विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनंतपुर जिल्हा :- मद्रास इलाख्यांतील एक जिल्हा- उ.अ. १३ ४१' ते १५ १४' व पू. रे. ७६ ४९' ते ७८ ९'. क्षेत्रफळ ६७२२ चौरस मैल. उत्तरेस बल्लारी आणि कर्नूल हे जिल्हे; पश्चिमेस बल्लारी आणि म्हैसूरचें संस्थान; दक्षिणेस म्हैसूरचें संस्थान; आणि पूर्वेस कडाप्पा जिल्हा.

अनंतपुर जिल्हा हा म्हैसूर पठाराचा अगदीं उत्तरेकडील प्रदेश होय. दक्षिणेस हा भाग २२०० फूट उंचीवर असून उत्तरेच्या बाजूस गुत्तीकडे १००० फूट उंच आहे. पूर्वेकडील प्रदेश डोंगराळ असून ईशान्येकडील प्रदेश सपाट आहे. हा भाग व गुत्ती तालुक्याच्या पश्चिम दिशेकडील भाग वगळला असतां बाकीचा जिल्हा ओसाड, जंगलविरहित आहे. जमीन तांबुस रंगाची असून उंचसखल आहे. दक्षिणेकडे पेनकोंडा तालुका हा फारच डोंगराळ असून लागवड करण्यास अगदीं निकामी आहे; वर सांगितलेल्या सपाट भागांतील जमीन काळी असून कापसायोग्य आहे. मदकशीर तालुक्यांत पाण्याची सोय असल्यामुळें तो तालुका जास्त सुपीक आहे.

भू स्त र :- पेन्नार नदी या जिल्ह्यांतून वाहते. या जिल्ह्याचा उत्तरेकडील व पूर्वेकडील भागच फक्त भूस्तरसंशोधक खात्यानें तपासला आहे. या तालुक्यांत वज्रकरूरच्या आसपास भूपृष्ठावर केव्हां केव्हां हिरे सांपडतात. परंतु ते वरच कां सांपडावेत हें गूढ आहे. येथील निळया रंगाचा खडक किंबर्ले (आफ्रिका) येथील निळया मातीच्या रंगाप्रमाणें दिसतो परंतु दोघांची उत्पत्ति अगदीं निराळ्या पदार्थांपासून आहे असें स्पष्ट दाखविलें गेलें आहे. पुष्कळ खेड्यांत कुरुंद नांवाचा खनिज पदार्थ सांपडतो. सुलमररी व नेरिजमुपल्ली येथें चांगल्या प्रतीचा' स्टीयटाइट ' सांपडतो असें म्हणतात.

व न स्प ति - अगदीं ओसाड जमिनीवर ज्या उगवतील अशाच वनस्पति या भागांत दृष्टीस पडतात. निवडुंग, बाभूळ व तरवड हीं झाडें पुष्कळ उगवतात.

व न्य प्रा णि - कडापा जिल्ह्याच्या सरहद्दीवर रानडुकर,सांबर वगैरे प्राणी आढळतात.

ह वा - येथील हवा कोरडी असून निरोगी आहे. उन्हाळा मार्च महिन्यांत सुरू होऊन जून महिन्याच्या आरंभीं पावसाळा सुरू झाला म्हणजे नाहींसा होतो. या जिल्ह्यास दोन्ही पावसा पैकीं कोणताहि पुरेसा पडत नाहीं. ईशान्य दिशेकडून येणारा पाऊस आक्टोबरमध्यें बरा पडतो पण पुढें मुळींच पडत नाहीं. असें म्हटलें तरी चालेल. पावसाची सर्व जिल्ह्याची सरासरी २३ इंच आहे. इ. स. १८५१ व १८८९ सालीं या भागांत मोठीं वादळें उद्भवलीं होतीं त्यामुळें त्यावेळीं फार नुकसान झालें होतें.

