विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अभंग — अभंग शब्दाचा अर्थ अजून स्पष्ट नाहीं आणि अभंगाची पूर्वपीठिका सांपडत नाहीं. प्राकृत पिंगलांत याचें पूर्वस्वरूप दिसत नाहीं. हृदयांतील उत्कट भावना जशीच्या तशीच थोडया शब्दांत व्यक्त करण्यासाठीं सोपें वृत्त तेवढें चांगलें आणि या दृष्टीनें ओवी आणि अभंग यांचें महत्व आहे.
भक्तीमार्गांतील ज्ञानेश्वरादि नेत्यांनीं अभंगवृत्तांतच आपलें हृद्गत ओतलें असून आज हजारों प्रेमळ भगवद्भक्त त्या अभंगांचा टाहो फोडीत आहेत. कमी शिकलेल्या किंबहुना अगदीं अडाणी लोकांनांहि हे अभंग कळण्यासारखे असल्यामुळें ते म्हणतांना त्यांतील अर्थाशी त्यांना पूर्ण समरस होतां येतें.
''अभंग हें वृत्त असें आहे कीं, याला धरबंध अगदीं थोडा आहे. त्याच्या लांबीला तर अगदींच सीमा नाहीं. दोनपासून दोनशें चौकहि एकाच अभंगांत येऊं शकतील. चौक म्हणण्याचें कारण असें कीं, अभंगाच्या एका ओळींत चार चरण असतात व या चार चरणांचा एक चौक होतो. पण या चरणांचा अक्षरांचा, मात्रांचा किंवा गणाचा नीटसा एकहि नियम लागू पडत नाहीं.'' असें महाराष्ट्र-सारस्वतकार अभंगरचनासौकर्य दिग्दर्शित करण्याकरितां लिहितात. पण हें सौकर्यच अभंगाचा सार्वत्रिक प्रसार करण्यास व सामान्य जनांस भक्तीमार्गाकडे ओढण्यास कारणीभूत झालेले आहे; यानेंच मुक्ताबाई-जनाबाईसारख्या अप्रबुद्ध अबलांनां हृदयांतील वैराग्यपर विचार व्यक्त करण्यास संधि दिली व नामदेव तुकोबासारख्या बेताचें शिक्षण असलेल्या ब्राह्मणेतरांनांहि कवित्व करण्याची संधि दिली.
अ भं ग वृ त्ता चे प्र का र.— हे दोन प्रकारचे असतात. लहान व मोठा. चरण चार असून त्यांत अक्षरें तीन पासून आठ पर्यंत असतात. यमक कोणत्या चरणाच्या शेवटीं असावें याविषयीं नियम नाहीं. (विज्ञानेतिहास मराठी वृत्तों पृ. १५४ पहा).
अ भं ग क र्ते मु ख्य क वी, मुकुंदराज: — मराठी भाषेचा आदिकवि ज्ञानदेव कीं मुकुंदराज हा निर्णय ठरेपर्यंत, पहिला अभंगकार यांपैकीं कोण हें ठरवितां येणार नाहीं. मुकुंदराजाचे कांहीं अभंग उपलब्ध आहेत; त्यांतील मराठी वाणी बरीच शुद्ध दिसते व रचनाहि सुबोध आहे.
दृष्टीचें अग्र शून्याचें तें सार।
तेंची दशमद्वार पाही बापा॥
तेथे मधुकर नित्य खेळें आतां।
सूक्ष्म पाहतां अतिलीन॥
लीन होऊनिया मुंगियीये परी।
जिताचि ओवरी प्रासियेली॥
म्हणे मुकुंदराज अवघाचि गोविंद।
गो नामें तो शब्द लीन तेथें॥
मराठीतील पहिली अभंगरचना या दृष्टीनें वरील अभंगाकडे पाहिल्यास स्वभाषाभिमानांत कमीपणा तर मुळींच येत नाहीं; उलट दोनचार शतकांनंतरच्या मराठी भाषेंतील जो हिणकसपणा व फारसी भाषेच्या सहवासानें आलेला गढूळपणा तो त्यांत नाहीं हें पाहून मनाला आनंद होतो. विशेषत: ज्ञानेश्वरींतल्या सारखी क्लिष्ट व कंटाळवाणी भाषा यांत नाहीं. तेव्हां सामान्य लोकांच्याहि आवडीला मुकुंदरायाचे अभंग उतरतील यांत शंका नाहीं. या अभंगकाराविषयीं फारशी ऐतिहासिक माहिती नाहीं. यांचे संस्कृत व मराठी मिळून पाच सहा ग्रंथ उपलब्ध आहेत.
