विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनरण्य - (१) सूर्यवंशी इक्ष्वाकु कुलोत्पन्न पुरुकुत्स त्याचा कनिष्ठ मुलगा जो त्रसदस्यु त्याचा द्वितीय पुत्र. यास हर्यश्व आणि बृहदश्व असे दोन पुत्र होते. हा अयोध्येस राज्य करीत असतां रावणानें येऊन त्यास जिंकलें. रणावर मरते समयीं अनरण्यानें त्यास शाप दिला कीं माझा वंशज तुझा सकुल नाश करील. (वा. रामायण उत्तर० स० १९)
(२) सूर्यवंशी ॠतुपर्णाचा पौत्र. ऋतुपर्ण-सर्वकर्मा -अनरण्य-विघ्न. अशी परंपरा आहे.
(३) कार्तिक मासांत ज्यांनीं मांसाशन वर्ज केलें आहे अशा प्राचीन राजांपैकी एक (महाभारत १३.११५,५५६१ ).
(४) सूर्यादय व सूर्यास्त या कालीं ज्यांचे नामस्मरण करावें अशा राजांपैकीं एक (महाभारत १३.१६६,७६८४ ).