विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अथर्ववेद - या वेदासंबंधीं सामान्य माहिती वेदविद्या या विभागांत तिसर्या प्रकरणांत दिली आहे. त्यावरुन या वेदाचें सामान्य स्वरूप लक्षांत येईलच. यज्ञांतील चार मुख्य ॠत्विजांपैकीं ब्रह्मा अथर्ववेदी असावा या कल्पनेचा उदय कसा झाला, अथर्व्यांचें पौरोहित्य त्रैविद्यांनीं कसें हिसकावून घेतलें वगैरे माहिती दुसर्या व तिसर्या विभागांत प्रसंगोपात दिलीच आहे. अथर्ववेदांगभूत जें सूत्र वाङमय आहे त्यासंबंधीं विवेचन येथे देण्याचें योजिलें आहे.
१ वैतानसूत्र
अ थ र्व वा ङ म या त स्था न – अथर्ववेदाचे धर्मविधि किंवा संस्कार ज्यांत सांगितले आहेत असे पांच ग्रंथ आहेत; यांना श्रुति इतके महत्वाचे ग्रंथ मानतात. ते पुढें दिले आहेत:- (१) कौशिकसूत्र किंवा संहिताकल्प किंवा संहिता विधि. (२) वैतानकल्प किंवा वैतानसूत्र. (३) नक्षत्रकल्प. (४) शान्ति कल्प (५) अंगिरसकल्प किंवा अभिचारकल्प किंवा विधानकल्प.
अथर्ववेदाच्या नऊ शाखा किंवा भेद फार पुरातन कालापासून करण्यांत आलेले आहेत; पैकीं चार शाखांचे वरील पांच ग्रंथ आहेत. त्या चार शाखा येणेंप्रमाणें–
१ शौनकीय २ अक्षल ३ जलद ४ ब्रह्मवद. अथर्व-वेदस्य नवभेदा भवन्ति। तत्र चतसृषु शाखासु शौनकादिपु किशकोऽयं संहिता विधि:। (अथर्ववेद पद्धति- उपोद्धात).
पैप्पलाद ह्या नांवाच्या एका अथर्ववेदाच्या शाखेचें नांव सर्वांमध्यें अधिक परिचित आहे. कौशिक व वैतान सूत्रें ह्या शाखेचीं नाहींत; कारण त्या सूत्रांत प्रतीकांची अवतरणें न घेतां पैप्पलादाचे मंत्र सबंधच्या सबंध घेतलेले आहेत. शौनक व देवर्शी यांच्या मापनाविषयीं मतांना विरोध करण्यांत आला आहे; व कौशिकसूत्र ८५-६-७ येथें कौशिकसूत्र शौनकीय शाखेचें आहें असें स्पष्टपणें सांगितलें आहे. शौनकीनांचें मत शेवटीं दिलें आहे; आणि कौशिकाच्या नेहमींच्या पद्धतीप्रमाणें तें ग्राह्य समजलें पाहिजे.
वर जीं पांच श्रौतसूत्रें ( किंवा ५ कल्प ) दिली आहेत त्यापैकीं आंगिरस किंवा अभिचारकल्प हे अथर्ववेदाचें परिशिष्ट आहे; त्यांत अभिचार किंवा जादुटोणा या विषयासंबंधीं लिहिलें आहे. कौशिक सूत्राच्या ६ व्या अध्यायाच्या स्पष्टीकरणास अभिचार कल्पाचा थोडासा उपयोग होण्यासारखा आहे.
नक्षत्रकल्प व शान्तिकल्प हीं दोन्ही सुद्धां अथर्ववेदाचीं परिशिष्टेंच आहेत. हें त्यांच्या नांवावरून समजण्यासारखें आहे. ब्रह्मवेदपरिशिष्टं-नक्षत्रकल्पाभिधानन् । एके ठिकाणीं नक्षत्रकल्पाला पहिलें परिशिष्ट म्हटलें आहे; व परिशिष्टांच्या यादींत त्याचें नांव प्रथम घातले आहे.
