विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनयमलय - उ. अ. १०० १५', ते १०० ३१', व पू. रे. ७६० ५१', ते ७७० २०', मद्रास, इलाखा. कोईमतुर जिल्ह्याच्या दक्षिणेस पसरलेला सह्याद्रि पर्वताचा एक भाग. ह्याय हत्तीचा डोंगर असेंहि नांव आहे. या डोंगरावरील हवा नीलगिरी डोंगराप्रमाणें आहे.
या डोंगराच्या दोन ओळी आहेत एक खालची व दुसरी वरची. खालच्या ओळीची सरासरी उंची ३००० ते ४५०० फूट असून वरच्या ओळीची उंची ८००० फूटपर्यंत आहे, खालच्या डोंगराच्या उतरणीवर १८५०० एकर जमीन कॉफीचे मळे करण्याकरितां तयार केली आहे. डोंगरांत जंगल अप्रतिम आहे. येथील सागवान नामांकिम आहे. डोंगरातून सागवान बाहेर काढण्याचें काम हत्ती करतात. त्याचप्रमाणें माल तळावर आल्यावर तेथून एकदम खालीं आणण्याची व्यवस्था एक तार बांधून केली आहे. या डोंगरांत सांपडणार्या निरनिराळया वनस्पतींचे, लांकडांचे व तंतूचे नमुने कोईमतूर येथील जंगलपदार्थसंग्रहालयांत ठेविले आहेत. या जंगलांत शिकार पुष्कळ सांपडते. गवे, सांबर, वाघ, अस्वलें वगैरे पुष्कळ आहेत.
कांहीं जंगली लोक या जंगलांत रहातात त्या लोकांच्या जाती-कादन, मुदुवन, पुलैयन, मलसर इत्यादि. ( इं. गॅ. ५ )