विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अंतरंग परिचय

लेखांचे वर्गीकरण
- शरीरखंडातील अनेक विषयांपैकीं सुमारें पांचशें विषय या विभागांत प्रसिद्ध होत आहेत. त्यांचें शास्त्रवार वर्गीकरण केल्यास असें दिसून येईल कीं, हा भाग बर्‍याच शास्त्रांचें व अनेक भागांचें आणि त्यांच्या सांस्कृतिक व राजकीय इतिहासाचें विवेचन करणारा आहे.

प्रथमत: हिंदुस्थानांचा इतिहास विचारांत घेतां असें दिसून येईल की त्याचा बराचसा भाग या विभागांत आला आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाचे भाग म्हणजे वैदिक संस्कृति, सूतसंस्कृति, बौद्धजैनप्रामुख्य काल, प्राचीन ऐतिहासिक काल, म्हणजे. शैशुनागांपासून मुसुलमानी स्वारीपर्यंतचा काल, मुसुलमानी अमदानी, मराठ्यांचे वर्चस्व, असे अनेक काल पडतील. यापैकीं बहुतेक कालांवर विभागांत लेख आहेत.

यांतील वैदिक संस्कृतिकालाविषयीं पाहातां, वैदिक वाङ्‌मयांपैकी अथर्ववेदावरील लेख एकदम नजरेपुढें येईल. वैदिकधर्माविषयीचे म्हणजे, प्राचीन श्रौतस्मार्तधर्मावरील, लेख म्हणजे अग्निष्टोम, अघमर्षण अत्यग्निष्टोम हे होत. हे सर्व लेख “वेदविद्या” विभागाचे पूरक म्हणतां येतील.

सूतसंस्कृतिविषयक माहिती द्यावयाची म्हणजे पुराणें हें साहित्य समजून त्याचा अभ्यास द्यावयाचा. पौराणिक विषयाच्या अभ्यासासाठी अग्निपुराण या संग्रहात्मक ग्रंथावरील मोठा व पृथक्करणात्मक लेख या भागांत आलाच आहे, आणि पौराणिक व्यक्तींपैकीं अनेक  व्यक्ती आल्या आहेत. यांपैकीं मंत्रसंस्कृतीच्या पूर्वीच्या कोणत्या व नंतरच्या कोणच्या हें विवेचन यांत प्रत्येक प्रसंगी केलेलें नाहीं. कुरुयुद्धकालीन आणि त्यापूर्वीच्या व्यक्ति कोणत्या, आणि निव्वळ काल्पनिक कोणत्या, हें चरित्रस्वरुपावरुन उघड होत असल्यामुळें तद्विषयक विवेचनहि दिलेलें नाहीं.  अक्रूर, अघासुर, अनिरूद्ध या कृष्णचरित्राची आठवण देणार्‍या व्यक्ती, अत्रि, अनसूया, अगस्त्य, अरुंधती हे ऋषि व ऋषीपत्‍नी, देवजननी अदिती, व महाभारतांतील प्रसिद्ध वीर अर्जुन व त्याचा पुत्र अभिमन्यु यांची माहिती या विभागांत मिळेल. ज्या किरकोळ पौराणिक व्यक्तींनां यांत स्थान मिळालें आहे, त्या- अकंपन, अकृतव्रण, अग्निमित्र, अग्निवेश्य, अघमर्षण, अचल,  अज, अजामिळ, अजीगर्त, आणिमांडव्य, अतिकाय, अद्रिका, अधिरथ, अनरण्य, अनळ, अनु, अनुमति, अनुविंद, अनुशाल्व, अमर्षण, अमावसू, अरणीसुत व अरुण, या होत. आपल्याकडील “अप्सरां”  विषयी विवेचन करतांना इतरत्र आढळणार्‍या तत्सदृश कल्पनाहि मांडल्या आहेत.

बौद्धजैनप्रामुख्यकाल हा राजकीय इतिहासांतील नसून सांस्कृतीक इतिहासांतील काल आहे. यांचे विवेचन द्यावयाचें म्हणजे मुख्यत्वेंकरुन ग्रंथकार आणि विचारसंप्रदाय आणि त्यांच्या शाखा व उपशाखा हीं द्यावयाचीं असें असल्यामुळें या कालाविषयींचे लेख पुढें वाङ्‌मयात्मक लेखांचे वर्गिकरण करतांनां बौद्ध जैन ग्रंथकार देऊन व्यक्त केले आहेत.

बुद्धकालीन अजातशत्रु हा शैशुनाग घराण्यांतील मगधराजा यांत दिसेल. प्राचीन हिंदु घराण्यांपैकीं चालुक्य वंशातील अक्कादेवी व अजयपाल यांची चरित्रे, कलिंग देशाचा अनंगभीम, पंजाबांतील मुसुलमानांच्या स्वारीस प्रथमच तोंड देणारा प्रसिद्ध अनंगपाल, यांच्या आणि कोंकणच्या इतिहासांतील पहिला व दुसरा अपरादित्य यांच्या कारकीर्दीं यांत आलेल्या आहेत. राष्ट्रकूट घराण्याशीं परिचय राजा अमोघवर्ष याचें चरित्र करुन देईल. दक्षिणेकडील पांड्यचेरचोलांविषयी या विभागांत कांही स्थानविषयक लेखांतील तुरळक उल्लेखांशिवाय दुसरें कांहीं आलें नाहीं.