ज्ञानेश्वर :- ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, योगवासिष्ठ, वगैरे ग्रंथांचा कर्ता ज्ञानेश्वर व अभंगकार ज्ञानेश्वर एकच कीं काय असा जो वाद उत्पन्न होतो त्याला कारण ज्ञानेश्वरांच्या नांवानें प्रसिद्ध असलेल्या अभंगांतील भाषेचें अर्वाचील स्वरूप होय. ज्ञानेश्वरींतील भाषा फार जुनी व दुर्बोध आहे; ती वाचणाराला पूर्वाभ्यास अवश्य लागतो; तसें ज्ञानेश्वराच्या अभंगाचें नाहीं. आपणाला अभंगकार ज्ञानेश्वराशीं कर्तव्य असल्यानें वरील वादाकडे या ठिकाणीं लक्ष पुरविणे अनवश्यक होईल. तेव्हां एकदम अभंगावलोकनाला सुरुवात करूं.
ज्ञानेश्वराच्या अभंगाचें विठ्ठलपर, नामपर, उपदेशपर, संतपर, योगपर, सगुणपर, अद्वैतपर, व स्फुट अभंग या प्रकारचें वर्गीकरण करितां येईल. एक हजारापर्यंत अभंग ज्ञानेश्वराचे म्हणून प्रसिद्ध आहे.
विठ्ठलभक्तीमध्यें कवि किती विलिन होतो हें पुढील नांदीसारख्या अभंगांवरून दिसून येईल.
रंगा येई वो ये रंगा येईं वो ये।
विठाई किटाई माझेकृष्णाई कान्हाई ॥ ध्रु.॥
वैकूंठवासिनी वो जगत्रजननी।
तुझा वेधु ये मनीं ॥ १॥
कटीं कर विराजित मुगुट रत्नजडित।
पीतांबरू कासिका तैसा येई का धांवत ॥ २॥
विश्वरूप विश्वंभरे। कमळ नयने कमळाकरे वो।
तुझे ध्यान लागो बाप रखुमादेवीवरे वो ॥ ३॥
भक्त ईश्वराला सगुणरूप मानून त्याच्याशीं जो लडिवाळपणा करितो तें पाहून मोठें कौतुक वाटतें.
पांचा दामांचा घोंगडा नेसेन।
उरली मोट ते मी जेवील गे बाईये ॥ १॥
कामारी (दासी) होऊन ।
या गोपाळाचें घर रिघेन गे बाई ये ॥ ध्रु ॥
त्याचा उंबरा उसिसा करीन।
वरि येर झार सारीन गे बाईये ॥ 2॥
निवृत्ति ज्ञानदेव पुसतिल वर्म।
त्यासि कामिण पुरेन गे बाईये॥ ३॥
स्वत:ला ईश्वराची स्त्री किंवा दासी कल्पून लिहिलेले दुसरे पुष्कळ अभंग सांपडतात.
कांही अद्वैतपर अभंग गूढ अर्थाचे आहेत पण चांगले अलंकारिकहि आहेत.
इवलेंसें रोप लावियेलें द्वारीं।
त्याचा वेल गेला गगनावरी॥ १ ॥
मोगरा फुलला मोगरा फुलला।
फुलें वेंचितां वेचितां अति वारु कळियासी आला ॥ ध्रु ॥
मनाचे युगुतीं गुंफिला शेला।
बाप रखुमादेवीवरीं विठ्ठलीं अर्पिला ॥ २ ॥
x x +
उजव्या आंगें भ्रतार व्याली।
डाव्या आंगें कळवळ पाळी॥
x x x
पति जन्मला माझे उदरीं। मी जालें तयाची नोवरी॥
यांसारखे अभंग मोठे मनोवेधक वाटतात. स्फुट अभंगांत- विरंहिणी, हमामा, घोंगडी, आंधळा, पांगळा गाय, चवाळें, ऋण, पाळणा, कापडी, वर्हाड, पाइक, बाळछंद, वासुदेव, डौर, हरिपाठ, मंथन, सौरी, फुगडी व टिपरी या प्रकारचे विषय आहेत. पुढील फुगडी मोठी मौजेची आहे:-
फुगडी फू गे बाई फुगडी फू।
निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं ॥ ध्रु ॥
मन चित्त धू । विषयावरी थू ॥ १ ॥
घोंगडी,- काळें ना सांवळें धवळे ना पिवळें।
घोंगडें निराळें लाधलों मी ॥ १॥
मगील रगडें सांडिलें आतां। पंढरीनाथाजवळीं ॥ध्रु॥
नवें नव धड हातां आलें।
दृष्टी पाहे तंव मन हारपलें ॥ २ ॥
सहस्त्रफुली वरी गोंडा थोरू।
धडुतें दानीं रखूमादेवीवरु ॥ ३ ॥
विरहिणीची काय अवस्था होते, तिला चंदनाचीं उटणीं फुलांची शेज व कोकिळकूजित कशीं तापदायक वाटतात हें काव्यांतून जसें वर्णिले असतें तसेंच ज्ञानदेवानें पुढील विरहिणीच्या अभंगांत घातलें आहे.
