विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अननस :- अननसाचें झाड केतकीच्या झाडासारखें असतें. याचीं पानें तीन साडेतीन फूट लांब व दोन इंच रुंद असतात. पानें बहुत करून भुरकट हिरव्या रंगाचीं असतात. पण कधीं कधीं रंगी बेरंगीहि दृष्टीस पडतात. या झाडाचें खोड फारच आंखूड असतें. या झाडाच्या फळाची रचना फार लक्ष पुरविण्यासारखी मजेदार आहे. फळ लागण्यासारखें झाड झालें म्हणजे त्यांतून एक दांडा वर निघतो व त्या दांडयावर फार दाट अशीं फुलें येतात. या प्रत्येक फुलाचें स्वतंत्र फळ न होतां तीं चिकटून एकच मोठें फळ होतें.
हें झाड उष्ण प्रदेशांत होतें. ब्राझीलदेश या झाडाचें जन्मस्थान आहे.
अमेरिकेचा शोध लागल्यानंतर लवकरच अननसाचीं झाडें सर्व जगभर पसरलीं व उष्ण कटिबंधांतील देशांतून तीं चांगलीं वाढूं लागलीं. पाइनशंकूंत (pine-cone) व त्याच्यांत बरेंच साम्य असल्यामुळें स्पेनमधील लोक त्याला पिनस ( pinus ) म्हणत. ब्राझीलियन 'ननस' या नांवावरून पोर्तुगीझ लोक त्याला अननस म्हणूं लागले व अलीकडील सर्व नांवें बहुतेक याच नांवावरून झालेलीं आहेत. हिंदुस्थानांत याला अननस, अनारस, अनाशापाझाम, नानट, व अनस अशीं नांवें आहेत. अननसाचीं अगदीं अर्वाचीन इंग्रजी नांवें म्हटलीं म्हणजे फॉरेनस्क्रूपाइन्, (foreign Screwpine), यूरोपिअन जॅक फ्रूट (European jack fruit) वगैरे आहेत. यूरोप, आशिया, अरबस्तान व मिसर येथील जुन्या अभिजात भाषांतून याला नांव आढळत नाहीं. हें झाड अर्वाचीन असल्यामुळें याला संस्कृतमध्येंहि नांव सांपडत नाहीं.
इ ति हा स :- वेस्टइंडीज बेटांत व अमेरिका खंडांत हीं झाडें होतात असें ओव्हिएडोनें (Oviedo) लिहिलें आहे.
ख्रिस्ताफर ऍकोस्टा ( Christopher-Acosta ) यानें १६०५ सालींच हिंदुस्थानांत अननस विपुल असल्याचें लिहून ठेविलें आहे. ( in Clusius Hist. Exot. pl.1605, 284) ब्राझिल, हायटि (Haiti ) व मेक्सिको येथें अननस असल्याचें मार्कग्राफ आणि (Marcgraf) हरनॅन्डेझ (Hernandez ) यांनी वर्णन केलें आहे. १६ व्या, १७ व्या व १८ व्या शतकांतील बहुतेक वनस्पतिशास्त्रज्ञांनीं त्याचें वर्णन करून चित्रेंहि काढिलीं आहेत. बोइम (Boym) याचें अननस हिंदुस्थानांतून चीनमध्यें गेला असें म्हणणें आहे. अॅकोस्टाप्रमाणेंच र्हीड्स् म्हणतो कीं पोर्तुगाझ लोकांनीं अननस हिंदुस्थानांत आणिला व एका शतकाच्या आंतच हिंदुस्थानांतील, सर्व भागांत तो इतका विस्तृत प्रमाणावर फैलावला कीं रंफिअसला (Rumphius ) तो एतद्देशियच आहे असें वाटलें. लिन्सकोटन (Linshcotan ), पिरार्ड (Pyrard), बरनिअर (Bernier), व हरबर्ट ( Herbert.) वगैरे प्राचीन प्रवाशांनीं त्याचा प्रामुख्यानें उल्लेख केला आहे.
जहांगीरनें अननस परदेशांतून येथें आल्याचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रांत केला आहे; तथापि बाबरनें दिलेल्या येथील फळांच्या यादींत अननस कोठेंच दिसत नाहीं.