कौ शि क वै ता न सू त्रा चा प र स्प र सं बं ध :- कौशिक व वैतानसूत्रें यांत संस्कार सांगितलें आहेत; परंतु इतर वेदांच्या शाखांतील ज्या सूत्रांत संस्कार सांगितले आहेत त्या सूत्रांच्या संबंधाहून कौशिक व वैतान सूत्रांचा परस्पर संबंध व त्यांचा अथर्व संहितेशीं संबंध अनेक बाबतींत निराळा आहे. त्रैविद्यम किंवा त्रयी विद्या असें इतर तीन वेदांना म्हटलें आहे; व त्यायोगें अथर्ववेदांतील सूत्रें वेंद संज्ञेस पात्र असण्याबद्दल संशय दर्शविला आहे. श्रौत संस्कारांत अथर्व वेदांतील सूक्तांचा उपयोग करण्यास तीं अपात्र आहेत अशी समजूतहि व्यक्त झाली आहे. ब्राह्मणांत गोपथ ब्राह्मण व श्रौत सूत्रांत वैतानसूत्र हीं अनुक्रमें ब्राह्मणवाङमय व श्रौत-वाङमय यांतील अगदी अलीकडील रचलेले ग्रंथ आहेत. अथर्ववेदांत गोपथ ब्राह्मण आहे इतर वेदांतील चरणांत वाङमय लिहिण्याची जी पद्धत प्रचारांत होती तिचें अनुकरण गोपथ ब्राह्मण व वैतानसूत्र यांत केलेलें आहे. वैतानसूत्रासंबंधी ही हकीकत झाली. पण मान्त्रिकविद्या, भूत काढणें वगैरे ज्या वेदांत आढळतात, त्या वेदाला चिकटून राहणार्या मनुष्याला वितक्रमाविषयीं व त्याच्या भूत काढण्याच्या वगैरे क्रियासंबंधीं प्रत्यक्ष व्यवहारांत अनेक गोष्टी प्रचलित होत्या व इतर वेदांना माहीत नसणार्या अनेक गोष्टी या अथर्ववेदानुयायांकडून जगापुढें मांडल्या गेल्या. अथर्वण ग्रंथांत अथर्ववेदांतील सर्वांत मोठ्या व महत्त्वाच्या कौशिक सूत्राला जी उच्च स्थिति प्राप्त झाली आहे ती वरील कारणामुळेंच होय.
गृह्यसूत्रें श्रौतसूत्रांवर अवलंबून आहेत. गृह्यसूत्रांत श्रौतसूत्रांचा उल्लेख अनेक ठिकाणीं स्पष्टपणें केलेला आहे.
श्रौतसूत्रांत ज्या विधीचें एकदां वर्णन आलें आहे त्यांचें पुन्हा वर्णन गृह्यसूत्रांत केलेलें नाही.
आपस्तंबांत धर्मविषयक सर्व सूत्रें एके ठिकाणीं केलीं आहेत; आपस्तंबाच्या सूत्रग्रंथांत श्रौतसूत्र गृह्यसूत्राच्या अगोदर आलें आहे.
गृह्यसूत्रें बरोबर रीतीने कळण्यास मुख्य अडचण ही येते कीं तीं श्रौतसूत्रांवर सर्वस्वी अवलंबून असून जणू काय त्यांचीं परिशिष्टें आहेत असें दिसतें व श्रौतविधींची माहिती पूर्णपणें आपणांस आहे असें तीं सूत्रें गृहीत धरतात.
कौशिक व वैतानसूत्रें यांतील परस्पर संबंध वर दिलेल्या गृह्य व श्रौतसूत्रांतील संबंधासारखा नाहीं. कौशिकसूत्र वैतानसूत्रावर कोणत्याहि रितीनें अवलंबून नाहीं; उलट वैतानसूत्र कौसिकसूत्रावर अवलंबून आहे ही गोष्ट ज्या ठिकाणीं दोन्ही सूत्रांतील विषयांत फरक असेल व श्रौतविधि व गृह्यविधि यांत फरक असेल तेथें द्दष्टोत्पतीस येते. म्हणून वैतानसूत्रासंबंधीं बहुतकरून असें म्हणतां येईल कीं, अमुक एका शाखेंत ज्यांची सावकाश व धिम्मेपणानें वाढ झाली आहे अशा श्रौतसंस्कारांतील विधींपासून वैतानसूत्र आपोआप सहज बनलेलें नाहीं; तर तें सूत्र मुद्दाम तयार करण्यांत आलें; व तें ज्या वेळेस अथर्ववेदानुयायांना त्यांचे इतर वेदांच्या पुरोहितांबरोबर वादविवाद चालू असते त्यावेळीं वेदांतील संस्कार