घनु वाजे धुणधुणा वारा वाजे रुणझुणा।
भवतारकु हा कान्हा वेगीं भेटवा कां ॥ १ ॥
चांदवो चांदणें चापे वो चंदन।
देवकीनंदनें विण नावडे वो ॥ ध्रु.॥
चंदनाची चोळी माझें सर्व अंग पोळी।
कान्हो वनमाळी वेगीं भेटवां कां ॥ २ ॥
सुमनाची सेज सीतळ वो निकी।
वोळे आगी सारिखी वेगीं विझवा कां ॥ ३ ॥
तुम्ही गातसां सुस्वरें ऐकों नेदावीं उत्तरें।
कोकिळे वर्जावें तुम्ही बाइयानो ॥ ४ ॥
दर्पणीं पाहतां रुप न देसे वो आपुलें।
बाप रखुमादेवीवर विठ्ठलें मज ऐसें केलें ॥ ५ ॥
''देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।''
'' संताचे संगती मनोमार्गगती । ''
'' काळवेळ नाम उच्चारिता नाहीं । ''
'' रूप पहातां लोचनीं । ''
या सारखे ज्ञानेश्वराचे अभंग सर्वश्रुत आहेत. ज्ञानेश्वर अभंगरचनेंत नामदेव, तुकारामासारखा प्रख्यात नाहीं पण त्याची बहीण जी मुक्ताबाई हिचे अभंग मात्र चटका लावून सोडण्यासारखे आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी मुक्ताबाई कौमार्यावस्थेंतच वारली असल्यानें एवढया लहान वयांत संसाराचा कांहीं अनुभव नसतां इतकं उत्कृष्ट व हृदयस्पर्शी वाङ्मय प्रसवली ही गोष्ट खरोखरीच महाराष्ट्राला विशेषत: महाराष्ट्र अंगनाजनांना भूषणावह आहे. हिचे '' ताटीचे अभंग '' सुप्रसिद्धच आहेत. एके दिवशीं तिचा भाऊ ज्ञानदेव लोकांच्या टवाळीने खिन्न होऊन अंगणाची ताटी (दार) लावून खोलींत बसला असतां मुक्ताबाई तेथे आली व ताटी उघडण्यास विनवूं लागली:—
मजवरी दया करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
संत जेणे व्हावें । जग बोलणें सोसावे ॥
तरीच आंगीं थोरपण । जया नाहीं अभिमान ॥
थोरपण येथें वसे । तेथ भूतदया असे ॥
रागे भरावे कवणाशीं । आपण ब्रह्म सर्व देशीं ॥
ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा ॥
विश्व झालिया वन्ही । संतमुखें व्हावें पाणी ॥
शब्दशस्त्रे झाले क्लेश । संती मानावा उपदेश॥
विश्व परब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
लडीवाळ मुक्ताबाई । बीज मुद्दल ठायीं ठायीं ॥
तुम्ही तरोन विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
ही मुक्ताबाईची अभंगवाणी किती प्रौढ व भेदक आहे !!
चांगदेव:- यानंतरचा अभंगकार चांगदेव. पण याचे पांच पंचवीसच अभंग कायते उपलब्ध आहेत. पण ते बर्यापैकीं आहेत. उदाहरणार्थ:-
बा सखीयं सांगातिणी । कांडू दोघी जणी ॥
बारा सोळा जणी । मिळोनिया ॥
देह हें उखळ । मन हें मुसळ ॥
कांडिले तांदूळ । विवेकाचे ॥
प्रकृति हांडी । आधण ठेविलें ॥
ईंधण जाळीलें । काम क्रोध ॥
मदनाचा कढ । येतो वेळोवेळा ॥
चटू होतो । जवळी सबधीर ॥
अमृताचे ताट । करूनिया चोखट ॥
पाहुणा बरवंट । आत्माराम ॥
चांगदेव म्हणे । भली वो मुक्ताबाई ॥
ज्ञानाचिये खूण । दाखविली ॥
नामदेव :- यांच्या काळापर्यंत अभंग हें प्रधान वृत्त नसून केवळ एक सोपें कवितावृत्त म्हणून गणले जाई व म्हणूनच या छंदांत फारसें वाङ्मय उपलब्ध नाहीं. पण नामदेवानें विठ्ठल भक्तीचा आपला संप्रदाय या सुगम छंदाच्या द्वारे प्रसृत करून काव्यरचनेची एक नवीन तर्हा उपयोगांत आणिली. नामदेवोत्तर बरीच भक्तिप्रधान कवने अभंगछंदात होती. अभंगवाङमयाचा काल वास्तविक नामदेवापासून तुकारामा पर्यंतचा धरण्यास हरकत नाही.
नामदेव, विसोबा खेचरापासून अभंग करण्याचे शिकला असे दिसते : -