विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अकबर - (१५५६-१६०५) बालपण.- मोंगल घराण्यांतील तिसरा बादशाहा.  याचें संपूर्ण नांव जलालुद्दीन महंमद अकबर. हुमायून वनवासांत असतां ता. १५ आक्टोबर सन १५४२ रोजीं उमरकोट येथें अकबराचा जन्म झाला. हा चौदा महिन्यांचा असतांना याची आईबापांपासून ताटातूट होऊन तो आपल्या चुलत्याच्या ताब्यांत गेला.  पुढे दोन वर्षांनी तो आईबापांस भेटला. लहानपणीं त्याच्यावर अनेक संकटें आलीं; त्यास अनेक वेळां कडक कैदहि भोगावी लागली.  जीवावरचे प्रसंग त्याच्यावर कित्येक आले; परंतु त्या सर्व संकटांतून त्याचा बचाव झाला.  या संकटांमुळें लहानपणीं त्याचा विद्याभ्यास मुळींच झाला नाहीं. हुमायुनानें त्याच्यासाठी एक शिक्षक ठेविला होता, परंतु त्याचा कांहीएक उपयोग झाला नाहीं.  हुमायुन प्रेमळ होता, परंतु तो चलचित्त असल्यामुळे त्यानें आपल्या मुलाची फारशी काळजी घेतली नाहीं.  धामधुमीच्या वेळीं प्रत्यक्ष अनुभवाने मिळणारें शिक्षण मात्र अकबरास बरेंच मिळालें.  त्याची बुद्धि चलाख असल्यामुळें, अशा शिक्षणाचा त्यास चांगला उपयोग झाला.  बहरामखान हा एकनिष्ठ व शूर असल्यामुळें हुमायूनानें अकबरास त्याच्या स्वाधीन केलें होतें.  त्यानें अकबराचें उत्तम प्रकारें पालन केलें.  हुमायूनच्या मरणसमयीं अकबराचे वय अवघें तेरा वर्षे तीन महिने इतकें होतें.  यामुळें राज्याचा सर्व कारभार बहरामखान पाहू लागलां.  त्यावेळीं दिल्ली व आग्रा या शहरांपलीकडे अकबराकडे फारसा मुलूख नव्हता; परंतु पुढील ५० वर्षांत अकबरानें उत्तर हिंदुस्थानाचा बहुतेक सर्व भाग आपल्या अंमलाखालीं आणिला व त्यामुळें व त्याच्या चांगल्या राजव्यवस्थेमुळें त्याची जगांतील महान् राज्यकर्त्यांमध्यें गणना करण्यांत येते.

रा ज्य प्रा प्‍ती स्त व यु द्ध - अवघ्या चौदा वर्षांच्या वयांत अकबरास अनेक संकटांस तोंड द्यावें लागलें.  पंजाबांत सिकंदरशहा सूर, पूर्वेकडील प्रांतांत महंमदशहा आदिली व हिमू, मध्यहिंदुस्थानांत व राजपुतान्यांत हिंदू राजे, जुने पठाण सरदार, व अफगाणिस्तानांतील अंमलदार हे सर्व अकबराचे शत्रू असून ते त्याच्याशीं लढाई करण्याच्या तयारींत होते.  बहरामखानाच्या हातीं जरी सर्व राज्यकारभार होता, तरी सर्व गोष्टीत मन घालून अकबर स्वतः मेहनत करीत असे.  प्रथमतः त्याने त्याच्या बापानें त्याच्याकडे सोंपविलेलें सिकंदरशहाचा मोड करण्याचें काम हाती घेतलें.  सिकंदरशहा हा हळू हळू काश्मीरच्या रोखें मागें हटत होता.  अकबराच्या सैन्यानें त्याचा पाठलाग करुन त्यास शिवालिक पर्वतांतील माणकोटच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावयास लाविलें.

याप्रमाणे अकबर पंजाबांत गुंतला असतां इकडे हिमू हा दिल्लीवर चालून आला.  अकबराचा सरदार अलीं कुली खान इ. शैबानी ( यासच पुढें अकबराने खानजमान ही पदवी दिली ) याचा हिमूनें पराभव करुन आग्रा शहर घेतलें; व दिल्लीनजीक पुन्हा मोंगल सरदार तार्दीबेग याशीं लढाई देऊन त्यास हांकून लाविलें.  हा मोठा आणीबाणीचा प्रसंग होता.  यावेळी हिमूशीं युद्ध न करतां काबूलकडे जाऊन तें प्रथम हस्तगत करावें व तेथें सैन्याची चांगली जमवाजमव करुन मग हिमूशीं युद्ध करावें असा अनेक सरदारांचा सल्ला पडला; परंतु आपण हिमूशीं एकदम लढाई केली पाहिजे, त्यास प्रबळ होऊं देतां कामां नये ही बहरामची मसलत अकबरास पसंत पडून त्यानें त्याच्यावर चालून जाण्याचा निश्चय केला.  ५ नोव्हेंबर सन १५५६ रोजीं पानिपतच्या रणमैदानांत मोठी लढाई होऊन हिमू तीर लागून पडला.  तेव्हां त्याच्या लोकांची आपला धनी मेला अशी समजूत होऊन तारांबळ उडाली व त्यामुळें अकबरास जय मिळून हिमू त्याच्या हातीं सापडला.  अकबराच्या मनांत हिमूस ठार करावयाचें नव्हतें.  पण बहरामखानानें त्याचें न ऐकतां हिमूचा स्वहस्तानें शिरच्छेद केला.