व विधी करण्याकरितां आपला स्वत:चा एक सूत्रग्रन्थ असावा असें वाटावयास लागलें त्या वेळेस तयार करण्यांत आलें. वैतान सूत्रास अथर्व वेदांतील संस्कारांचा पाया असें म्हणतां येणार नाहीं; कारण त्यांत दुसरीकडून उसना घेतला नाहीं असा किंवा कौशिक सूत्रांत आढळत नाहीं असा फारच थोडा भाग आहे. वैतानसूत्रांत यजु:संहितेंतील अनेक ॠचा व पाठ आढळतात; व संस्कारांचें वर्णन करितांना त्यांत कात्यायनाच्या श्रौतसूत्राचे अनुकरण केलेलें स्पष्ट दिसतें. वैतानसूत्र १.१.८. देवता हर्विदक्षिणा यजुर्वेदात ! ह्या वाक्यावरून ही गोष्ट आपोआपच उघड दिसते. याच वरून दुसरी गोष्ट अशी दिसून येते कीं वैतान व कात्यायन ह्यांचा परस्परसंबंध असावा. कारण कात्यायनावर लिहिलेल्या भाष्यांत वैतानसूत्र, आथर्वण किंवा अथर्व सूत्र या नांवांखालीं वैतान सूत्रांतील अनेक वार अवतरणें घेतलीं आहेत. वैतानसूत्र व कौशिकसूत्र यांच्या परस्परसंबंधाविषयीं असें म्हणतां येईल कीं कौशिक सूत्र ही दुसरी एक स्वतंत्र संहिता आहे असें समजून अशी गोष्ट गृहीत धरली आहे कीं कौशिकांतील संस्कार व अथर्व वेदांतील मन्त्राहून निराळया ठिकाणाहून घेतलेले मंत्र हे वाचकांना माहीत आहेत व त्यांचा त्यांना अर्थहि समजला आहे. वैतान सूत्राची उत्तमप्रत व त्याचें उत्तम भाषांतर गावें साहेबांनीं संपादिलेल्या वैतान सूत्र ग्रन्थांत आढळतें.
अं त र्र च ना – वैतान सूत्रांतील कांहीं मजकूर अथर्व वेदांतील कांहीं भागाशीं शब्दश: जुळतो. वैतान सूत्रांतला कोणता भाग अथर्व वेदाच्या कोणच्या भागाशीं जुळतो तें पुढें दिलें आहे.
वैतान सूत्रांतील १. १९; १०. ५; ३७. २३; ३. १७; ९. ४; २८. ३२ – इत्यादि सूत्रें अनुक्रमें अथर्ववेदांतील १९. ६९, १-४; १२. १, २३-२५; १८. ३, ८; ९; २, ४८; १, ६१; २, ५३; ४, ४४; ७. ११०, ३; ३; १०, ७; ३. १७, २ या सूक्तांशी जुळतात. अथर्ववेदांतच फक्त आढळणारा असा वैतान सूत्रांतला मजकूर कौशिकांत येणारा मजकूर वगळल्यास फारच थोडा आहे.
वैतान सूत्रांत ब्राह्मण ब्रह्मवेदविद् असला पाहिजे असें म्हटलें आहे. ( वै. सू. १. १. ) ब्रह्मवेद हा शब्द कौशिकांत आढळत नाहीं; पण त्याचे ऐवजीं कौशिकांत व वैतान सूत्रांत एके ठिकाणीं भृग्वंगिरोविदू हा पुराण शब्द आढळतो ( कौशिक ६३-३ व ९४-३ आणि वैतान १. ५). अथर्वा-द्गिरोविदं ब्रह्माणम् । गोपथ ब्राह्मण व परिशिष्टें यांतहि भृग्वंगि-रोविद् शब्द आढळतो. ब्रह्मवेदविद् हा शब्द अलीकडचा दिसतो. अथर्ववेद व त्याचे पुरोहित यांचे श्रेष्ठत्व कोठें कोठें वैतानांत दर्शविण्यात आलें आहे. उदाहरणार्थ वै. सू. ११. २ यांत सांगितलें आहे कीं, उद्गातर्, होतर् व अध्वर्यु यांच्या ऐवजीं अथर्वाङ्गिरोविद् ब्राह्मण पसंत करावा. अथर्वण वर्गांतील पुरोहित सर्वांत श्रेष्ठ आहे हें दाखविण्याचा प्रयत्न वै. सू. ६०. १ व ३७. २ यांत स्पष्टपणें केलेला दिसतो. ब्राह्मण पुरोहित व त्याचा वेद यांचा मोठेपणा दर्शविण्याकरितां अथर्व परिशिष्टांत शक्य तो प्रयत्न इतरांकरितां अपशब्द योजना करूनहि करण्यांत आला आहे.