इ ति हा स - चवदाव्या शतकांत विजयानगरच्या राज्यांत सामील होण्यापूर्वीचा या भागाविषयींचा इतिहास उपलब्ध नाहीं. या जिल्ह्यांत असलेले पेनुकोंडा व गुत्ती हे दोन किल्ले विजयानगरच्या राज्यांतील फार महत्त्वाचे भाग होते. आणि जेव्हां इ. स. १५६५ सालीं दक्षिणेंतील मुसुलमानांविरुद्ध झालेल्या तालकोटच्या लढाईत विजयानगरचा रामराजा मारला गेला त्यावेळीं नामधारी राजा सदाशिव हा आपल्या अनुयायांसहित पेनुकोंडा येथें पळून गेला. या ठिकाणीं विजयानगरचे राजे पुष्कळ दिवस रहात होते. या किल्ल्यानें पुष्कळ वेढयांस दाद दिली नाहीं. अखेरीस हा किल्ला मुसुलमानांनीं सर केला. परंतु मध्यंतरी विजयानगरचा राजवंश उत्तर अर्काट मधील चंद्रगिरी येथें राहण्यास गेला होता. पुढें गुत्ती किल्लाहि मुसुलमानांनीं सर केला. हा किल्ला मुसुलमानांपासून मुरारराव यानें जिंकून घेऊन तेथें त्यानें आपलें राहण्याचें ठिकाण केलें होतें. त्या वेळेच्या धामधुमीच्या काळांत त्या भागांतील स्थानिक सत्ता तेथील पाळेगारांच्या हातांत असे. परंतु ज्या वरिष्ठ सत्तेचा विजय होत असे त्या सत्तेस या पाळेगारांना नमावें लागत असे. या पाळेगारांचें आपसांत वैमनस्य असल्यामुळें कोणांतच फारसा राम नसे. त्यांतल्या त्यांत अनंतपुरचे हंडे पाळेगार जरा वजनदार असत. हैदरअल्लीच्या हातांत सत्ता आल्याबरोबर त्यानें हा आपल्या राज्याजवळील मुलुख लवकरच काबीज केला. इ. स. १७७५ सालीं गुत्ती किल्ला मात्र हैदराविरुद्ध मुराररावानें लढविला होता. परंतु किल्ल्यांतील लोकांस पाणीपुरवठयाच्या अभावीं शरण यावें लागलें.

इ. स. १७९२ सालीं ब्रिटिश, मराठे व निजाम यांनीं एकत्र होऊन टिपूचा पराभव केला. त्यावेळीं त्यानें जो भाग यांच्या स्वाधीन केला त्यांत अनंतपुरचा ईशान्येकडील भाग म्हणजे ताडपत्री आणि ताडीमरी तालुके निजामाच्या वांटयास आले. पुढें इ. स. १७९९ सालीं श्रीरंगपट्टणच्या हल्ल्यांत टिपु मारला गेल्यावर त्यावेळीं जी वांटणी झाली त्यांत या जिल्ह्याचा बाकीचा भाग निजामाकडे आला. परंतु इ. स. १८०० सालीं आपल्या राज्यांत ब्रिटिश सैन्य जें ठेवावयाचें होतें त्याच्या खर्चाकरतां हा सर्व मुलुख त्यानें ब्रिटिशांस तोडून दिला. या मुलखाचे दोन जिल्हे बनविण्यांत आले; व हल्लींचा अनंतपुर जिल्हा झाल्यामुळें एका कलेक्टरच्यानें काम झेंपेना. म्हणून इ. स. १८८२ सालीं त्या एका जिल्ह्याचे बल्लारी व अनंतपुर असे दोन जिल्हे करण्यांत आले. या जिल्ह्यांत प्राचीन नांव घेण्यासारख्या गोष्टी म्हटल्या म्हणजे पेनुकोंडा व गुत्ती हे किल्ले होत. ताडपत्री येथील देवळांतील खोदकाम प्रेक्षणीय आहे. त्याचप्रमाणें लेपाक्षी व हेमावती येथील देवळें पाहण्यालायक असून त्या जिल्ह्यांत जे शिलालेख आहेत त्या सर्वांत हेमावती येथें जुने लेख सांपडले आहेत. त्यांत पल्लव राजांच्या एका शाखेची वंशावळ सांपडली आहे. नवपाषाणयुगांतील वस्तीचे अवशेष कांहीं टेंकडयावर सांपडले आहेत व कांहीं इतर प्रागैतिहासिक लोकांनीं बांधलेलीं थडगीं इतस्तत: आढळतात.

या जिल्ह्याची लोकसंख्या कसकशी वाढत गेली हें पुढें दिलेल्या आंकडयावरून कळून येईल.

सन लोकसंख्या
१८७१ ७४१२५५
१८८१ ५९९८८९
१८९१ ७२७७२५
१९०१ ७८८२५४
१९११ ९६३२२३
१९२१ ९५५९१७