ब ह रा म खा ना चें पालकत्व - यानंतर अकबरानें आग्र्यावर चाल करुन तें शहर हस्तगत केलें.  पुढें १५५७ च्या मार्चमध्यें, पंजाबांत सिकंदरशहानें पुन्हां उचल केल्याची बातमी त्याला समजली.  तेव्हां तो पंजाबांत गेला व माणकोटास सहा महिने वेढा घालून बसून त्यानें सिकंदरशहास शरण यावयास लाविलें.  पुढील दोन वर्षे (म्हणजे इ.स. १५५८ व १५५९) बहिरामखानानेंच अकबराचा पालक म्हणून राज्यकारभार चालविला होता.  पण अकबर व बहरामखान यांस एकत्र काम करण्याचा प्रसंग आल्यावर त्यांचा मतभेद होऊं लागला.  अकबर आपल्यावरची जबाबदारी कधींहि टाळीत नसें.  उत्तम काम करणार्‍यांस बक्षिसें वगैरे देण्यास तो नेहमीं तत्पर असे; परंतु बहराम हा निष्ठुर, एककल्ली व खुनशी होता.  अधिकार वापरण्याच्या कामांत तो न्यायान्याय पहात नसें. त्यानें अनेक लोकांची मनें दुखविलीं होतीं.  यामुळें कित्येक लोकांनीं बहरामाविरुद्ध तक्रारी केल्या.  राज्यसत्ता आपल्या हातीं असावी असें अकबरासहि वाटूं लागलें होतें.  त्यानें एके दिवशीं मोठ्या युक्तीनें बहरामास असें कळविलें कीं, ''आपलें राज्य आपण स्वतः चालवावें असें आम्ही योजिलें आहे,  तरी आमचें कल्याण व्हावें या इच्छेनें तुम्ही सर्व कारभार सोडून द्यावा; तुमच्या खर्चाचा बंदोबस्त नीट ठेविला जाईल.'' हें पाहून बहरामनें बंड केलें, परंतु अकबरानें त्याचा पराभव करुन त्यास सन्मानपूर्वक दरबारी आणिलें ( दिसेंबर १५६० ).  बहरामने बादशहाची माफी मागितली.  अकबर त्याची योग्यता व उपकार जाणून होता.  त्यानें त्यास दरबारचे काम करीत जा असें सांगितलें.  परंतु बहरामनें मक्केस जाण्याची परवानगी मागितली.  तिकडे जात असतां वाटेंत एका पठाणानें त्यास ठार मारिलें. (जानेवारी १५६१).  बहरामच्या मागून त्याच्या बायका मुलांची बादशहानें उत्तम बरदास्त ठेविली.  त्याचा मुलगा मिर्झाखान यास अकबरानें मोठें काम देऊन त्यास खानखानान ही पदवी दिली.  बहरामखानाचें शौर्य व आपत्कालचें धैर्य या गुणांचें अकबरास वारंवार स्मरण होत असे.  बहरामखानासारखा पुरुष हुमायुनास मिळाला म्हणूनच तो विपत्तींतून पार पडून अकबरास पुढें सुदीन प्राप्‍त झाले.  