फ ळा ची ला ग व ड :- उष्ण कटिबंधांतील अननसापेक्षां इंग्लंडमधील उष्णतागृहांतून (hot houses) तयार झालेले अननस फार रुचकर असतात असें म्हणतात. यूरोपांत अननसाची लागवड प्रथम लेडेन् ( Leyden ) येथें १६५० त झाली असें दिसतें. इंग्लंडांत तयार झालेला पहिला अननस दुसर्या चार्लसला ( १६७२ ) नजर करण्यांत आला होता. अर्वाचीन साधनांनीं दळणवळण फार जलद होत असल्यामुळें वेस्टइंडिज, मदिरा व कॅनरी बेटांतून लागतील तितके अननस यूरोप व अमेरिका खंडांत जातात; त्यामुळें तिकडे उष्णता गृहांतून अननस तयार करणें कमी होऊन अननसाची किंमत कमी झाली; परंतु यूरोप व अमेरिकेच्या आसपासच्या उष्ण कटिबंधांतील भागांतून अननसाच्या निरनिराळया जाती, लागवडीचे प्रकार व त्याचा खप यांजकडे अलीकडे लोकांचें लक्ष बरेंच लागलें आहे. हिंदुस्थानांत हीं झाडें विपुल असूनहि व्यापाराकरितां अननसाच्या जातीची सुधारणा करण्याची व औद्योगिक दृष्टीनें याची लागवड करण्याची खटपट अद्याप कोणी केली नाहीं. वर सांगितल्याप्रमाणें अननसाची लागवड करून व्यापार करणाराला चांगला फायदा होण्यासारख आहे.
ह वा व व स्तु क्षे त्र :- अननस पहिल्यानें पश्चिम किनार्यावर लाविला परंतु पुढें लवकरच तो पूर्व किनार्यावरहि लाविला गेला. पूर्व व उत्तर बंगाल, आसाम व ब्रह्मदेश ह्या भागांतील हवा व जमीन अननसाला फारच योग्य आहे. हिंदुस्थानच्या इतर भागांतूनहि कोठें कोठें अननस होतो परंतु पश्चिम घाट व मुख्यत्वेंकरून त्याचें दक्षिण टोंक यावर याची उत्पत्ति फारच होते. आसामांत व विशेषत: खाशिया टेंकडयांतून रुचकर अननसाची उत्पत्ति आपोआप व विपुल होते. तेनासरीममध्यें तर त्याची उत्पत्ति इतकी होते कीं जून व जुलैमध्यें एका रुपयाला एक होडीभर अननस मिळतात असें डॉ. हेल्फर सांगतात.
जा ती किंवा प्र का र :- हिंदुस्थानांतील लेखक फक्त एक किंवा दोन जातींचीच माहिती देतात. फिरमिंगर ( Firminger ) म्हणतो सिलहट्टी अथवा कुमला अननस लहान असून त्याला फार थोडे परंतु विलक्षण मोठाले डोळे असतात. व डाक्काचा अननस गुळगुळीत असून त्याला पांढरे डोळे असतात. सिलोन, पेनांग व इंग्लंड मधील येणार्या अननसांचेहि त्यानें वर्णन केलें आहे. परंतु हिंदुस्थानांतील अननसांच्या निरनिराळया जातींची माहिती कोठेंच उपलब्ध नाहीं.
ज मी न व ख त :- वाळू असलेली चिकण मातीची व लवकर पाणी चांगलें निघून जाणारी जमीन फार उत्तम असें कांहीं लोकांचें मत आहे. निव्वळ वाळूच्या ठिकाणींहि अननस होतात, असेंहि म्हणतात. जमिनींत चुन्याचें प्रमाण जास्त असलेलें चांगलें. प्राणिज खत चांगले कुजल्या शिवाय रोपांजवळ घालूं नये कारण त्यामुळें त्यांची वाढ खुंटते. जमीन जितकी कसदार, व खत जितकें उंची असेल तेवढें अननसाला चांगलें असें स्वीड म्हणतो. खारावलेले मासे वाळवून केलेल्या खताची वुडरो फार स्तुती करितो. व पावसाळयाच्या पूर्वी जमिनींत हें खत पुरावें असें त्याचें म्हणणें आहे. परंतु वेस्टइंडीज मधील अनुभवावरून जास्त खतापासून रोपें मरतात असें फिरमिंगर म्हणतो. कुजलेला पाचोळा, कुजलेलें शेण व वाळू यांनीं भुसभुशित झालेल्या जागीं चांगले अननस होतात. छायेंत झालेले अननस जरी आकारानें मोठे असतात तरी ते रुचीला कमी असतात. फळ तयार होत असतांना रोपांना वारंवार पाणी द्यावें लागतें. कांहीं दिवसांनी रोपाचें स्थलांतर करणें फार चांगलें असतें. तीन चार वर्षांनीं झाडें निकस झाल्यासारखीं दिसूं लागतात व असें झाल्यावर तीं उपटून टाकून जमीन पुन्हा तयार करून त्या ठिकाणीं नवीन रोप लावावें.
