विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनवरी - आहदुद्दिन अल्ली अनवरी हा इराणचा कवि. याचा जन्म खोरासानमध्यें १२ व्या शतकाचे प्रारंभी झाला. सुलतान संजीर याच्या तो खास मर्जीतील असून प्रत्येक स्वारीबरोबर तो हजर असे. हॅझारस्पला सुलतानानें वेढा दिला असतां अनवरी व त्याचा प्रतिपक्षी राशिदी यांच्यामध्यें काव्यविषयक रणकंदन सुरू होतें. राशिदी ह्या किल्यांत होता. यांचीं काव्यें बाणावरून इकडून तिकडे जात होतीं असें म्हणतात. १२ व्या शतकाच्या अखेरीस बल्ख येथें त्याचा अंत झाला. ''दिवान अनवरी'' या त्याच्या काव्यसंग्रहांत पुष्कळ मोठया कविता व कांहीं वीणागीतें होतीं. ''खोरासनचे अश्रु'' हा याचा सर्वांत मोठा ग्रंथ होय. सादीनें आपल्या गुलिस्तानांत त्याच्या कांहीं कविता घेतल्या आहेत. हा आपल्या काळांतील सर्वांत मोठा ज्योतिषी म्हणून प्रसिध्द होता.