अ क ब रा चे वि ज य -  इ.स.१५६१ सालीं अकबरानें जेव्हां बहिरामखानापासून राज्यकारभार आपल्या हातीं घेतला तेव्हां त्याजकडे पंजाब, वायव्येकडील प्रांत, ग्वालेर व अजमीर एवढा पश्चिमेकडील व लखनौ, व अलाहाबादसुद्धां जानपूरपर्यंत बाकीचा अयोध्या प्रांत एवढा पूर्वेकडील मुलूख होता.  बनारस, चुनार आणि बंगाल व बहार हे प्रांत अद्याप सूर घराण्याच्या पुरुषांकडे किंवा अफगाण सरदारांकडेच होते. इ.स.१५६० पासून १५६७ पर्यंत अकबराचा काळ मुख्यत्वेंकरुन बंडें मोडण्यांतच खर्च झाला.  या सर्व प्रसंगीं कोणतेंहि काम त्वरेनें करण्याची हातोटी व शत्रूसहि क्षमा करण्याचें औदार्य हे त्याचे गुण व्यक्त झाले.  राज्यारोहणापासून सहाव्या वर्षी व स्वतःच्या कारकीर्दीच्या पहिल्या वर्षी अकबरानें माळवा काबीज केला. १५६२ मध्यें जोधपूरच्या ईशान्येस ७६ मैलांवर असलेलें मेढतें नांवाचें महत्त्वाचे शहर अकबराच्या हाती लागलें. त्याच वर्षी अकबराच्या माळव्यांतील सेनापतींनीं पश्चिमेकडे स्वारी करुन विजागड व बर्‍हाणपूर हीं काबीज केलीं.  यानंतर त्यानें रावळपिंडी जिल्ह्याच्या ईशान्य भागांत राहणार्‍या गखर लोकांचें व काबूलमध्ये उद्‍भवलेलें अशीं दोन बंडे मोडलीं.  याच सुमारास एक खेदजनक गोष्ट घडून आली ती अशी.  अकबराची दाई महाम अनागा हिचा पुत्र आदमखान यास माळवा प्रांतांत बाझ बहादूर नामक सरदारानें केलेले बंड मोडण्याकरिता अकबरानें पाठविले.  आदमखानानें बाझ बहादूरचा पराभव केला; परंतु त्यांने स्वतः अनेक दुष्कृत्यें केलीं.  त्यानें सर्व लूट आपण स्वतः ठेवून घेऊन बाझ बहादूरचा जनानखानाहि आपल्या जवळ ठेविला.  हें समजतांच अकबरानें त्याला कामावरुन काढून टाकिलें. पुढें आदमखानानें बादशहाचा वजीर शमसुद्दीन यास आपला नाश करुं पहात आहे अशा समजुतीनें ठार मारिलें. हें ऐकून अकबरानें आदमखानास गच्चीवरुन खालीं लोटून देऊन त्याचा प्राण घेतला. ( मे १५६२ ).

१५६४ मध्यें पूर्वेकडील प्रांताचें प्रवेशद्वार म्हणून समजला जाणारा चुन्नारचा किल्ला आदील घराण्याच्या एका गुलामाकडें होता तो त्यानें अकबराच्या स्वाधीन केला.  चुन्नार हातीं आल्यामुळें नरसिंगपुर जिल्हा व हुशंगाबादचा कांही भाग चौरागड येथें राज्य करीत असलेल्या राणीचा पराभव करुन मोंगलास सहज घेतां आला.  १५६५ च्या उन्हाळ्यांत अकबरानें आग्र्याचा किल्ला बांधण्यास सुरवात केली व ३५ लक्ष रुपये खर्च करुन आठ वर्षांत तो पुरा केला.  याच वर्षाच्या पावसाळयांत जानपूरमध्यें उद्‍भवलेले उझबेक सरदारांचें बंड अकबराने मोडून त्या लोकांस आपलेंसे केलें.  या मोहिमींत असतांना बादशहाच्या सेनापतींनीं बहारांतील रोटासचा किल्ला काबीज केला व ओरिसाच्या राजाकडून वकील येऊन त्यांनीं बादशहास नजराणे अर्पण केले.  अकबराची पुढील दोन वर्षेहि बंडें मोडून राज्यांत स्वस्थता करण्यांतच खर्च झालीं.

इ.स.१५६८ त अकबरानें राजपुतान्यांत मोहीम करुन चितोड हस्तगत केलें व त्याच्या पुढील वर्षी (१५६९) जयपूरच्या राजाचा रतनभोर किल्ला घेतला.  याच वर्षी त्यानें फतेपूर-शिक्री शहर बसविलें.  इ.स. १५७२ पर्यंत बहुतेक रजपूत संस्थानिक अकबराच्या अंमलाखालीं आले होते.

इ.स. १५७२ च्या सप्टेंबरांत अकबरानें गुजराथेवरील मोहिमीचें काम हाती घेतलें.  गुजराथेत या वेळीं अनेक लहान मुसलमान संस्थानिक राज्य करीत असून ते मधून मधून शेजारच्या अकबराच्या मुलुखास उपद्रव देत होते.  आतांपर्यंत जेव्हां जेव्हां अकबर कोठें मोहिमीवर निघत असे तेव्हां तेव्हां त्याच्या मनांत आपले सरदार आपल्या मागें बंड करतात कीं काय अशी त्याच्या मनांत सदैव भीति वाटत असे.  परंतु या मोहिमीच्या वेळीं तो या बाबतीत अगदीं निर्धास्त होता.  एवढेंच नव्हे तर जयपूरचे भगवानदास व मानसिंह हे दोघे रजपूत पुरुष या मोहिमींत त्याच्या खांद्यास खांदा लावून त्याच्या बाजूनें लढत होते.  गुजराथेंत ज्यांनी अकबरास विराध केला त्यांत भडोच, बडोदें व सुरत येथील राजे मुख्य होते, त्या सर्वांचा पाडाव करून व गुजराथचा कारभार करण्याकरितां अहमदाबाद येथें आपला सुभेदार नेमून अकबर १५७३ च्या जून महिन्यांत आग्रा येथें परत आला.  परंतु त्याच सालच्या सप्टेंबर महिन्यांत गुजराथेंत बंडवाल्यांनीं उचल खाल्ल्याची बातमी अकबराच्या कानीं आल्यावरून त्यास पुन्हां गुजराथेंत जावें लागलें.