सीलोन, त्रावणकोर, मलबार, कारोमांडल किनारा व बंगाल वगैरे प्रांतांत याची लागवड फार होते. अननसाचीं झाडें समुद्र किनार्यालगतच्या प्रांतांत फार होतात म्हणजे याला हवा फार सर्द व दमट अशी पाहिजे. जमीन उत्तम निचर्याची व पुळणवट अशी लागते. अननसाची स्वतंत्र अशी लागवड फारशी कोठें करीत नाहींत. नारळ सुपारी किंवा आंबे यांच्या बागेंत याचीं झाडें करतात. मुंबई शहराच्या आसपास व ज्या ठिकाणीं रेलवेची सोय आहे अशा ठिकाणीं अननसाकडे थोडें बहुत लक्ष दिलें जातें. परंतु इतर ठिकाणीं याची लागवड काळजीपूर्वक होत नाहीं. सामान्यत: याची लागवड करण्याची रीती अशी:- मुळांपासून जीं पिल्लें निघतात तीं किंवा देंठाजवळ जीं पिल्लें असतात तीं काढून एका वाफ्यांत लावतात. तेथें तीं चांगली मोठीं होईपर्यंत म्हणजे दोन वर्षेपर्यंत ठेवतात. वाफ्याला मधून मधून भरपूर पाणी देतात. फळाच्या शेंडयावरील पिल्लें लावण्यासाठीं घेत नाहींत. नंतर आंब्याच्या झाडाखालील जमीन नांगरून तीन तीन फुटांवर वाफ्यांत तीं पिल्ले लावतात. यांना फळ येण्याला दोन किंवा तीन वर्षे लागतात. झाडें लावल्यानंतर त्यांना जमिनींतून आणखीं पिल्लें फुटतात आणि सर्व जमीन अननसांच्या झाडांनीं व्यापिली जाते. झाडें एकदां लावल्यावर कोणी पावसाळयांत एक एक पसा एरंडीची पेंड दर झाडास देतात. कोणी कोणी एप्रील अगर मे महिन्यांत सर्व बागेला पाणी देतात. याशिवाय झाडांची फारशी काळजी कोणी घेत नाहीं. फूल जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यांत येऊन फळ जून महिन्यांत तयार होतें. अननसाचीं झाडें उघडयावर उन्हांत चांगलीं होत नाहींत. फळावर ऊन पडल्यासहि फळ चांगलें भरत नाहीं.
पावसाळयांत कोंकणांत अननस पिकून बाहेरगांवीं पाठविण्याची सोय नसल्यामुळें बहुतेक पीक फुकट जातें.
प्र ज न न व हं गा म :- फळ तयार झालें म्हणजे मुख्य बुध्याच्या आसपास जमिनींत असलेल्या बुंध्यापासून पुष्कळ अंकुर किंवा पिल्लें निघूं लागतात. यांचेपासून प्रजनन गलें होतें. प्रजननाचा दुसरा मार्ग म्हणजे फळांवर आलेले पानांचे अंकुर व फळांतील बिया होत.
निकोलस साहेबांनीं सांगितलेली लागवडीची तर्हा खालीं दिली आहे :-
' सहा फूट अंतरावर ओळी पाडाव्या व प्रत्येक ओळींत तीन फुटांहून कमी अंतर न ठेवतां अंकुर लावावेत. अशा रितीनें एक एकरांत २५०० रोपें तयार होतील. पहिला बहार येऊन गेल्यावर दर रोपाचे सुमारें चार कोम अथवा अंकुर ठेवून बाकीचे कापून टाकावे म्हणजे दुसर्या हंगामाचे वेळीं सुमारें १०००० फळें उत्पन्न होतील. रोपें कांटेरी असल्यामुळें मध्यें काम करण्यास अवश्य ती जागा राहण्याकरितां ओळींत बरेंच अंतर ठेवणें इष्ट आहे. शिवाय दोन ओळींत जास्त जागा ठेविल्यानें पहिलीं रोपें उपटून काढल्यावर नवीन लागवडीच्या वेळीं जुन्या दोन ओळींच्यामध्यें नवीन रोपें लावितां येतात व अशा तर्हेनें एकाच जागेवर बरेच दिवस सारखें पीक काढून घेतां येतें.