रजपूत राजांपैकीं कांही राजे या विभागांत चरित्राचे विषय झालेले आहेत ते अजयसिंग, अनंगपाल, अभयसिंह, अमरसिंह व अरसीसिंह हें होत. स्वातंत्र्यप्रिय रजपुतांचे मुसुलमानांशीं झालेले झगडे त्यांच्या चरित्रांवरुन ज्ञात होतात.

सूर्य, चंद्र, यदु, नाग व अग्नि या क्षत्रिय वंशांपैकी अग्निकुळाच्या उत्पत्तीसंबंधाचा वादविवाद अग्निकुल या लेखांत पहावयास मिळेल.

मुसुलमानी इतिहासाकडे दृष्टि फेंकल्यास, मोगल घराण्यांपूर्वीचा इतिहास यांत आलेला नाहीं असें दिसेल. मोगल घराण्यांतील महापराक्रमी बादशहा अकबर, व त्याचे सहकारी अबुल फजल व फैजी, त्याचा एक मुख्य प्रधान अबदुल रहिमखान, तसेंच जिचें अकबराशीं नाते काय होतें हें निश्चित झालें नाही पण जिवा शेवट वाईट झाला अशी सुदंरी अनार्कली, जहांगिराविरुद्ध खुश्रूला सहाय्य करणारा सरदार अबदुल रहिमखान या सर्वांस या विभगांत स्थान मिळालें आहे. या घराण्याच्या उत्तरकालीन इतिहासांत चमकलेल्या पुरुषांपैकी सय्यद बंधूंचा बाप अबदल्लाखान याचें चरित्र आलेलें आहे. या राज्याचीं जीं शकलें पुढे पडली त्यांच्या इतिहासापैकीं अयोध्येचा सरदार अबुतालिब खान, आणि कर्नाटकचा नबाब अनवरुद्दिनखान हे या विभागांत विषयीभूत झालेले दिसतील. बहामनी राज्याचा इतिहास यांत दृष्ट नाहीं. तथापि आदिलशाहीचा सरदार शिवशत्रु अफजलखान यांत आला आहे, व कुतुबशाहीचे म्हणजे गोंवळकोंडा राज्याचे अबदुल्ला कुतुबशहा, अबुहसन कुतुबशहा आणि शिवकालीन दिवाण अक्कण्णा यांची चरित्रें यांत आहेत. टोंक संस्थानाचा संस्थापक अमीरखान पठाण याचेंहि चरित्र यांत आहे.

मराठ्यांच्या इतिहासाची वांटणी - ज्ञानकोशांत मराठ्यांच्या इतिहासासंबंधी माहिती पहावयाची झाली तर महाराष्ट्र किंवा मराठेशाही असा एखादा लेख काढून पाहिला म्हणजे झालें असें नाहीं. ज्ञानकोशांत मराठ्यांचा इतिहास एका लेखांत एकत्र पहावयास मिळेल हें खरें; तथापि मराठ्यांच्या इतिहासासंबंधी  ज्ञानकोशांत भरपूर व सर्वांगी माहिती आली आहे व ती अनेक ठिकाणीं पहावी लागेल. एकंदर मराठ्यांच्या इतिहासाची वांटणी जवळ जवळ सर्व ज्ञानकोशभर सारखी झाली आहे. या विस्ताराची कांही अंशी कल्पना एका सहाव्या विभागांत विखुरलेल्या माहितीचें पर्यालोचन केलें तरी येण्यासारखी आहे. 

प्रथमतः हें उघड आहे कीं, शिदें, होळकर, गायकवाड वगैरे मराठे सरदारांची जीं लहानमोठी संस्थानें आज अस्तित्वांत आहेत त्यांच्या इतिहासाबद्दलची जिज्ञासा मराठ्यांच्या सामान्य इतिहासांत त्यांचे जे प्रसंगोपात्त उल्लेख येतील ते कितीहि विस्तृत असले तरी त्यांयोगे तृप्‍त होणें शक्य नाहीं म्हणून त्या संस्थानांवर लेख येतील. (गायकवाड, धार वगैरे पहा). अशा संस्थानांपैकी एका अक्कलकोट संस्थानचा इतिहास या विभागांत आला आहे.

याशिवाय मराठ्यांच्या इतिहासाला अंगभूत होऊन बसलेला जवळ जवळ तितक्याच महत्त्वाचा परंतु त्याहून कित्येक पटींने मोठा असा दुसरा वर्ग म्हटला म्हणजे महाराष्ट्रीय ऐतिहासीक पुरुषांचा होय. या वर्गापैकीं अण्णाजी दत्तो, अनूबाई घोरपडे, अमृतराव, अय्याशास्त्री, अक्कण्णा इतक्या व्यक्ती या विभागात आलेल्या आहेत. त्यांतील अनुबाई  सारख्या व्यक्तींनीं स्वत:स आपल्या संस्थानाशीं इतकें एकजीव करुन घेतलेलें दिसतें कीं, त्यांचे चरित्र म्हणजे कांही काळापुरता त्यांच्या संस्थानाच इतिहासच होतो. तथापि त्यांच्या संबंधी बरीच माहिती व त्यांचे बरेच व्यवहार असे असतात कीं, ते त्याच्या संस्थानाच्या इतिहासांत घातले असतां विषयांतरासारखे भासतात; परंतु त्यांच्या शिवाय त्या व्यक्तींच्या स्वभावाचा नीट परिचय वाचकांस होऊं शकत नाहीं, इतकेंच नाहीं तर ते त्यांच्या संस्थानांच्या इतिहासावरहि बोधप्रद प्रकाश पाडतात. यामुळें ते वैयक्तिक वृत्तांतहि महत्त्वाचे आहेत.