यांस मुलें झालीं असतील तेव्हां त्या आपल्या मुलांची कशी तरी वाट लावतात. त्या मुलांस मारुन टाकतात, किंवा पंढरपूर सारख्या ठिकाणीं ठेवून देतात किंवा ख्रिस्ती मिशनर्यांस किंवा गोसाव्यांस आपलीं मुलें देऊन टाकतात. पूर्वी जैनांतील बरेच साधु अशा ब्राह्मण विधवांपासून झाले असें एक हेमचंद्राचा चरित्रकार म्हणतो. ब्राह्मण, प्रभु यांसारख्या उच्चवर्गांतील विधवा किंवा कुमारी आपल्या अधर्मसंततीस उघडपणें बाळगून आहे असें एकहि उदाहरण आमच्या पहाण्यांत नाहीं. जेव्हां पुरुष व स्त्री भिन्न जातीय असून अधर्म व्यवहारानें एकत्र रहात असतील तेव्हां त्यांस जी मुलें होतात तीं रक्षिलीं जातात. अशी मंडळी विदुर जात फुगवितात, पण त्यांसहि हल्लीं बराच प्रतिबंध झाला आहे. ब्राह्मण पुरुष आणि ब्राम्हणेतर स्त्री अशापासून जी संतति आहे तिनें इतरांपासून वियुक्तता स्थापन केली आहे, म्हणजे आपली स्वतंत्र जात बनविली आहे. आणि ते स्वत:हि पाराशर ब्राह्मण म्हणवून घेऊं लागले आहेत. मराठयांमध्यें प्रथम अधर्मसंततीस दूर ठेवण्यांत येतें व त्यांचा समावेश कुलीनांत होत नाहीं. पण कालांतरानें तसलीं कुटुंबे सुशिक्षित व संपन्न झालीं म्हणजे त्यांच्याशी चांगल्या कुळांतील लोकहि लग्नव्यवहार करूं लागतात. म्हणजे मराठे जातींतच अधर्मसंततीला थोडें बहुत औदार्य दाखविलें जातें, असें म्हणतां येईल. मुंबईतील कांहीं अकरमासे
मराठयांच्या सामान्य जनतेपेक्षां अधिक चांगल्या स्थितींत शैक्षणिक व सांपत्तिक दृष्टया आहेत. ते मराठयांत मिसळून जाण्यास फारसे तयार नाहींत. ते आपली निराळी जात करूं पहात आहेत. अशांपैकीं पुष्कळ मंडळी आपणांस ब्रम्हो म्हणवितात. अशांच्या लग्नांची व्यवस्था त्या मंडळींतच होते. ब्राह्मणादि चांगल्या जातींतहि अशांची लग्नें झाल्याचीं उदाहरणें आहेत. अधर्मसंततीस ज्या अडचणी आहेत त्या सामाजिक आहेत. कायद्याच्या त्यांस अडचणी नाहींत. एका बाबतींत तर त्यांची स्थिति कायद्यानें इष्ट प्रकारची आहे. एखादी हिंदु स्त्री यूरोपियन बरोबर लग्न करती झाली तर त्या स्त्रीच्या संततीस हिंदु समजण्यांत येणार नाहीं. पण तिचा यूरोपियन बरोबर अधर्म संबंध असला तर मात्र तिच्या संततीस हिंदु समजण्यांत येतें. मुंबईतील अकरमाशांत असा वर्ग आहे. तसेंच मलयाळी लोकांपैकीं तिय्या जातींत असा वर्ग आहेच. आश्चर्याची गोष्ट एवढीच कीं थर्स्टनवर विश्वास ठेवल्यास तो वर्ग तिय्या जातीच्या बाहेर समजण्यांत येत नाहीं.