वेस्ट इंडीजमध्यें लागवडीनंतर आठ किंवा नऊ महिन्यांनीं फळें तयार होतात. दुस्थानांतील दक्षिणेकडील भागांत ऑगस्ट महिन्यांत लागवड करावी असें फिरमिंगर म्हणतो. रोपाला फेब्रुवारी व मार्च महिन्यांत फुलें येऊन जुलै व ऑगस्ट महिन्यांत फळे पिकण्यास सुरवात होते, व सप्टेंबर आणि अक्टोबरमध्यें त्यांची पूर्ण वाढ होते. कधीं कधीं रोपाला फुलें उशिरा आल्यामुळें हिवाळयांत फळें तयार होतात. अननस पिकण्यास उष्णता अवश्य पाहिजे असल्यामुळें हिवाळयांतील फळें चांगली पक्व हात नाहींत व त्यामुळें तीं आंबट व खाण्यास वाईट असतात. मुंबई इलाख्यांत जोमदार अंकुरांची लागवड जानेवारी ते मार्चपर्यंत करावी व मुळया फुटेपर्यंत त्यांनां पाणी द्यावें असें वुडरो म्हणतो.
फळ पूर्ण पिकण्याचे पूर्वी तें चांगल्या धारेच्या चाकूनें देठांपासून कापितात. कांहीं अंतरावर फळें पाठविणें झाल्यास प्रत्येक फळ गवतांत किंवा कागदांत गुंडाळावें. दोन किंवा तीन फळांपेक्षां जास्त फळें एके ठिकाणीं बांधूं नयें. फळें चेंगरली गेल्यास व तीं जास्त पिकलेलीं असल्यास रस्त्यांत तीं सडण्याची भीति असते व एक फळ सडल्यास इतर सर्वांचा तें खराबा करितें.
वां क त या र क र णें :- पानांपासून उत्तम वांक निघतो. फिलिपाईन् बेटांत त्यापासून पिना ( Pina ) नांवाचें कापड तयार करितात तें उत्तम मलमलीसारखें असतें. उत्तर बंगालांतील रंगपूर जिल्ह्यांत चांभार जोडे शिवण्याचा धागा यापासून करितात म्हणून तेथें या वांकाची फार मागणी आहे. गोव्याकडे या वांकाचे केलेले कंठे ( Necklaces ) गळयांत घालितात. वॉलिच नांवाच्या गृहस्थानें खाशिया टेकडयांतील अननसाच्या वांकापासून तयार केलेली एक पिशवी १८३६ त खरेदी केली होती. यावरून वांकाचा उपयोग येथील लोकांना माहित असल्याचें स्पष्ट सिद्ध होतें. १८८७ सालीं ईस्ट इंडियन असोसिएशन पुढें वेन्टन् साहेबांनीं आसामच्या भावी व्यापारासंबंधीं माहिती सांगतांना सिलहट्मध्यें अननस, वांक व फळांपासून मद्यार्क करितां येण्यासारखा आहे ह्या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख केला. अलीकडे सर जे. बकिंगहॅमनीं पाठविलेला आसामांतील वांकाचा नमुना लंडनमधील इंपीरिअल इन्स्टिट्यूट संस्थेकडे परीक्षेकरितां पाठविला होता. या परीक्षेंत हा वांक उत्तम तर्हेचा ठरून त्याची किंमत एका टनास सरासरी २० ते २५ पौंड येईल असें ठरलें.
इतर देशांपेक्षां येथें अननसापासून होणार्या प्रत्येक उत्पन्नाकडे फार दुर्लक्ष केलें जातें. परंतु त्याचा योग्य उपयोग केल्यास पुष्कळ फायदा होण्यासारखा आहे. या फळांत औषधी गुणधर्म असून त्याचेपासून मद्यार्क व सिरका तयार करितां येण्यासारखा आहे.
औ ष धी गु ण ध र्म :- अननसाच्या पानांचा रस जंतविकारावर पाजितात. फळाचा रस दंतरोगावर देतात. पानांचा ताजा रस साखर घालून उचकीवर पाजितात. कच्च्या अननसाच्या रसानें गर्भपात होतो असें म्हणतात. कच्चा अननस खाल्ला तर स्तंभन पावलेला ऋतुस्त्राव चांगला होतो. फळांतल्या पांढर्या भागाचा रस साखर घालून पोटांत घेतला तर जुलाब होऊन जंत असतील तर पडून जातात. पक्व फळाचा रस काविळीवरहि उपयोगी पडतो असें म्हणतात. अननसांच्या पानांच्या तंतूंचें उंची कापड होतें. सिंगापूर, कालिफोर्निया वगैरे ठिकाणाहून पाकवलेले अननस डब्यांत भरून येतात. या धर्तीवर मलबार वगैरे हिंदुस्थानांतील ठिकाणीं हा धंदा मोठया प्रमाणावर निघण्यासारखा आहे.